Maharashtra Lok Sabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Lok Sabha Election : मतदानादिवशी राज्यात गोंधळ, मतदानावर बहिष्कार तर मविआच्या उमेदवाराविरोधात तक्रार

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (ता.१३) मतदान सुरू झाले आहे. राज्यासह ९ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान पार पडणार असून ९६ मतदारसंघात किती मतदान होते याकडे लक्ष लागले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (ता.१३) १० राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ९६ मतदारसंघात मतदान सुरू झाले आहे. देशात दुपारी १ वाजेपर्यंत ४०. ३२ टक्के मतदान झालं असून सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये ५१. ८७ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान सुरू झाले असून सकाळपासून आतापर्यंत ३०.८५ टक्के मतदान पार पडले. सर्वाधिक मतदान नंदूरबारमध्ये ३७.३३ टक्के झाले. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्यासह इतर घटना घडल्या आहेत.

यादरम्यान पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या मतदानावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. येथे बंद पडलेल्या सीसीटीव्हीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट आरोप केले आहे. मतदानासाठी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद असल्यावरून हे आरोप केले आहेत. तसेच सकाळी १०.२५ वाजेपासून येथील सीसीटीव्ही बंद असल्याने यात काही तरी काळंबेरं होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ पासून राज्याच्या विविध भागात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटना समोर येत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल २५ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांना उन्हाच्या तडाख्यात मनस्ताप सहन करावा लागला आहे.

४ तास वीज पुरवठा खंडीत

तसेच जळगाव मधील रावेर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथे एकच धावपळ उडाली. मतदानासाठी आलेल्या मतदारांसह पोलिसांची धावपळ झाली. तर रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर ४ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने मतदानावर त्याचा परिणाम झाला. यावेळी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल टॉर्च लावून मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवली.

वाघेरे यांच्यावर आचारसंहिता भंगची तक्रार

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचा दिवस उजाडला आहे. सकाळ पासूनच लोक मतदानासाठी बाहेर पडत आहेत. यादरम्यान मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार झाली. मतदानाच्या दिवशी उमेदवारांना मोटारीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास मनाई असताना वाघेरे हे 'मशाल' चिन्ह काचेवर असणारी गाडी घेऊन फिरत होते. यावरून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वाघेरे यांची तक्रार केली. यावरून वाघेरे यांच्यावर आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बीडमध्ये मतदानावर बहिष्कार

बीड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून २१ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून ३५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. बीड शहरासह ग्रामीण भागात मतदान केंद्रावर रांगाच्या रांगा लागलेल्या आहे. मात्र केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे प्रशासनावर मतदारांच्या गयावया करण्याची वेळ आहे.

केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील लोकांनी दोन दिवसापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनासह राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. यावरून आज मतदानाच्या दिवशी येथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मतदान सुरू होऊन देखील मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेला नाही. यावरून निवडणूक अधिकारी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तर कोरडेवाडी गावातील नागरिकांनी हा बहिष्कार साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासह इतर सुविधांवरून टाकला आहे. तसेच तलावाचा प्रश्न मार्गी लावा तरच मतदान करू असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. येथे २ हजार १३० मतदान आहे.

अधिकारीच बनले प्रचारार्थी

अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या सुजय राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश ज्ञानदेव लंके यांच्या लढत होत आहे. येथे सध्या प्रचंड चुरस पाहायला मिळत असून पाथर्डी- मतदान केंद्र ग्रामस्थांनी बंद पाडले आहे.

पाथर्डी घुमटवाडी येथील मतदान केंद्रावर चक्क निवडणूक अधिकाऱ्याकडेच भाजप उमेदवार सुजय विखे यांचे प्रचार पत्रक सापडे आहे. यावरून येथे ग्रामस्थांनी मतदान केंद्र बंद पाडले आहे. यामुळे तहसीलदार उध्दव नाईक यांनी मतदान केंद्राकडे धाव घेऊन ग्रामस्थांशी चर्चा करत पुन्हा केंद्र सुरू करण्याची विनंती केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मतदान केंद्र पुन्हा सुरू केले.

मोबाईल सोपडला तर कारवाई

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. पण याआधीच मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढताना मतदान प्रक्रियेत अधिकारी कर्मचाऱ्यांकडे मोबाईल सापडल्यास कारवाई करू असे म्हटले आहे. तसेच हा आदेश मतदारांना लागू असून मतदान करण्याऱ्या मतदारांनी देखील आपला मोबाईल बाहेर ठेऊन प्रवेश करावा असे म्हटले आहे. तसेच जिल्हाधिकारी खत्री यांनी प्रत्येत मतदान केंद्रावर पोलिसांमार्फत तपासणी केली जाईल असेही म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT