Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : नगर जिल्ह्यात २५५ गावे, १४०० वाड्या-वस्त्यांना टंचाईच्या झळा

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने भूजल पाणीपातळी खालावली आहे. पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर होत आहे. नगर जिल्ह्यात २६८ टँकरने ५ लाख २२ हजार जनतेला पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. नगर जिल्ह्यातील २५५ गावे १ हजार ३९५ वाड्या- वस्त्यांना टंचाईची झळ बसली आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी सरसरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत. त्यामुळे दररोज पाण्याच्या टँकरच्या मागणी वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेने जनता हैराण झाली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात २५५ गावे व १ हजार ३९५ वाड्या- वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवत असून सर्वाधिक टंचाईच्या झळा पाथर्डी, कर्जत, पारनेर, संगमनेर या तालुक्यांत जाणवत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

सर्वाधिक पाणीटंचाईची तीव्रता ही पाथर्डी तालुक्यात असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पाथर्डी तालुक्यात ८० गावे ४०४ वाड्यांना ८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याठिकाणी १ लाख ६२ हजार ७४६ लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, तालुक्यातील निम्म्याहून अधिक लोकांची टँकरने तहान भागविण्यात येत आहे.

जिल्ह्यात राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर हे चार तालुके वगळता उर्वरित १० तालुक्यांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. नगर जिल्ह्यात मंजूर टँकर आणि होणाऱ्या खेपांची टक्केवारी ८७.९६ टक्के आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासनाने टँकर भरण्यासाठी १०९ विहिरी व कूपनलिका अधिग्रहण केल्या आहेत. टँकर भरण्यासाठी ६६ विहिरी व ४३ कूपनलिका अधिग्रहण करण्यात आल्या आहेत असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

तालुकानिहाय गाव, वाड्या, टँकर (कंसात लोकसंख्या)

संगमनेर ३१ गावे १०१ वाड्या २५ टँकर (४५ हजार ४७१)

अकोले २ गावे २० वाड्या ५ टँकर (७ हजार १८८)

नेवासा २ गावे २ टँकर (२ हजार ५६५)

नगर १९ गावे ७० वाड्या १८ टँकर (२७ हजार ६४९)

पारनेर ३७ गावे २९८ वाड्या ३२ टँकर (७८ हजार २१९)

पाथर्डी ८० गावे ४०४ वाड्या ८९ टँकर (१ लाख ६२ हजार ७४६)

शेवगाव ११ गावे ६२ वाड्या १० टँकर (१३ हजार ६४)

कर्जत ३८ गावे २२३ वाड्या ३४ टँकर (७३ हजार २८५)

जामखेड २२ गावे ६० वाड्या २० टँकर (४६ हजार ३६५)

श्रीगोंदे ६ गावे ६० वाड्या ९ टँकर (१५ हजार १७७)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT