Maharashtra Assembly Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election 2024 : शेती प्रश्‍नांना बगल; स्थानिक मुद्द्यांवर निवडणुकीत रंगत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना, पुणे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या विविध राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांनी घुसळण झाली आहे.

गणेश कोरे

Pune News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना, पुणे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या विविध राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांनी घुसळण झाली आहे. या घुसळणीत मात्र शेती आणि शेतकरी प्रश्‍न बाजूला पडले असून, गद्दारी, निष्ठावान, आरोप, प्रत्यारोप आणि विकासाच्या आश्‍वासनांवर निवडणुकीत रंग भरले आहेत. यामुळे मतमोजणीनंतर कोण गुलाल उधळणार आणि कोण कोणाला धूळ चारणार यावर खमंग चर्चा वाड्यावस्त्या आणि पारावर रंगल्या आहेत.

जुन्नर विधानसभा

जुन्नरमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके (घड्याळ) विरुद्ध सत्यशील शेरकर (तुतारी) अशी लढत रंगत आहे. तर महायुतीतील शरद सोनवणे (शिवसेना शिंदे गट) आणि आशाताई बुचके (भाजप) यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवत असल्याने मोठी रंगत आणली आहे. शेरकर यांच्यासाठी शरद पवार यांची सभा झाली. यासभेत गद्दारांना जागा दाखविण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. तर बेनके यांनी शरद पवार यांचा आपल्याच आशीर्वाद असल्याचे सांगत भावनिक साद घातली आहे. यामुळे प्रचारात रंगत आली असून, मतदार कोणाला साद घालतात यावर जय पराजय अवलंबून आहे.

खेड विधानसभा

खेडमध्ये विद्यमान आमदार दिलीप मोहिते (घड्याळ) विरुद्ध बाबाजी काळे (मशाल) अशी थेट लढत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेला (ठाकरे गट) एकच जागा मिळाली असल्याने जिल्ह्यात मशाल पेटणार की घड्याळ्याची टिकटिक कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मधील अतुल देशमुख यांची बंडखोरी शमविण्यात महाविकास आघाडीला यश आल्याने काळे यांच्या रूपाने मशाल पेटण्याची चिन्हे आहेत.

आंबेगाव विधानसभा

आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील (घड्याळ) आणि देवदत्त निकम (तुतारी) अशी लढत रंगत असून, शरद पवार यांनी सभेत वळसे पाटील यांचे नाव घेऊन यांना पाडा.. पाडा... पाडा... असे तीन वेळा म्हटल्याने प्रचारात रंगत आणली आहे. तर वळसे पाटील यांनी केलेल्या विकासकामांवर मते मागत असून, डिंभे धरणाच्या बोगद्यातून कर्जत जामखेडला पाणी देण्याचा मुद्द्याने प्रचारात रंगत आणली आहे. वळसे पाटील यांनी बोगद्याला विरोध केला असून, स्थानिक अस्मिता जागृत केली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पारनेरच्या सभेत डिंभे बोगदा करणार असल्याची घोषणा केल्याने हा बोगदा कोणाच्या पथ्यावर पडतो हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

शिरूर विधानसभा

शिरूरमध्ये अशोक पवार (तुतारी) आणि माउली कटके (घड्याळ) अशी लढत होत असून, कटके यांनी शिवसेना ठाकरे गटातून राष्‍ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अशोक पवार यांच्या घोडगंगा साखर कारखान्याचा मुद्दा विरोधकांच्या अग्रभागी आहे. घोडगंगा बंद आणि खासगी व्यंकटेश्‍वरा कसा सुरू असा मुद्दा विरोधकांना उपस्थित केला आहे. तर भाजपच्या पारंपरिक मतदार संघात भाजपचे झुकते माप पवार यांच्याकडे जाते की कटके यांच्याकडे झुकते यावर जय पराजय अवलंबून आहे.

मावळ विधानसभा

मावळमध्ये विद्यमान आमदार सुनील शेळके (घड्याळ) विरुद्ध सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे अशी लढत होत आहे. भेगडे यांच्या डॅमेज कट्रोलसाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश न आल्याने शेळके आणि भेगडे ही रंगत राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे.

भोर-वेल्हा विधानसभा

भोर - वेल्हामध्ये विद्यमान आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) विरुद्ध शंकर मांडेकर (घड्याळ) अशी लढत होत असली, तरी यांच्यापुढे कुलदीप कोंडे (शिवसेना शिंदे गट) आणि किरण दगडे (भाजप बंडखोर) यांनी रंगत आणली आहे. कोंडे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. तर मांडेकर हे मूळचे राष्‍ट्रवादीमध्ये होते. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून, नंतर उमेदवारीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गटात)मध्ये प्रवेश केल्याने ही निवडणुकीत रंग भरले आहेत.

इंदापूर विधानसभा

इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्ता भरणे (घड्याळ) आणि भाजपमधून राष्‍ट्रवादी (शरद पवार गटात)मध्ये आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होत असली, तरी शरद पवार यांच्या सोबत विशेष सख्य असलेले सोनई दूध संघाचे दशरथ माने यांचे सुपुत्र प्रवीण माने यांनी हर्षवर्धन पाटलांना विरोध करत बंडखोरी केल्याने इंदापूरची लढत रंगतदार आणि चुरशीची झाली आहे.

दौंड विधानसभा

दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात रमेश थोरात (तुतारी) निवडणूक लढवीत आहेत. या लढतीत साखर कारखान्याचा विषय अग्रभागी आहे.

पुरंदर विधानसभा

पुरंदरमध्ये विद्यमान आमदार संजय जगताप (काँग्रेस) त्यांच्या समोर पारंपरिक विरोधक शिवसेनेचे (शिंदे गट) माजी मंत्री विजय शिवतारे लढत देत असून, या लढतील संभाजी झेंडे यांना अजित पवार गटाने अधिकृत चिन्ह दिल्याने तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे मतमोजणी नंतर स्पष्‍ट होणार आहे. शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदा विरोध करून, नंतर प्रचारात सहभागी झाले होते. मात्र तरीही झेंडे यांनी शड्डू ठोकल्याने शिवतारे यांची लढाई जिकिरीची झाली आहे.

बारामती विधानसभेची राज्यात चर्चा

बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कुटुंबातच लढत होत असल्याने ही लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांची लढत होत असून, युगेंद्र यांच्या प्रचारासाठी खुद्द आजी आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार घरोघरी प्रचार करत असल्याने ही लढत राज्यातील सर्वांत लक्षवेधी लढत ठरली आहे. अजित पवार हे बारामतीच्या विकासकामांवर मते मागत असून, मी सर्वाधिक मतांनी विजयी होईल असा विश्‍वास व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Variety : दुर्मीळ भातवाण जपण्यासोबतच कंपनीने साधली प्रगती

Dairy Processing Business : शून्यातून विस्तारलेला काळे बंधूंचा प्रक्रिया उद्योग

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Milk Processing Equipment : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे

Women Empowerment : सनद - महिलांचे जीवनमान सुधारण्याची

SCROLL FOR NEXT