कांचन परुळेकर
Financial Investment : जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक खातेधारकाला एक लाखाचे दुर्घटना विमा कवच लाभणार आहे. खातेधारकाचा नैसर्गिकरीत्या, अपघाती मृत्यू झाला, तर एक लाखाची रक्कम विमा कंपनीकडून कुटुंबीयांना मिळणार आहे. आत्महत्या केली किंवा पैशासाठी खातेधारकाला मारण्यात आले, तर हे पैसे मिळत नाहीत हे ध्यानात घ्यावे. कमाई करणाऱ्या व्यक्तीचे अचानक निधन झाले, तर कुटुंब मोडकळीस येऊ नये म्हणून आधार या स्वरूपात ही विमा तरतूद करण्यात आली आहे.
बचत करून जीवन विमा पॉलिसी खरेदी करावी. छोट्या रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंतचे पैसे आपण गुंतवू शकतो आणि ठरावीक वर्षांनी चांगला परतावा मिळवू शकते. मध्येच पॉलिसीधारकाचे निधन झाले, तर कुटुंब अडचणीत न येता त्यांना विमा रक्कम मिळू शकते. आजारपण, दंगा, पूर, भूकंप, आग यांपासून नुकसान टाळण्यासाठी घर, वाहने, उद्योग साधने यांचाही विमा उतरविता येतो.
बँकेत एकदा अर्ज भरून दिला, की दरवर्षी बारा रुपये अधिक सेवा कर वजा होईल. संबंधिताचे अपघाती निधन झाल्यास वारसाला विम्याचे दोन लाख मिळतील. पन्नास वर्षांपर्यंतच्या व्यक्तीने वर्षाला ३३० रुपये भरले तर कोणत्याही पद्धतीने मृत्यू आल्यास वारसास विम्याचे दोन लाख रुपये मिळतील. कंपनी, शासनाने सामाजिक सुरक्षा अंतर्गत या विमा योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे.
गरिबांसाठी विमा कंपन्यांनी छोट्या रकमेच्या वेगवेगळ्या पॉलिसी बाजारात आणल्या आहेत. आपल्यावरील जोखमीची जबाबदारी स्वीकारून कंपन्या अडचणीच्या प्रसंगी आपल्याला ठरल्याप्रमाणे पैसे उपलब्ध करून देतात. एलआयसी, नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स यांसारख्या खात्रीशीर कंपन्यांच्या प्रतिनिधीला वाडी वस्ती, मोहल्यात बोलावून आपण नीट माहिती घ्यावी. अनपेक्षित जोखीम, नुकसान भरपाई यासाठी लवकरात लवकर विम्याचा आधार घ्यावा.
रोखमुक्त व्यवहार
रोख रकमेचा वापर न करता थेट बँक खात्याशी संपर्क साधून किंवा चेक, ड्राफ्ट देऊन घेऊन देणे घेणे व्यवहार पूर्ण करणे याला रोखमुक्त (कॅशलेस) व्यवहार म्हणतात. नोटा, नाणी यांच्या वापराविना असे व्यवहार करायचे शिक्षण सर्वसामान्यांना लवकरात लवकर द्या.
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस., एनईएफटी, यूएसएसडी, ई वॅलेट, यूपीआय या सर्वच गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. पण हे जमत नसेल, तर निदान आधार क्रमांकाशी निगडित प्रणालीनुसार तो क्रमांक बँक खात्याशी जोडून आपल्याला नोटा, नाण्यांच्या वापराविना पैशाचे देणे घेणे व्यवहार पूर्ण करता येतात.
खर्चावर नियंत्रण
गरजा भागविण्यासाठी पैसा आहे, पण एकदा खर्च झालेला पैसा परत येत नाही, म्हणून तो खर्च करण्यापूर्वी शहाणपणाने निर्णय घेणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनासाठी, आयुष्याच्या चक्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी म्हणजे गरजा आणि वापरल्याने आनंद होतो, बरे वाटते अशा बाबी म्हणजे आवश्यकता.
याचा प्रथमक्रम ठरवा. गरजा पुरविल्यानंतर अवश्यकतांकडे जा. गरजांवरही तारतम्याने खर्च करा. आवश्यकतांवर खर्च करताना स्वतःला मर्यादा घालून घ्या. शहाणपणाने खर्च म्हणणाऱ्या काही बाबी ध्यानी घ्या.
सतत चहा पिणे, तंबाखू, मिश्री, टीव्ही पाहणे यावर बंधन घालून त्याचा वापर कमी करून पैसे वाचविणे आवश्यक आहे. तीन कपडे जोड पुरेसे असताना चौथा आवडला, स्वस्त आहे, म्हणून खरेदी करू नका.
सरकारी दवाखान्यात हल्ली उत्तम उपचार मिळतात. तेथे न जाता उठसूट खासगी दवाखाना टाळा. दवाखान्यात जनरल रूम ठीक असताना उगाचच स्पेशल रूम घेता कामा नये. आजारी माणसाला भेटायला येणारी माणसे कमी कशी होतील हे पाहावे.
मुलांना घरगुती खाऊ द्यावा. गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे, पाव, फरसाण यांवरील खर्च कमी करावा. कुटुंबातील प्रत्येकाने विचारपूर्वक कृती करायला हवी. हळूहळू वायफळ खर्च कमी करण्याची सुद्धा योजना बनवून निर्धारपूर्वक खर्चाला आळा घालावा.
फॅशनेबल कपडे, दागिने, लग्न, मेजवान्या, मोबाइल, टी.व्ही. वापर, अंधश्रद्धा, प्रवास, तीर्थयात्रा, भेटवस्तू देणे, सणसमारंभ साजरे करणे, मयत समयीचा खर्च, व्यसने या बाबींवरचा खर्च कमी करणे, टाळणे शक्य असते. टाळता नाहीच आला, तरी बेसुमार खर्चाला तरी आळा घाला.
वायफळ खर्च टाळण्याची सवय लावून घेतली, तर आपोआपच बचत वाढते. गुंतवणूक बचतीवर अवलंबून असते. पैसा वापरूया पण त्याचा गैरवापर टाळूयात.
महिन्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवून विविध गरजा आणि आवश्यकता यांच्यासाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवून स्वतंत्र ठेवले, तर आपोआपच विचारपूर्वक खर्चाची सवय लागेल. मिळकतीपेक्षा जास्त खर्च करायचा नाही. खोटा अभिमान, लोकांनी चांगले म्हणावे म्हणून कोणताही खर्च करू नका. उत्पन्नवाढीचा प्रयत्न करावा.
आपल्याजवळच्या उपलब्ध वेळेचा परिणामकारक वापर केला, तर उत्पन्नवाढीला वेळ देणे शक्य होते. पैशासाठी ढोर मेहनत न करता बचत आपल्यासाठी काम करेल यावर विश्वास बाळगा. वायफळ खर्च कमी करणे, कर्जातून बाहेर येणे, आर्थिक बळ वाढविणे ही कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. बँकांच्या विविध सेवांची माहिती घेऊन त्याचा जरूर लाभ घ्यावा. आर्थिक स्वावलंबनाचा रस्ता असा आहे, त्या मार्गाने चालावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.