Women Help For Water Conservation : निसर्गाची जपणूक हे महिलांच्या अंगवळणीच पडलेले आहे. आपल्याला सरपणासाठी म्हणून चार वाळलेल्या फांद्या गोळा करताना महिला दिसत असल्या तरी वृक्षाच्या मुख्य खोडावरच कुऱ्हाड चालणारी महिला तुम्हाला क्वचित अपवादात्मक परिस्थितीतच दिसेल.
उलट वृक्ष वाचविण्यासाठी जी काही महत्त्वाची आंदोलने झाली त्यात महिलाच तुम्हाला आघाडीवर दिसतील. आपल्या दैनंदिन जीवनात नित्योपयोगी अशा शमी वृक्षांना वाचविण्यासाठी खोडांना मिठ्या मारणाऱ्या शेकडो स्त्रियांमुळेच त्या आंदोलनाला ‘चिपको’ हे नाव पडले.
कोणत्याही महिलेला आपल्या घरातील कणग्या विविध धान्यांनी भरलेल्या आवडतात. त्यातून त्या आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवत असल्यामुळे हे सारे अन्न विषविरहित असावे, असाही त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे स्त्रियांचा सर्वाधिक कल सेंद्रिय शेतीकडे असतो.
अनेक राज्यात सेंद्रिय शेती यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचा त्यातील सहभाग. पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन मैलोन् मैल फिरणाऱ्या महिलांनाच पाण्याची खरी किंमत माहिती असते. त्यामुळे जल संवर्धन आणि संरक्षणामध्येही त्यांचे योगदान आदरयुक्त भावनेने सांगितले जाते.
नदीकाठच्या वाळूतून झरा काढून, त्यातील स्वच्छ पाणी लहान वाटीने घागरीत भरून, ती डोक्यावरून घरी आणणारी माझी आई न बोलताच मलाही पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल शिकवून गेली. जेवताना पाण्याने भरलेल्या तांब्याशेजारी असलेले फुलपात्र, माठाचा पाझर झेलणारी मोठी वाटीही भरल्यानंतर वापरायची शिकवण घरच्या स्त्रिया देतात.
माझ्या लहानपणी आमच्या शेतामधील मोटेचे पाणी, गडी माणसांकडून पाटात येई, ते पुढे मळ्यात फिरवण्याचे काम स्त्रियांकडे असे. तिथेही प्रत्येक रोपास आवश्यक तेवढेच पाणी मिळेल, हे त्या पाहत. आपल्या घरादारात असे शिक्षक असताना जलसंवर्धनाची तत्त्वे शिकायला दूर कुठेतरी जायची गरजच काय?
छोट्या छोट्या बाबींचे मोले मोठे...
आज नद्या आटल्या, आड विहिरी कोरड्या पडल्या, तलाव गाळाने भरलेले दिसतात. पाण्याच्या वितरणाची जबाबदारी गाव कुसामधील लहान मोठ्या धरणांनी घेतली. त्यातून नळावाटे पाणी येऊन पडल्यामुळे आपल्याला पाण्याचे मोल समजत नाही. परिणामी, गाव, शहरे आणि महानगरांचे सर्वच व्यवस्थापन विस्कळीत झाले.
जिथे रोज चोवीस तास पाणी असते, ती शहरे एका बाजूला आणि कधीतरी चार आठ दिवसांनी नळाला पाणी येणारी गावे एका बाजूला, पण दोन्हींकडे घरात पाणी साठवून केलेले नियोजन एका क्षणात कोसळून पडते. चक्क शिळे म्हणून चांगले पाणी मोरीत ओतून दिले जाते, हे पाहून मनास वेदना होतात.
स्वच्छ भांड्यामधील व्यवस्थित झाकलेले पाणी खरेच शिळे असते का? जर ते शिळे असेल, तर भूगर्भामधील हजारो वर्षांपूर्वीचे, चक्क रामायण, महाभारतकालीन साठलेले पाणी उपसून आपण वापरतोच ना! आमच्या लहानपणी ‘उष्टे पाणी’ हा शब्दच नव्हता. कारण लहान पेल्यात तहानेएवढेच पाणी घेण्याची शिकवण होती.
जेवणानंतर हात धुतलेले, भांडी घासलेले खरकटे पाणी कधीही मोरीवाटे घराबाहेर जात नसे. एक तर ते परसामधील आळू अथवा केळीला किंवा गोठ्यामधील गाईला मिळत असे. घरचा थंड पाण्याचा माठ तर मोठा होताच, पुन्हा त्यात वाळा टाकलेला असे.
त्यामुळे या माठामधील थंड औषधी पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यात कितीतरी वाटसरू आमच्या घरी येत असत. ‘जलदान हे श्रेष्ठदान’ हे आईनेच मला शिकवले. आज अशी शिकवण आपणास कुठे पाहावयास मिळते? वातानुकूलित कक्षामध्ये बसून फुकट मिळणाऱ्या बाटलीमधील दोन चार घोट पाणी पिणे आणि उरलेले स्वच्छ पाणी तसेच टाकून देणे हे कसले जल व्यवस्थापन?
पूर्वी मुंबई- पुणे- मुंबई जनशताब्दी रेल्वेच्या वातानुकूलित कक्षामध्ये प्रत्येक प्रवाशास एक लिटर पाणी, नाश्ता आणि वाचायला वृत्तपत्रे मिळत. जवळपास एक महिन्याच्या निरीक्षणानंतर माझ्या असे लक्षात आले, की बहुतेक प्रवासी एक दोन घोट पाणी प्यायल्यानंतर बाटली तशीच टाकून देतात.
वृत्तपत्रे अनेक जण तर उघडूनही पाहण्याचे कष्ट घेत नाहीत. नाश्ता खाल्ला तर ठीक, नाहीतर त्यांच्या बॅगमध्ये विश्रांती घेत असे. रेल्वे व्यवस्थापनाबरोबर पाण्याच्या या अपव्ययाबद्दल पत्र व्यवहार केल्यानंतर ते थांबले. आज वंदे भारत या वातानुकूलित रेल्वेत पुन्हा प्रत्येक प्रवाशास पाण्याची एक लिटरची बाटली दिली जाऊ लागली आहे. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!
जल संवर्धन आणि संरक्षणामध्ये नारी शक्तीचे एक उत्तम उदाहरण आपणास आपल्या महाराष्ट्रातच पाहावयास मिळते. कॅरो इंडिया (Caro India) या समाजसेवी संस्थेने इतर स्थानिक २४ संस्था, शासन आणि ९० स्थानिक महिलांना बरोबर घेत गावांच्या टॅंकरमुक्तीसाठी प्रयत्न केले.
त्यांच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यातील सहा दुष्काळग्रस्त गावांतील भूजलपातळी १४ ते १५ फुटांनी वाढवण्यात यश आले. २०१७ मध्ये सुरू झालेल्या या ‘नारी जल’ प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने १.४४ कोटी रुपयांची मदत केली आहे. उद्देश हाच की नारी शक्तीच्या माध्यमातून असाच प्रकल्प माण तालुक्यामधील अजून ३२ तहानलेल्या गावात राबवला जावा.
जल दिवाळी...
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ‘राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन’ या सरकारच्याच एका विशेष योजनेच्या अंतर्गत ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी’ (Women for Water, Water for Women) ही मोहीम राबवली. या वर्षी ७ ते ९ नोव्हेंबर २०२३ या तीन दिवसांसाठी ‘जल दिवाळी’ म्हणून यशस्वीपणे राबवली.
पाणी प्रशासनामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, हा त्याचा त्याचा उद्देश होता. महिलांच्या साह्याने हरवलेले जलव्यवस्थापनास पुन्हा पुनरुज्जीवित करून राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणे. या वर्षीच्या जलदिवाळीमध्ये भारताभरातील महिला बचत गटांच्या १५००० महिलांनी सहभाग नोंदवला. त्यात या महिलांना नजीकचे पाणी शुद्धीकरण केंद्र दाखविण्यात आले. तिथे शुद्ध पाणी कसे ओळखावयाचे ते शिकवले जाते.
आपल्या देशात आज तीन हजारांच्या वर पाणी शुद्धीकरण केंद्रे असून, त्यांची क्षमता ६५ हजार दशलक्ष लिटर पाणी प्रति दिन असताना त्यातून ५५ हजार दशलक्ष लिटर पाणी बाहेर पडते. महानगरामधील काही गृहसंकुले, सुरत शहराची महानगरपालिका यासारखे काही अपवाद वगळता हे सर्व शुद्ध, अशुद्ध पाणी नद्या, नाले, समुद्र आणि खाड्यांमध्ये सोडले जाते. आपल्या देशामधील पाणी व्यवस्थापनाचा हा मोठा पराभवच आहे.
हे सर्व सहज शुद्ध करण्यायोग्य सांडपाणी पुन्हा वापरात आणल्यास धरणावरील ताण कमी होईल. प्रति वर्ष २० ते २५ टक्के पाणी वाचवता येईल. यालाच तर जल व्यवस्थापन म्हणतात. चार पाच दिवस साठवलेले शुद्ध पाणी शिळे म्हणून टाकून देणे कसे चुकीचे, हे सर्वसामान्यांना समजावण्याचे काम भारत सरकारच्या अमृत योजनेतून सुरू आहे. केंद्र शासनाने महिलांचे जल संरक्षण आणि संवर्धनामधील कार्य पाहून या वेळची ही ‘जल दिवाळी’ साजरी केली. त्यात सहभागी झालेल्या सर्व स्त्रिया यापुढे शासनाच्या ‘जलदूत’ म्हणून कार्यरत राहतील, हे विशेष.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.