Water Conservation : जलसंवर्धनाचे ‘सप्तपथ’

Water Shortage : जलसंवर्धन म्हटले की सामान्यतः पाणी साठवणे हाच पर्याय लोकांना आठवतो. गेली बारा वर्षे पाणी संबंधित काम करताना आलेल्या अनुभवानुसार पाणी समस्येसंदर्भात सात प्रमुख प्रकारे काम करणे शक्य असल्याचे जाणवते.
Water Conservation
Water Conservation Agrowon
Published on
Updated on

Water Management : जलसंवर्धन म्हटले की सामान्यतः पाणी साठवणे हाच पर्याय लोकांना आठवतो. गेली बारा वर्षे पाणी संबंधित काम करताना आलेल्या अनुभवानुसार पाणी समस्येसंदर्भात सात प्रमुख प्रकारे काम करणे शक्य असल्याचे जाणवते.

या सात मार्गांनी गेलो तरच मानवजातीसमोरील पाणी समस्येला काही प्रमाणात दूर ठेवता येईल. या शतकाचा विचार करता जागतिक पातळीवर पाण्यासंबंधित दोन महत्त्वाच्या बातम्या वाचल्या की तुम्हाला जलसंवर्धन का महत्त्वाचे ते समजेल.

१) पाण्याची विक्री स्टॉक मार्केटला सुरू झाली.
१ जाने २०२१ पासून कॅलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यात स्टॉक मार्केटला पाणी विक्री सुरू झाली. वास्तविक जंगल व नैसर्गिक अनुकूलता चांगली असूनही तिथे २००६ ते २०१७ अशी अकरा वर्षे दुष्काळ होता. खरेतर अमेरिकेत प्रत्येक राज्यात वॉटर बँक म्हणजेच पाण्याचा राखीव साठा असतो.

मात्र तोही संपल्याने कॅलिफोर्नियाला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. पाणी नियोजनाचा आणखी एक मार्ग म्हणून त्यांनी शेती सिंचनाच्या पाण्याची शेअर मार्केटला खरेदी विक्री. हे लोन पुढील काही दशकांतच जगभर पसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

२) गेल्या वर्षीच आलेली दुसरी बातमी म्हणजे ज्या तीन शास्त्रज्ञांना विभागून भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यात एक जण ९२ वयाचे असून, त्यांनी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनावर व निष्कर्षासाठी या पुरस्कारात त्यांचा समावेश होता. काय होते हे पन्नास वर्षांपूर्वीचे संशोधन, तर ज्या प्रमाणात वातावरणात co२, मिथेन व असे हरितगृह वायू वायू मिसळले जात आहेत, ते प्रमाण असेच राहिले तर लवकरच जागतिक तापमानात वाढ होऊन हवामान बदल घडतील.

त्याचे परिणाम वादळे, महापूर, जंगलांत वणवे, टोकाची तपमान वाढ किंवा तापमानातील घट असे दिसू शकतात. दरम्यानच्या पन्नास वर्षांत त्यांच्या इशाऱ्याकडे जगाने दुर्लक्षच केले. पण आता तीव्र झालेल्या हवामान बदलाच्या स्थितीमध्ये निदान नोबेलच्या निवड समितीतील शास्त्रज्ञांना त्यांची दखल घ्यावीच लागली.

Water Conservation
Water Conservation : गावतलावांचे होणार संवर्धन

आजही पाणी समस्येबाबत अनेक अभ्यासक गोडे पाणी संपणार असल्याचे सांगत आहेत. २०४० पर्यंत पाणी प्रदूषण ही जगातील सर्वांत मोठी समस्या झालेली असेल. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई झाली की आपण गंभीर होतो आणि पावसाळ्यात पुन्हा पूर्ण विसरून जातो. अन्य ठिकाणी पाण्याची टंचाई असली तरी त्याकडे स्थानिक बाब म्हणून दुर्लक्ष करतो.

पण पाण्याची समस्या स्थानिक राहिलेली नसून, ती वैश्‍विक बनत चालली आहे. तिचा संबंध थेट मानवाच्या व सृष्टीच्या अस्तित्वाशी आहे. केवळ जीडीपी, वा शेतकऱ्याच्या उत्पन्नाचाच प्रश्‍न नाही तर थेट संपूर्ण मानवजात व सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. म्हणूनच पाणी संवर्धनाकडे व्यापक व गंभीरतेने पाहायला हवे.

जलसंवर्धन म्हटले, की सामान्यतः पाणी साठवणे हाच पर्याय लोकांना आठवतो. गेली बारा वर्षे पाणी संबंधित काम करताना आलेल्या अनुभवानुसार पाणी समस्येसंदर्भात सात प्रमुख प्रकारे काम करणे शक्य असल्याचे जाणवते.
१) पाणी साठवणे, २) पाणी वाचवणे, ३) पाणी प्रदूषित न होऊ देणे, ४) प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर, ५) पाण्याची गुणवत्ता, ६) पाणी गळती व पाणी चोरी आणि ७) जलज्ञान यज्ञ.

Water Conservation
Water Conservation : गावतलावांचे होणार संवर्धन

१) पाणी साठवणे : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही चळवळ ८० च्या दशकात सुरू होऊन गेल्या ४०-४५ वर्षांत चांगली रुजली आहे. पाणी साठविण्याची चळवळ शासकीय पातळीवर मोठे, मध्यम, लघू धरणे, गाव पातळीवरील तलाव, पाणलोट क्षेत्र विकास, बंधारे येथपर्यंत येऊन थांबली आहे. पण त्यात वैयक्तिक पातळीवर अजून खूप काम होण्याची गरज आहे. विशेषतः विहीर व बोअरवेल पुनर्भरण, शेतातील भूजल भूमिगत चर, रिचार्ज शाफ्ट, शोषखड्डे, शेततळी इ. वर प्रत्येकाने काम केले पाहिजे.

२) पाणी वाचवणे : आपल्या देशातील उपलब्ध पाण्यापैकी ८०-८५ टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. धरणे व पाटबंधारे योजना भरपूर असल्या तरी भौगोलिक रचनांमुळे पाटपाणी मर्यादित भागांनाच उपलब्ध होऊ शकते. सुमारे ८० टक्के शेती ही भूजल व पावसावरच अवलंबून आहे. वनस्पती विज्ञान, माती विज्ञान आणि सिंचनाचे विज्ञान व तंत्रज्ञान बरेच चालले आहे.

त्याचा वापर करून सिंचनाच्या पाण्यातील ८० टक्के पाणी वाचवणे शक्य आहे. त्यासाठी प्रबोधनाची मोठी चळवळ उभारावी लागेल. शेतीसोबतच उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. त्यातही पाणी वाचवायला मोठा वाव आहे. देशातील सर्वच कारखान्यांना २०३० पासून ‘झीरो डिस्चार्ज’ म्हणजे शून्य सांडपाणी ही संकल्पना राबवणे केंद्रीय कायद्याने बंधनकारक असणार आहे.

तसेच घरातील दैनंदिन वापरातही पाण्याचा अनावश्यक, अनाठायी व जीवनशैलीमुळे वाढलेला अपव्यय टाळावा लागणार आहे. पाण्याचा अप्रत्यक्ष वापर ही तपासला गेला पाहिजे. त्याविषयी स्वतंत्र लेखात चर्चा करू.

३) पाणी प्रदूषित न होऊ देणे : पावसाने तलाव भरला, नद्या, नाले वाहिले तरी नंतर काही काळातच त्यास शिल्लक राहते, ते केवळ प्रदूषित पाणी. जलस्रोतांचा परिसर कचरा व राडारोडा टाकण्याची ठिकाणे बनत चालली आहेत. दुर्दैवाने जमिनीवर पडलेली प्रत्येक गोष्ट पावसाळ्यात पाण्याबरोबर ओढा, नदी व तलावात पोहोचते.

चांगले पाणीही प्रदूषित करून टाकते. पाण्याचे प्रदूषण टाळणे म्हणजेच नवे पाणी तयार करणेच मानले पाहिजे. त्यासाठी घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट, मलमूत्र पाण्यात मिसळू न देणे, कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतरच व पाणी शुद्ध केल्यानंतर ओढ्यात वा नदीत सोडणे यासाठी सर्व जनतेनेच आग्रही राहायला हवे.

४) प्रदूषित झालेल्या पाण्याचाही पुनर्वापर : सिंगापूर देशाने मैलामिश्रित व कारखान्यामुळे प्रदूषित झालेल्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात करण्यापर्यंत तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपल्या देशातही सर्व सांडपाणी शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

त्यासाठी मोठमोठ्या टाक्या, यंत्रे, वीज लागते हा गैरसमज आहे. निसर्गातीलच तंत्र व कल्पना वापर करून अल्प खर्चात सांडपाणी विशेषतः मैला पाणी वापरण्यायोग्य स्वच्छ करणे शक्य आहे. देशात किंवा महाराष्ट्रातही अनेक गावांमध्ये असे सांडपाण्याच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान वापरले जात आहे.

५) पाणी गळती किंवा पाणी चोरी :
धरणातून, कॅनॉलमधून, बंद पाइपमधून, नळांमधून पाणी गळती सुरू असते. केवळ शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करणे, सातत्याने देखभाल दुरुस्ती गंभीरतेने करणे यातूनही कोट्यवधी लिटर पाण्याची गळती रोखली जाऊ शकते.

त्यात प्रशासन, लोकसहभाग, तंत्रज्ञ, प्रसारमाध्यमे यांनी पुढाकार घेतला पाहिजे. चुकून होते ती पाणी गळती व मुद्दाम केली जाते ती पाणी चोरी. जलाशयातून, वाहत्या नदीतून, विनापरवानगी पाणी उपसणे ही सुद्धा पाणीचोरीच आहे. त्यावर कायदे, नियम व लोक जागरातून आळा घालावा लागेल. सर्वांत महत्त्वाचे स्वतःला शिस्त लावावी लागेल.

६) पाण्याची गुणवत्ता : पाण्यात काही नैसर्गिक दोष असू शकतात. त्याचा पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. सध्या पाणी प्रदूषणाचा महाभयंकर राक्षस सर्वत्र थैमान घालतोय. त्यातून पाण्याची गुणवत्ता खूप गंभीर पातळीवर पोहोचली आहे. पाण्याच्या गुणवत्तेसाठी काम करावे लागणार आहे.

७) जलज्ञान यज्ञ : हल्ली ‘जलसाक्षरता’ हा शब्द सातत्याने वापरला जात असला तरी ती प्राथमिक गोष्ट आहे. आता पाणी प्रश्‍न इतका व्यापक आणि गहन झाला आहे की केवळ साक्षरतेने काही काम भागणार नाही. तिथे पाण्याविषयीच्या सखोल ज्ञानाची आवश्यकता आहे. या कामाकडे पवित्र यज्ञाप्रमाणे पाहण्याची आवश्यकता आहे.

समाजातील सर्वोच्च शिक्षित व्यक्तीपासून अडाण्यापर्यंत, शहर- ग्रामीण, गरीब- श्रीमंत, शेतकरी-कारखानदार, कलेक्टर- शिपाई, विद्यार्थी-ज्येष्ठ नागरिक सर्वांना या यज्ञात सामील करून घेतले तरच मानवजातीला व सृष्टीला तारणे शक्य होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com