Farmer Crisis: राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत या वर्षी जुलैमध्ये कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी वर्षाला पाच हजार कोटी तर पाच वर्षांसाठी २५ हजार कोटींची भांडवली गुंतवणूक सरकार शेतीत करणार, त्यातून भरीव कामे होतील असे स्पष्ट करण्यात आले. एक रुपयातील पीकविमा योजना बंद केल्यानंतर राज्य हिश्शात होणाऱ्या बचतीतील पैसा या योजनेसाठी वापरला जाणार होता. परंतु वर्षाला पाच हजार कोटींचा गुब्बारा लवकरच फुटेल, असे ‘ॲग्रोवन’ने ऑगस्टमध्ये स्पष्ट केले होते आणि घडतेही तसेच! .कृषी समृद्धी योजनेला निधीच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासूनच ग्रहण लागलेले आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीतून योजनेसाठी आर्थिक तरतूद केली जाईल, असे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र कृषी समृद्धीसाठी पुरवणी मागणीत एक रुपयाची देखील तरतूद केली गेली नाही. आता योजनेच्या घोषणेला चार महिने होत असताना वार्षिक पाच हजार कोटींऐवजी तीन वर्षांसाठी पाच हजार ६६८ कोटी म्हणजे वार्षिक केवळ १८८९ कोटींवर बोळवण करण्यात आली आहे..Krushi Samruddhi Yojana: वित्तीय ताणामुळे ‘कृषी समृद्धी’ला कात्री.ही तरतूद देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आल्याने आचारसंहितेमुळे योजनेच्या अंमलबजावणीला खीळ बसणार आहे. त्यामुळे या वर्षी तरी कृषी समृद्धीच्या माध्यमातून शेतीत मोठ्या भांडवली गुंतवणुकीची वल्गना ठरताना दिसते..मुळात राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यात लाडक्या बहीण योजनेसाठीच्या निधीची तरतूद करताना सरकारच्या नाकी नऊ येत आहेत. अनेक योजनांना कात्री लावून लाडक्या बहीण योजनेसाठी निधीची भरपाई केली जात आहे. अतिवृष्टिग्रस्तांसाठीचा निधी देखील सरकारकडे पैसा नसल्याने टप्प्याटप्प्याने दिला जात आहे. त्यामुळे कृषी समृद्धी ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली एक धूळफेक असल्याच्या आरोप अगदी सुरुवातीपासून होत होता, त्यात आता तथ्य वाटते आणि सर्वसामान्य नागरिक असो की सरकार पैशाचे सोंग आणता येत नाही, हे सिद्ध झाले आहे..आधी कृषी समृद्धी ही योजना ‘पोकरा’ अंतर्गतची गावे वगळून राबविली जाणार होती. परंतु अलीकडे या योजनेची अंमलबजावणी राज्यभर करण्याचा शासन आदेश आला आहे. कृषी समृद्धी अंतर्गत मृदा-पाणी व्यवस्थापनापासून ते हवामान आधारित शाश्वत शेती, मूल्यसाखळी विकास, काढणीपश्चात सुविधा यासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे..Krushi Samruddhi Yojana: कृषी समृद्धी योजनेचा विस्तार.बदलत्या हवामान काळात विविध आपत्तींनी शेती-शेतीमालाचे नुकसान कमी करून कमी खर्चात उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आता मात्र निधीच्या अभावामुळे योजनेतील उत्पादकता वाढ, कंपोस्ट खत निर्मिती, एकात्मिक अन्नद्रव्य तसेच कीड रोग व्यवस्थापन या महत्त्वाच्या घटकांना वगळण्यात आले तर शेतकरी सुविधा केंद्र, बियाणे कीट, फळभाज्या कीट हे घटक थंड बस्त्यात ठेवण्यात आले आहेत..त्यामुळे शाश्वत उत्पादनासह कमी खर्च आणि थेट उत्पन्नवाढीचा या योजनेचा मूळ हेतूच साध्य होणार नाही. अधिक गंभीर बाब म्हणजे ही योजना अडगळीला टाकण्याची पुरेपूर तय्यारी प्रशासनाने केलेली दिसते. योजनेचा आराखडा तयार न करता कृषी यांत्रिकीकरणासाठी ५० टक्के, २० टक्के क्षेत्र असलेल्या एकात्मिक फलोत्पादन क्षेत्रासाठी ४६ टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते..शिवाय योजनेची माहिती न देता अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना लागू केल्याने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी देखील काही दिवसांपूर्वी काढली होती. त्यामुळे निधीच्या अभावाबरोबर योजना अंमलबजावणीतही अनेक त्रुटी असल्याचे दिसते. एकंदरीतच कृषी समृद्धी ही योजना म्हणजे केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी सुरू केली आहे, अशी या योजनेवर केली जात असलेली टीका सार्थ ठरताना दिसते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.