Human Psychology Agrowon
ॲग्रो विशेष

Human Psychology : योग्य निर्णय कसा घ्यावा?

Decision Making : निर्णय घेणे म्हणजे काय? तर आपल्यापुढे काय काय पर्याय आहेत त्याचा विचार करून योग्य वाटणारा एक पर्याय निवडणं.

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Dr. Anand Nadkarni Article : निर्णय घेणे म्हणजे काय? तर आपल्यापुढे काय काय पर्याय आहेत त्याचा विचार करून योग्य वाटणारा एक पर्याय निवडणं. जेव्हा दोनच पर्याय असतात – एक हवे ते मिळवून देणारा आणि एक नकोसा किंवा अपयश मिळेल असा – तर त्या ठिकाणी निर्णय घेणे खूप सरळसोट, सोपे असते! पण प्रत्यक्षात, बहुतांशी निर्णयात, असे अगदी काळे-पांढरे दोन पर्याय नसतात.

प्रत्येक पर्यायाचे काही फायदे असतात आणि काही तोटे. अशा वेळी खूप गोंधळ उडतो. आपण निर्णय घेणे लांबणीवर टाकत राहतो किंवा पूर्ण विचार न करता निर्णय घेऊन टाकतो. त्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया शिकणे, आत्मसात करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

निर्णय घेणं हा खरं तर आपल्या रोजच्या जगण्याचा अगदी अविभाज्य भाग. सकाळी जाग आली की लगेच उठायचं, की अजून थोडा वेळ पांघरुणात लोळायचं, इथपासून कर्ज कुठून आणि किती काढायचं, सोयाबीन आता विकावं की दोन महिने थांबावं, असे अनेक छोटे मोठे निर्णय आपल्याला सतत घ्यावे लागतात. काही फार विचारपूर्वक, तर काही अगदी सहजपणे, पटकन. बऱ्याचदा ‘घेतलेला निर्णय योग्य तर असेल ना?’ हा विचार रेंगाळत राहतो. नक्की योग्य निर्णय कुठला हे कसं ठरवायचं, ते कळत नाही.

निर्णय घेणे म्हणजे काय? तर आपल्यापुढे काय काय पर्याय आहेत त्याचा विचार करून योग्य वाटणारा एक पर्याय निवडणं. जेव्हा दोनच पर्याय असतात – एक हवे ते मिळवून देणारा आणि एक नकोसा किंवा अपयश मिळेल असा – तर त्या ठिकाणी निर्णय घेणे खूप सरळसोट, सोपे असते! पण प्रत्यक्षात, बहुतांशी निर्णयात, असे अगदी काळे-पांढरे दोन पर्याय नसतात.

प्रत्येक पर्यायाचे काही फायदे असतात आणि काही तोटे. आणि आपल्याला अगदी परफेक्ट, आदर्श असा निर्णय घ्यायचा असतो. अशा वेळी खूप गोंधळ उडतो. आपण निर्णय घेणे लांबणीवर टाकत राहतो किंवा पूर्ण विचार न करता निर्णय घेऊन टाकतो. त्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया शिकणे, आत्मसात करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

एक उदाहरण पाहूया. पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर आपल्याच गावात एक नोकरी मिळते आहे. कंपनी छोटी आहे, पगार बेताचा आहे. मात्र गावातच राहता येणार आहे. दुसरीकडे, जरा मोठ्या कंपनीत, दुसऱ्या शहराच्या जागी जॉब घेतला तर अनुभव, पगार जास्ती असेल. पण मग घर सोडून एकट्याला तिथे राहायला लागेल. हा निर्णय घेताना, दोन्ही पर्यायांत काही फायदे आहेत, तर काही मनाविरुद्ध घडणार आहे.

या दोन्ही पर्यायांची तुलना केली तर त्यात काही व्यावहारिक बाबी (पगार, कंपनी छोटी की मोठी) तर काही भावनिक बाबी (घरीच राहायचे की दूर, जेवण-खाण, परिचित लोक की नवी संस्कृती) आहेत. कुठलाही पर्याय (Choice) निवडला तरी त्यासोबत काही किंमत (Price) द्यावी लागणार आहे. जी किंमत देणं मला कमी त्रासाचे वाटते तो निर्णय मी घेणार. किंमत द्यायची तयारी झाली की तक्रार न करता मी त्या पर्यायची निवड करतो.

मात्र बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं, की ही अशी व्यावहारिक किंवा भावनिक किंमत द्यायला नको, मात्र हवं ते मिळालं पाहिजे. म्हणजे बहुगुणी, आखूडशिंगी आणि खूप दूध देणारी गाय आपल्याला हवी असते! अशा विचाराने आपण निर्णय घेतला तर मात्र त्या निर्णयसाठी आपण इतर कोणाला, परिस्थितीला, नशिबाला किंवा काही वेळा देवालाही दोष देतो.

भावनिक किंमत द्यायची एकदा आपली तयारी झाली, की मग व्यावहारिक किंमत द्यायला फारसा त्रास होत नाही. असा निर्णय जेव्हा एखादी व्यक्ती घेते, तेव्हा त्या निर्णयाचे पूर्ण स्वामित्व, जबाबदारी (Ownership) ती व्यक्ती घेत असते. त्या निर्णयासाठी किंवा नंतरच्या परिणामांसाठी ती व्यक्ती परिस्थितीला किंवा दुसऱ्या कोणाला जबाबदार धरत नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात.

अगदी पुराणकाळातले उदाहरण पाहायचे, तर रामायणातला हा प्रसंग बघा. दशरथ राजाने व्यक्त केलेली इच्छा मानून राम वनवासाला जायला निघाला, तेव्हा कैकेयीच्या महालात तिची भेट आणि आशीर्वाद घ्यायला गेला. खरं तर रामाने वनवासात जावं ही इच्छा कैकेयीचीच. त्यामुळे त्याचे हे वागणे बघून लक्ष्मणाने संतापून त्याला त्याबद्दल विचारले. तेव्हा राम त्याला सांगतो, की अरे, वडिलांच्या इच्छेला मान देऊन वनवासात जायचा निर्णय ‘मी’ घेतला, आता या निर्णयाचे स्वामित्व माझे. त्याबद्दल राजा किंवा कैकेयीमातेला जबाबदार धरणे अयोग्य आहे!

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ रोहिडेश्‍वराच्या साक्षीने, त्याचा आशीर्वाद मागून घेतली. पण या कारणासाठी सर्वस्व झोकून द्यायचा निर्णय मात्र त्यांचा स्वत:चा होता. त्याची पूर्ण जबाबदारी आणि स्वामित्व त्यांनी स्वीकारले आणि निभावले. पावनखिंडीत जिवावर उदार होऊन मुघलांशी लढायचा निर्णय बाजीप्रभूनी घेतला आणि त्याच्यासोबत आलेले परिणामही स्वीकारले.

अगदी आत्ताच्या काळातील एक उदाहरण डॉ.आशिष सातव यांचे. डॉ. सातव गेली अनेक वर्षे मेळघाट येथे आदिवासी लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवतात. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांनी आदिवासी लोकांसाठी त्यांच्या भागात राहून काम करायचं हे ठरवलं होतं. आयुष्यभर आदिवासी भागात राहायचे तर आपल्याला बऱ्याच सोयीसुविधा मिळणार नाहीत, खूप संपत्ती कमावता येणार नाही हे त्यांना ठाऊक होते.

या निर्णयासोबत येणारी व्यावहारिक आणि भावनिक किंमत द्यायची त्यांची पूर्ण तयारी झाली होती. पुढील आयुष्याची पूर्वतयारी म्हणून, कॉलेजात असल्यापासूनच पंखा आणि इतर सोयीसुविधा न वापरणे, कमीत कमी पैशात आपला खर्च भागवणे याची सुरुवात त्यांनी केली होती. आणि प्रत्यक्ष काम सुरू करेपर्यंत हे सारे बदल त्यांच्या अगदी अंगवळणी पडले होते.

प्रत्येक निर्णयात काही फायदा तर काही किंमत द्यावी लागते हे आपण पाहिलं. त्या निर्णयाचा काय परिणाम होईल, ते प्रत्यक्ष निर्णय घेतल्यावर, पुढे घटना जशा घडतील तेव्हाच कळते! ते भले बुरे परिणाम ही झाली किंमत. काही लोक ही किंमत तर देतातच, वरून त्यावर व्याजही भरतात. व्याज म्हणजे काय? समजा एखादा निर्णय फारसा सुखावह ठरला नाही, निवडलेल्या पर्यायाने गैरसोय किंवा त्रास वाट्याला आला;

तर तो त्रास भोगून झाल्यावरही, नंतर अनेक दिवस, महिने, काही वेळा, तर अनेक वर्षं देखील, त्याच त्रासाबद्दल बोलत राहतात. इतरांना आणि परिस्थितीला दूषण देत राहतात, परत परत तो त्रास जिवंत करत रहातात. म्हणजे पहिल्या वेळेस भोगलेला त्रास ही झाली किंमत आणि त्या त्रासाची अशी परत परत उजळणी म्हणजे झालं व्याज.

एखादा पर्याय निवडला की त्याची किंमत द्यावीच लागते, ते अपरिहार्य आहे. पण हे वरचं व्याज भरायचं की नाही हे आपण ठरवू शकतो. झालेल्या त्रासाला कवटाळून, उगाळत न बसता, त्यातून शिकून पुढे गेलो तर असं म्हणता येईल की किंमत तर दिली, पण व्याज नाही देणार!

निर्णय घ्यायला हवेत, घ्यावे लागतात हे खरं. पण काही वेळा मात्र आपल्याला फारसा रुचणारा निर्णय दिसत नसतो. मग आपण निर्णय घेणे लांबणीवर टाकायला लागतो, चालढकल करत राहतो. अगदी गळ्याशी गोष्ट येईपर्यंतही कधी कधी निर्णय घेत नाही. काही जण छोटे निर्णय पटकन घेतात तर मोठे निर्णय घेणे टाळतात.

त्यामागचे कारण हे आपल्या निर्णयाची, त्याच्या भल्या-बुऱ्या दोन्ही परिणामांची जबाबदारी आपल्याला घ्यायची नसते. अशा वेळी, मग कोणीतरी मला काय करू ते सांगा, भविष्य/पत्रिका/ज्योतिष/देवाला कौल असा आधार आपण शोधत राहतो.

इथे हे लक्षात घेऊया, की आपले निर्णय आणि त्यांची पूर्ण जबाबदारी ही आपलीच असते. अगदी इतर कोणाच्या सल्ल्याने आपण चाललो, तरी आपल्यासाठी दुसऱ्या कोणाला निर्णय घेऊ देणे, हा निर्णय तर आपणच करतो ना! कुठलाच निर्णय आपोआप होत नाही. कुठलाही निर्णय न घेणं म्हणजेच आहे त्या स्थितीत तसंच राहणं किंवा होईल ते ते होऊ देणं – हाही एक निर्णयच आहे!

एखाद्या गटाच्या किंवा संघाच्या नेतृत्वाचा भाग म्हणून नेता जेव्हा एखादा निर्णय घेतो, तेव्हा त्या निर्णयाचे परिणाम आणि फायदे त्या संपूर्ण गटाला होत असतात. त्या निर्णयाचे फायदे उपभोगताना, परिणाम भोगायची आणि ती किंमत चुकती करायची तयारी त्या गटातील सर्वांनीच ठेवायला हवी.

संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=eL-Q3XYNx8E

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Heavy Rain: मराठवाड्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

Citrus Farming: संत्रा काढणी होईपर्यंत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

Gram Pnchayat: सोलापूर जिल्ह्यात १८६ ग्रामपंचायतींमधील गुंठेवारी होणार नियमित

Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे; भरणे

Agrowon Podcast: कापसावरील दबाव कायम; मुगाचे भाव घसरले, तोंडलीला उठाव, पेरुची आवक घटली तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT