कांचन परुळेकर
Management of Finance : आपले उत्पन्न कमी असल्याने आपण बचत करू शकत नाही हा समज, ही भीती मनातून काढून टाकावी. छोटी का असेना, नियमित बचत केली, बचतीला लवकरात लवकर सुरुवात केली, साठविलेला पैसा बँक, पोस्ट ऑफिस, बचत गटात गुंतवत गेलो, वर्षांनी मुदतठेवीत पैसा गुंतवला, मालमत्ता खरेदीसाठी तो पैसा वापरला तर चमत्कार घडतो.
बचत गटातील १०० महिला एकत्र आल्या आणि दररोज त्यांनी एक रुपयाची बचत करायचे ठरविले, तरी एका वर्षात १ × ३६५ × १०० म्हणजे वर्षाकाठी ३६,५०० रुपये साठतात. एकट्या व्यक्तीने दररोज १० रुपये बचत करायची ठरवली, तरी एका वर्षात १० × ३६५ = ३,६५० रुपये साठतात. दरमहा ३०० रुपये आवर्ती खात्यात (आरडी) गुंतविले तर वर्षाकाठी व्याजासह रक्कम वाढते.
वर्षाने ती रक्कम मुदत ठेवीत गुंतविली तर आवर्ती खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते. वर्षाने तोच पैसा उद्योग साधन खरेदीसाठी वापरला तर उद्योगातील कमाई बँकेतील व्याजापेक्षा अधिक गतीने वाढते. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या व्यक्तीने दररोज हाती येणाऱ्या पैशातून काही रक्कम कायमच बाजूला काढली पाहिजे.
अंगावर काम घेणाऱ्या व्यावसायिकांनी एकदम पैसा हाती आला, की त्यातून किमान १० ते १५ टक्के रक्कम बाजूला ठेवायला हवी. लगेच ती पोस्टात किंवा बँकेत गुंतवायला हवी. ज्यांना मासिक पगार मिळतो त्यांनी प्रतिदिन बचतीच्या हिशेबाने पगार हाती येताच महिन्याची बचत गुंतवायला हवी.
एकदा खर्च झालेला पैसा पुन्हा हाती येत नाही. एकदा वाचविलेला पैसा भविष्यात अधिक पैसा निर्माण करतो हे ध्यानी घ्यावे. अतिशय कमी रक्कम साठविली तरी ती कालांतराने मोठी होते. वाढत्या पैशाची जादू आर्थिक नियोजन करणाऱ्याला समजते. बचतीतूनच खरी संपत्ती, मालमत्ता, भांडवल उभे राहते.
आपल्या हाती येणाऱ्या उत्पन्नाची विभागणी खालीलप्रमाणे करावी. समजा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून मासिक उत्पन्न १०,००० रुपये आहे. तर त्याची विभागणी पुढीलप्रमाणे करावी.
मासिक उत्पन्नाची विभागणी
अन्न २० टक्के २,००० रूपये
घर/ पाणी/ वीज १२ टक्के १,२०० रूपये
वाहन खर्च ५ टक्के ५०० रूपये
आरोग्य ८ टक्के ८०० रूपये
कपडे १० टक्के १,००० रूपये
मुले १० टक्के १,००० रूपये
व्यक्तिगत १० टक्के १,००० रूपये
किरकोळ ५ टक्के ५०० रूपये
कर्जफेड ५ टक्के ५०० रूपये
बचत १५ टक्के १,५०० रूपये
१०,००० रूपये
बचत करणारा व्यक्ती उधळ्या व्यक्ती आपल्या खर्चाच्या नोंदी
अन्न गरजेनुसार खरेदी व वापर गरजेपेक्षा जास्त खरेदी व नासधूस
कपडे विचारपूर्वक व आवश्यक तेवढेच फॅशननुसार सतत खरेदी
सण समारंभ एकत्रित येऊन कमी खर्चात साजरे मिठाई, फटाके, फराळ, कपडे खरेदी, धुमधडाक्यात साजरे
शिक्षण पुस्तके, वह्या, गणवेशासाठी खर्च, घरातून डबा फॅन्सी बूट, महागड्या वह्या, फॅन्सी दप्तर, चॉकलेट, फरसाण
सामाजिक रीतिरिवाज आवश्यक तेवढेच साग्रसंगीत
अन्य बाबी माहिती, माफक करमणूक, आवश्यक प्रवास यासाठी खर्च पार्टी, तंबाखू, गुटखा, दारू, सिनेमा, सहली यांसाठी खर्च.
योग्य ठिकाणी गुंतवणूक
महिलांनी बचत केलेले पैसे डबा, साडीची घडी, कपाटात न ठेवता खालीलप्रमाणे विचारपूर्वक गुंतवायला हवेत. म्हणजे आपल्याला त्यावर चांगला परतावा मिळू शकतो.
बँक बचत खाते : पैसे हवे तेव्हा ठेवता येतात. हवे तेव्हा काढता येतात. पैसे पूर्णपणे सुरक्षित. मात्र व्याज दर कमी असल्याने लाभ कमी.
बँक आवर्ती खाते (आरडी) : या खात्यात दर दिवशी वा आठवड्याला किंवा दरमहा ठरावीक रक्कम भरता येते. व्याजावर व्याज मिळत असल्याने बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळतो. मात्र मुदतीनंतर पैसे मिळतात. मुदतीपूर्वी काढले तर व्याजात कपात होते. पूर्णपणे सुरक्षित.
बँकेत मुदतठेव : एक वर्ष, दोन वर्षे या प्रमाणे ठरावीक मुदतीकरिता बँकेत रक्कम ठेवली जाते. आवर्ती ठेवीपेक्षा व्याज जास्त असते. पूर्ण सुरक्षित, मुदतीपूर्वी पैसे काढल्यास व्याजात कपात होते.
बचत गटात ठेव : दरमहा गटात पैसे ठेवणे. बँकेपेक्षा जास्त व्याज मिळू शकते. हवे तेव्हा कर्जाऊ स्वरूपात पैसे प्राप्त होतात. पण गटातील व्यक्तींना वेळेवर परतफेड केली नाही तर रक्कम असुरक्षित बनते.
पोस्ट ऑफिस योजना : पूर्णपणे सुरक्षित. बँकेपेक्षा जास्त व्याज. विविध योजना.
सोने चांदी खरेदी : बाजारातील दराप्रमाणे कमी जास्त किंमत. हवे तेव्हा सोनाराकडे किंवा ग्राहकाकडे विकून पैसा करता येतो. पण सांभाळण्याची मोठी जोखीम असते. दागिने केल्यास घट गृहीत धरून मूळ घातलेल्या पैशात परतावा कमी येतो.
जमीन : शेतजमीन आणि बीना शेतजमीन असे दोन भाग असतात. कशातही पैसा गुंतवला तर तो झपाट्याने वाढतो. मात्र इतर वस्तूप्रमाणे जमीन पटकन विकता येत नाही. कागदपत्रे, बोलणी यात वेळ जातो. जमीन ताब्यात ठेवण्यासाठी लक्ष देणे, राखण, कुंपण आदी बाबीही येतात.
घर : आपण घर भाड्याने दिले तर उत्पन्नात वाढ होते. स्वतःसाठी वापरले तर जमिनीचा दर वाढतो पण घराची किंमत कमी कमी होत जाते. मात्र घर कोणी उचलून नेणार नाही. ते सुरक्षित असते. लगेच पैसे हवे तर ते विकता येत नाही. बोलणी, कागदपत्रे होईपर्यंत वेळ जातो.
गुंतवणुकीचे धोरण
आपली बचत एकाच बाबीमध्ये गुंतवू नका. विविध गोष्टींमध्ये गुंतवावी. यासाठी ८०/२० योजना राबवावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.