डॉ. आनंद नाडकर्णी
Dr. Anand Nadkarni Article : ‘मी’च शहाणा असं म्हणणाऱ्याचा हट्टी ‘च’ त्याला अतिशहाणा ठरवतो. हा असा इगो त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींसाठी घातकच ठरतो. त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागते. व्यक्तीची ‘स्व’ची जाणीव किंवा स्वप्रतिमा वास्तवाला धरून असते, ती व्यक्ती आग्रही भूमिकेत असते, जिथे निरोगी आत्मस्वीकार असतो - अशा व्यक्तीचा इगो हा योग्य किंवा निरोगी इगो असतो.
मागील लेखात आपण सहकाराची सूत्रे, सहकारामधील नेतृत्व आणि अनुयायित्व यावर बोललो. सहकाराचे मॉडेल यशस्वी व्हायचे तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यात नेतृत्वाने स्वहित व परहिताची सांगड घालायला हवी. पण इथेच बऱ्याचदा अडचण होते. त्या त्या व्यक्तींचा अहंकार आडवा येतो. आपण म्हणतो ना मग, इतका इगो असेल तर कसा व्हायचा सहकार!
हा इगो म्हणजे नक्की काय? इगो म्हणजे स्वप्रतिमा किंवा स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन. मी माझ्या गुणांकडे कसा पाहतो यावर ठरतं मला किती इगो आहे ते. माझ्याकडे असलेल्या गुणांकडे, क्षमतांकडे वास्तवतापूर्ण पद्धतीने बघितलं, माझ्या क्षमतांबद्दल मला वाटतं त्यानुसार मला अभिप्राय मिळतो आहे, तर आपण त्याला चांगले आत्मभान आणि आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे माझ्या क्षमता, कमतरता यांची यथायोग्य जाणीव असणे.
समजा मी गायक आहे. मी संगीताचं शिक्षण घेतलं आहे, मला मैफिलीत गाण्याचा अनुभव आहे, लोकांना मी गायलेलं आवडतं. म्हणजे माझ्या गाण्याच्या क्षमतेबद्दल आणि माझ्या गाण्याच्या परफॉर्मन्सबद्दल हे झालं माझं म्हणणं. प्रत्यक्षात देखील माझं गाणं ऐकून लोक बहुतेक वेळा चांगला अभिप्राय देतात. मी म्हणतो, की मला गायन चांगल्यापैकी जमतं. तर मग मला स्वत:च्या गण्याबद्दल जे वाटतं आहे ते वास्तवला धरून आहे, मला माझ्या गाण्याच्या कौशल्याबद्दल आत्मविश्वास आहे. मात्र हेच जर मला असं वाटत असेल की - माझ्यासारखा गायक मीच! माझा प्रत्येक परफॉर्मन्स उत्तमच असतो! कौतुक करतात त्यात काय, आहेच मी सध्याचा सगळ्यात भारी गायक! मला कोणी नावं नाही ठेवता कामा! कळतं तरी का काही या लोकांना गाण्यातलं? तर हा झाला अहंकार.
आत्मविश्वास असलेली व्यक्ती सतत शिकत राहते, अधिक उत्तम होण्याकडे, अधिक कुशल होण्याकडे या व्यक्तीचा कल असतो. याउलट अहंकारी व्यक्तीची स्वत:च्या मूल्यमापनाची पट्टी वेगळीच असते. त्याच्या मते तो परिपूर्ण असतो, त्याला शिकण्यासारखं काही उरलेलंच नसतं.
ज्याला इतरांना शिकवतानासुद्धा स्वत: शिकायचं असतं, तशी तयारी असते तो शहाणा!
ज्याचं शिकणं थांबतं आणि ज्याला फक्त शिकवायचंच असतं, ते सुद्धा समोरचे आपल्यापेक्षा कमी आहेत आणि आपण त्यांच्यावर उपकार करतोय या भावनेने - तो अतिशहाणा!
‘मी’च शहाणा असं म्हणणाऱ्याचा हट्टी ‘च’ त्याला अतिशहाणा ठरवतो. हा असा इगो त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींसाठी घातकच ठरतो. त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागते. व्यक्तीची ‘स्व’ची जाणीव किंवा स्वप्रतिमा वास्तवाला धरून असते, ती व्यक्ती आग्रही भूमिकेत असते, जिथे निरोगी आत्मस्वीकार असतो - अशा व्यक्तीचा इगो हा योग्य किंवा निरोगी इगो असतो.
व्यक्ती पॅटर्न ४ म्हणजे आक्रमक भूमिकेवर असेल आणि त्याच्या मते त्याच्यासारखं कोणीच नाही तर अशा व्यक्तीचा इगो हा आजारी इगो असतो.
निरोगी इगो असेल तर त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाची छाप इतरांवर पडते. सतत ‘मी’चं घोडं पुढे न दामटल्यामुळे इतरांकडून शिकायलाही मिळतं.
अहंकारी माणसाला स्वत:बद्दल आतून खूप भारी वाटत असतं. पण हा आंतरिक आनंद तात्पुरता असतो. त्याची पुढील प्रगती खुंटते. त्याला इतरांबरोबर मिळून मिसळून काम करता येत नाही. स्वत:चा इगो कुरवाळण्यासाठी त्याला इतरांकडून सतत कौतुकाची अपेक्षा असते. त्याची ही गरज पूर्ण झाली नाही तर अशी व्यक्ती जास्त आक्रमक होते.
इतर माणसांनी नापसंती दर्शवली की ही व्यक्ती त्यांच्यावरच दोषारोप करते. मग तिथे स्पर्धा, संघर्ष, कलह सुरू होतो. अशाने मग माणसं तुटतात, संघासोबत काम करता येत नाही. त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांचा फायदा ना त्या व्यक्तीला होतो, ना संघाला. इतरांना वाटत राहतं की या माणसाने त्याचा इगो सोडला तर त्याचा किती फायदा होईल. पण तसं त्या व्यक्तीला वाटत नाही!
नम्र दिसणारी आणि वागणारी व्यक्ती अहंकारापासून दूरच असते असं नाही बरं का! काही वेळा वरकरणी नम्र दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील छुपी आक्रमकता असू शकते. आक्रमक भूमिका असताना फक्त स्वत:च्या हितासाठी नम्रतेचा पवित्रा घेणारी व्यक्ती लबाड म्हणायला हवी. ‘स्वहितासोबत परहितासाठी’ असा पवित्रा घेतला तर ती असते चतुराई.
खऱ्या नम्रतेची पहिली पायरी म्हणजे वास्तवाचे भान असणे, दुसरी पायरी म्हणजे स्वत:चा आणि इतरांचा विनाशर्त स्वीकार, तिसरी पायरी म्हणजे कृतज्ञता. या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो खरा नम्र आहे. फळांनी बहरलेलं झाड वाकतं तेव्हा त्याच्याकडे संपत्ती असते आणि तरीही ते नम्र असतं.
स्वाभिमानी माणूस इतरांनी केलेला त्याचा अपमान सहन करणार नाही. पण नेमका कशाविषयी अपमान झालां हे समजून घेऊन तो त्याचं उत्तर देईल. शाब्दिक अपमान केला गेला असेल तर तो ते शब्द मागे घेण्यासाठी आग्रही राहील. प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देईल. तो उलटून दुसऱ्याचा अपमान करणार नाही.
अहंकारी माणसाला आपण दुसऱ्याचा अपमान केला, कधी केला हेही कळणार नाही. अपमान करणं हा जणू तो स्वत:चा हक्क समजेल. स्वत:कडे असलेल्या गोष्टी चढवून सांगितल्या जातात त्याला बढाई मारणे म्हणतात. स्वत:कडे नसलेल्या गुणांविषयी बोलण्याला तोंडच्या वाफा म्हटलं जातं (फेका मारणारा).
स्वत:बद्दल आणि स्वत:कडे असणाऱ्या गुणांबद्दलचे वास्तवाचे भान न उरणे म्हणजे मानसिक आजाराकडे वाटचाल. व्यक्ती जेव्हा स्वत:कडे असणाऱ्या गुणांचं वास्तव भान ठेवून त्यांची वृद्धी करण्याचा प्रयत्न करेल, त्या गुणांची लोकांसाठी असलेली उपयुक्तता लक्षात घेईल तेव्हा तो इगोचा योग्य वापर ठरेल.
अहंकार असणारी व्यक्ती काही ऐकायला, शिकायला तयारच नसते, तर मग काही बदलायची आशाच नको. पण अहंकारी व्यक्ती देखील बदलू शकते, बरं का! कधीतरी चपराक बसल्याप्रमाणे वास्तवाचा आरसा खाड्कन समोर येतो तेव्हा आपला अहंकार सोडायची वेळ खरं तर येते. काही माणसं मात्र असे धडे मिळूनही शिकत नाहीत.
त्यामुळे फक्त बाहेरून धडा मिळवून चालत नाही तर ते आतूनही उमगावं लागतं. अशा वेळी समजुतीचा, स्वीकाराचा आणि शिकवण्याचा हात मिळाला तर ही व्यक्तीसुद्धा बदलू शकते. त्यांच्या इगोचा विस्तार होऊन ते आक्रमकचे आग्रही होतात. कधी जबाबदारी पडली की, कधी अपयश आलं की, तर कधी स्वत:लाच विकासाची गती खुंटल्याची जाणीव झाल्यामुळे असा बदल घडू शकतो.
व्यक्ती स्वत:च्या गुणवत्तेवर एखाद्या ठिकाणी पोहोचते अशा वेळी ती अहंकारी इगोच्या ट्रॅकवर जाण्याची शक्यता असते. मिळवलेल्या यशाकडे बघताना `हे सगळं मी केलं` असा अहंभाव येण्याची शक्यता असते. या उलट त्या यशाकडे बघताना स्वत:च्या श्रमांइतकीच इतरांच्या सहभागाची, मदतीची जाणीव, महत्व असेल तर पाय जमिनीवर राहतील.
कधी कधी लोक उच्चस्थानी बसवतात. त्याने हुरळून जायला झालं तर अहंकाराकडे वाटचाल होईल. इथे व्यक्तीसमोर पर्याय उपलब्ध असतो. मिळालेल्या स्थानामुळे आक्रमक भूमिकेत जायचं की ते नाकारून आग्रही भूमिकेवर ठाम राहायचं. म्हणजेच ‘अहम्’चा आकार कसा सांभाळायचा हे फक्त परिस्थिती आणि इतरांवर अवलंबून नाही, व्यक्ती योग्य तो पर्याय निवडू शकते!
आपल्या प्रत्येकात स्वत:त दडलेला ‘अहम्’चा एक आकार आहे. त्याला बेडकीसारखं इतकं फुगवायचं नाहीये की वास्तवाशी असलेला धागा तुटून जाईल. त्याचं विरुद्ध टोक म्हणजे त्याला पूर्ण सपाटही होऊ द्यायचं नाहीये. थोडक्यात, अहंगंड आणि न्यूनगंड अशा दोन्ही टोकांवर जाण्यापासून स्वत:ला रोखायचं आहे. न्यूनगंड म्हणजे काय आणि त्यावर मात कशी करायची ते पाहू पुढच्या लेखात.
—----------
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=5sAv8ka-Vz4
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.