डॉ.व्यंकटराव घोरपडे
पुस्तकाचे नाव : फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी चारा उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान
लेखक : डॉ. सचिन रहाणे, डॉ. संतोष वाकचौरे
प्रकाशक : सौ. भारती रहाणे, वांबोरी, जि.नगर
पाने : ११५
किंमत : २५० रुपये
दूधदरातील चढ-उतार तसेच पशूखाद्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता पशुपालकांना व्यवसायाच्या आर्थिक नियोजनाबरोबरीने दुधाळ जनावरांचे काटेकोर चारा नियोजन व्यवस्थापन आवश्यक आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचा बारकाईने अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. खर्च बचतीमधील महत्त्वाचा भाग म्हणजे ओला आणि सुक्या चाऱ्याचे योग्य नियोजन. यासाठी प्रत्येक पशुपालकाने वर्षभर लागणाऱ्या चाऱ्याचे नियोजन हे स्वतः करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
यंदा कमी झालेला पाऊस, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, उपलब्ध पाणीसाठा याचा विचार केला तर मागील चार महिन्यांपासून राज्यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. निरनिराळे शासन आदेश, जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा चारा वाहतूक बंदी आदेश आणि माध्यमातील बातम्यांमुळे चारा उपलब्धतेबाबत सर्वांना गांभीर्य आले आहे. एका अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये येत्या काळात वाळलेला चारा २५ टक्के, हिरवा चारा ४४ टक्के आणि पशुखाद्यामध्ये ३८ टक्क्यांपर्यंत तूट असणार आहे.
प्रत्येक पशुपालकांच्या वैरणीच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. अनेक पशुपालक वैरणीसाठी राखीव क्षेत्र ठेवत नाहीत. फळबागांचे बांध किंवा गायरानातील निकृष्ट गवताचा वैरण म्हणून वापर करतात. अधून मधून मका, कडवळाचा वापर जोपर्यंत उपलब्धता आहे, तोपर्यंत केला जातो. वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत. साखर कारखाने सुरू झाले की, मोठ्या प्रमाणात ऊस वाढ्याचा वापर केला जातो. बाजरीचे सरमड, मक्याचा वाळलेला चारा काही ठिकाणी गव्हाचे काड, सोयाबीन, तुरीचे भुसकट पशुखाद्यामध्ये दिले जाते. यातून जनावराचे पोट भरते, पण शरीर पोषण होत नाही. दूध उत्पादन आणि आरोग्यावर परिणाम होतो.
पशुपालकांच्या विविध अडचणी लक्षात घेऊन पशुतज्ज्ञ डॉ. सचिन रहाणे आणि डॉ. संतोष वाकचौरे यांनी फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी ‘चारा उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान’ हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकांमध्ये विविध चारा पिकांच्या जाती, उत्पादन पद्धती आणि पीक नियोजनाचे वेगवेगळे पर्याय दिले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चारा प्रक्रिया व साठवणूक तंत्रज्ञानाबाबत सोप्या भाषेत सर्व पशुपालकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. चारा उत्पादन आणि साठवणुकीच्या बाबतीत पशुपालक करत असलेल्या अनेक चुका आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर पुस्तकामध्ये भर दिला आहे. गरजेनुसार तांत्रिक छायाचित्रे पुस्तकामध्ये दिल्याने विषय समजण्यास सोपा झाला आहे. तसेच पशुपोषण आहाराबाबत शास्त्रीय माहितीच्या चौकटी देखील दिलेल्या आहेत.
सध्याच्या पार्श्वभूमीवर योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालक चारा उत्पादनात कसा स्वयंपूर्ण राहील याचा विचार करून या पुस्तकाची मांडणी केली आहे. दोन्ही पशुतज्ज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करत असल्याने त्यांना आलेल्या अनुभवाची जोड दिली असल्यामुळे यातील अनेक बाबी पशुपालकांना दिशादर्शक ठरणाऱ्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.