Agriculture Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Chemical Fertilizes : रासायनिक खत वापराची वाढवा कार्यक्षमता

Chemical Fertilizer Efficiency : पिकांच्या वाढीव उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी सुधारित किंवा संकरित बियाण्यांचा वापर करण्यासोबत अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर देत असतात. एकूण उत्पादन खर्चाच्या सुमारे ३० टक्क्यांपर्यंतचा कमी अधिक खर्च अन्नद्रव्य व्यवस्थापनावर होत असतो.

Team Agrowon

सतीश राठोड, अरुण देशमुख

Indian Agriculture : एका अहवालानुसार महाराष्ट्रात दरवर्षी पीक उत्पादनात ३० लाख टन खते वापरली जातात. केवळ मुख्य रासायनिक खतांचा (नत्र, स्फुरद आणि पालाश) यांचा वापर प्रति हेक्टरी १२९.१९० किलोपेक्षाही अधिक नोंदवला गेला आहे. अलीकडे फळबाग व अनेक पिकामध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब काही प्रमाणात वाढला असला, तरी बहुतांश कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने खते देतात.

वापरलेल्या खतांपैकी ३० ते ५० टक्के खतांचा पाणी, हवा, तापमान अशा विविध कारणांनी ऱ्हास होतोत. खते पाण्यासोबत निचरा होऊन जाणे, हवेमध्ये उडून जाणे ही प्रमुख कारणे आहेत. परिणामी, खतांसाठी खर्च करूनही अपेक्षेप्रमाणे पीक उत्पादनात वाढ मिळविण्यात अडचणी येतात. हे टाळण्यासाठी वापरत असलेल्या खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

खत वापराची कार्यक्षमता म्हणजे काय?

पिकांना दिलेली खतमात्रा पिकांकडून जास्तीत जास्त शोषली जाऊन, त्यातील पिकाचे अधिक उत्पादन प्राप्त करणे म्हणजेच खतांचा कार्यक्षम वापर होय. ही कार्यक्षमता खतांचे योग्य प्रमाण, योग्य वेळ, योग्य पद्धत यावर अवलंबून असते. यामुळे अन्नद्रव्ये जमिनीत शिल्लक राहून, त्यांचा संभाव्य ऱ्हास कमीत कमी असेल, यावर भर दिला जातो.

रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...

पिकांना द्यावयाची खतमात्रा ठरवताना माती परीक्षण आणि त्या पिकासाठी असलेली विद्यापीठाची शिफारस हाच मुख्य आधार असला पाहिजे. आपण करत असलेल्या पिकांच्या शिफारशी व पीक अवस्थेने कोणती व किती खतमात्रा द्यावयाची याची माहिती करून घ्यावी. यामुळे गरजेइतकेच खतमात्रा वापरली जाते. अनावश्यक खर्च कमी होतो.

पिकाच्या वाढीसाठी विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र (युरिया), स्फुरद (सुपर फॉस्फेट), पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश), सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते (झिंक सल्फेट, आयर्न सल्फेट, बोरॅक्स) यांचा संतुलित प्रमाणातच वापर करावा. खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते. त्यासाठी पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

सर्व नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. जमिनीत घातलेले नत्र हवेत उडून अथवा पाण्याबरोबर वाहून जाऊ नये याकरिता पाण्याच्या पाळीवर नियंत्रण ठेवावे.

पुरेसा ओलावा असताना पिकांच्या ओळीमधून अथवा रोपाभोवती खते द्यावीत. रोपांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये. खते दिल्यानंतर ती मातीआड करून घ्यावीत.

खत ओलसर असल्यास, खत कोरड्या मातीत किंवा रेतीत मिसळून वापरावीत.

पेरणीवेळीच दोन चाड्यांच्या पाभरीने खते पेरून द्यावीत. म्हणजे ती पिकांच्या मुळांच्या खालच्या थरात जाऊन अंकुरलेल्या बियांना व पुढे पिकांना उपलब्ध होतात.

पेरणीच्या वेळी खते व बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या साह्याने दिल्यास अधिक फायदेशीर ठरतात.

पानांवर कमतरतेची लक्षणे दिसत असल्यास नत्रयुक्त खते, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांची फवारणीही करता येते. ही खते त्वरित पिकांना उपलब्ध होतात.

डायअमोनिअम फॉस्फेट २ टक्के (२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणीद्वारे दिल्यास फायद्याचे ठरते.

भात पिकास नायट्रेट खते देऊ नयेत. अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम वापरासाठी भात शेतीत नत्र व स्फुरदयुक्त खत गोळ्या (ब्रिकेट्स) हेक्टरी १६९ किलो देण्याची शिफारस आहे. ब्रिकेटमधून ५९ किलो नत्र + ३१ किलो स्फुरद प्रति हेक्टरी मिळते. चार रोपांच्या मध्ये या खतगोळ्या पुराव्यात.

चुनखडीयुक्त जमिनीत युरिया किंवा अमोनिअम सल्फेट खते जमिनीच्या पृष्ठभागावर टाकून देऊ नये. ती शक्यतो मातीआड करावीत.

जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यास सेंद्रिय खतांचा व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

माती परीक्षणानुसार पिकांच्या अपेक्षित उत्पादन सूत्रानुसार रासायनिक खतांचा संतुलित व योग्य पद्धतीने वापर करावा.

जिवाणू खतांचा बीजप्रक्रिया व अन्य सेंद्रिय खतांसोबत मिसळून नियमितपणे वापर करावा.

पिकांच्या फेरपालटीत योग्य पीक पद्धती अवलंबताना कडधान्य, तृणधान्य, गळित धान्यांचा अंतर्भाव जरूर करावा.

ठिबक सिंचनाद्वारे दरदिवशी गरजेपुरतेच पाणी दिले जाईल अशी व्यवस्था करावी.

विद्राव्य खताचा वापर ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते.

फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी

पाण्यामध्ये खत विरघळवावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे

कॅल्शिअम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. शक्यतो कोणत्याही फवारणीसाठी अशा कॅल्शिअमयुक्त पाण्याचा वापर टाळावा.

बोर्डो किंवा लाइम मिक्श्‍चर साठविलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये.

दिवसाच्या उन्हे नसलेल्या काळात फवारणी करावी. (उदा. सकाळी ९ ते ११ किंवा सायंकाळी ४ ते ६.३०.)

विद्राव्य खतांची कार्यक्षमता

विद्राव्य खते पूर्णपणे पाण्यात विरघळणारी असावीत. जर खते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळणारी नसेल, तर अशी खते पिकांसाठी वापरू नये.

विद्राव्य खते नेहमी आम्लधर्मी असावीत. त्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रणात राहण्यास मदत होते. खते पिकांना पूर्णपणे उपलब्ध होतील.

विद्राव्य खते घन स्वरूपात असल्यास, त्याची हाताळणी व वाहतूक सुलभ होते.

विद्राव्य खतामध्ये जड असणारी क्लोराईड व सोडिअमसारखे हानीकारक मूलद्रव्ये नसल्याची खात्री त्यांची लेबल्स वाचून करावी. अशी मूलद्रव्ये असलेली खते पिकांना नेहमी देणे टाळावे.

विद्राव्य खते पाण्यात विरघळल्यानंतर साका तयार होत असेल, तर मिश्रण करण्यात आपली काही चूक होते आहे का, हे पाहावे. त्यासाठी वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी.

विद्राव्य खते ही नेहमी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांच्या मुळाजवळ द्यावीत. त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते.

पिकांची वाढीचा अवस्था, गरज या प्रमाणे खते द्यावीत. वेळोवेळी पिकाच्या पानांची तपासणी करून देत असलेल्या खतांच्या आधिक्य किंवा कमतरतेच्या लक्षणांची नोंद करून खत प्रमाणात योग्य ते बदल करावेत.

विद्राव्ये खतांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक

शास्त्रोक्त पद्धतीने ठिबक संचाची आखणी व उभारणी जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म क्षारयुक्त पाणी

- सतीश राठोड (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता), ९१६८६१२४१०

- अरुण देशमुख (प्रमुख- कृषी विद्या विभाग), ९५४५४५६९०२

(नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT