Mango Blossom Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Production : दर्जेदार हापूस आंबा उत्पादनात हातखंडा

Mango Farming : रत्नागिरी तालुक्यातील रिळ येथील मकरंद काणे हे तरुण आंबा बागायतदार. वडिलोपार्जित आंबा व्यवसायाची धुरा व्यवस्थित सांभाळतानाच नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो.

राजेश कळंबटे

Farmer Planning of Mango :

शेतकरी नियोजन

पीक : हापूस आंबा

शेतकरी नाव : मकरंद दिगंबर काणे

गाव : रिळ, ता. जि. रत्नागिरी

आंबा हापूस क्षेत्र : ३० एकर

रत्नागिरी तालुक्यातील रिळ येथील मकरंद काणे हे तरुण आंबा बागायतदार. वडिलोपार्जित आंबा व्यवसायाची धुरा व्यवस्थित सांभाळतानाच नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो. आंबा उत्पादनामध्ये खत व्यवस्थापन,

रासायनिक फवारणीचे योग्य नियोजन, वातावरणातील बदलानुसार योग्य उपाययोजना करत कलमांची योग्य देखभाल करण्यावर त्यांचा भर असतो. आंबा बागायतीबरोबरच त्यांनी नारळ रोपांचीही लागवड केली आहे. दर्जेदार हापूस आंबा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो.

मागील सहा महिन्यांतील कामकाज

मागील हंगाम संपल्यानंतर साधारण २० जूननंतर बागेतील कलमांना रासायनिक खते देण्यास सुरुवात केली. झाडांचे वय आणि आकारमान लक्षात घेऊन एनपीके, सेंद्रिय व गांडूळ खतांच्या मात्रा ठरविल्या जातात. साधारणपणे ५ ते १२ किलोपर्यंत खतमात्रा प्रति कलम प्रमाणे देण्यात आली. त्याशिवाय ५ ते १० लिटर जिवामृतही दिले.

पावसाचे प्रमाण १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत बऱ्यापैकी असते. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन ३० ते ६० मिलि संजीवक प्रति झाड प्रमाणे पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्यात टाकून घेतले. संजीवकांच्या मात्रा दरवर्षी न देता एक वर्षाआड दिल्या जातात. संजीवकांच्या मात्रा दिल्यानंतर टाळमाती केली जाते.

त्यानंतर बागेतील पालापाचोळा गोळा करून तो झाडाच्या बुंध्यात टाकून घेतला.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबल्यानंतर बागेत साफसफाईच्या कामांना सुरुवात केली जाते. कारण गणेशोत्सव झाल्यानंतर मजूर बागेतील कामांस उपलब्ध होतात. त्यामुळे मजुरांच्या उपलब्धतेनुसार बागेतील कामांचे नियोजन केले जाते.

बागेतील फांदीमर झालेल्या, मोडलेल्या फांद्या कापून घेतल्या. तसेच कलमांचे खोडकिडीच्या प्रादुर्भावासाठी निरिक्षण केले. प्रादुर्भाव दिसून आल्यास खोडकिडा काढून मारला जातो. त्यानंतर शिफारशीनुसार रासायनिक उपाययोजना केल्या जातात.

पावसाळ्यात झाडांवर बांडगुळे येतात. ही वनस्पती झाडांच्या वाढीसाठी धोकादायक असते. त्यामुळे ती काढून टाकली आहे.

बागेची स्वच्छता केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी साधारण ऑक्टोबरच्या अखेरीस घेतली.

या वर्षी ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. कलमांवरील मोहोर सुरक्षित ठेवण्यासाठी दर १२ ते १५ दिवसांनी शिफारशीप्रमाणे फवारण्या करून घेतल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आत्तापर्यंत बुरशीनाशक, कीडनाशकांच्या ४ फवारण्या घेतल्या आहेत.

जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या वेळी मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यात अवकाळी पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत होता. लहान आकाराच्या कैऱ्यांवर डाग दिसू लागले आहेत. त्यावर उपाय म्हणून रासायनिक फवारणी करण्यात आली. प्रादुर्भाव पाहून रासायनिक फवारणीचे नियोजन करण्यात येईल.

आगामी नियोजन

सध्या काही कलमे मोहोराने बहरली आहेत तर काही कलमांवर कैऱ्या लागलेल्या आहेत. पुढील काळात कलमांवर आलेला मोहोर हलवणीस सुरुवात केली जाईल. काळ्या पडलेल्या कैऱ्या काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाईल. हे कामकाज साधारण १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. तर रासायनिक फवारण्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहतील.

पहिल्या टप्प्यातील आंबा साधारण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तयार होईल. तयार झालेला आंबा झेल्याच्या साह्याने काळजीपूर्वक काढून घेतला जाईल. आंबा काढणीवेळी जमिनीवर पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. आंबा देठासकट काढणी करणे गरजेचे असते. देठ तुटला तर फळातील द्रव पसरून फळावर डाग पडतात आणि प्रत खराब होते.

आंबा काढल्यानंतर त्वरित सावलीत आणून ठेवला जातो.

काढलेल्या फळांची प्रतवारी केली जाते. साधारण १८० ग्रॅमपासून ३०० ग्रॅमपर्यंत फळाच्या आकारानुसार प्रतवारी केली जाते. प्रतवारी केल्यानंतर आंबा लाकडी पेटीत भरून बाजारात विक्रीसाठी पाठविला जातो.

दरवर्षी मुंबई, पुणे, अहमदाबाद येथील बाजारात आंबा विक्रीसाठी पाठविला जातो. गतवर्षी सरासरी २३०० पेटी आंबा विक्रीसाठी पाठविला होता. त्यास सरासरी १४०० ते १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

- मकरंद काणे, ९९७०२०२०१० (शब्दांकन : राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT