Book Review : चिकित्सा मराठा समाजाच्या वर्चस्वाची

Dr. Vivek Ghotale Book : मराठा समाजांतर्गत वाढते स्तरीकरण, बहुजनवादी राजकारणाचा ऱ्हास, मराठा मतदार मराठा अभिजन यांच्यातील बहुस्तरीय विभाजनाची सविस्तर चर्चा या पुस्तकात केली आहे.
Dr. Vivek Ghotale Book
Dr. Vivek Ghotale Book Agrowon
Published on
Updated on

योगिराज प्रभुणे

Maratha Community : महाराष्ट्रात मराठा ही वर्चस्वशाली जात आहे. देशातील इतर राज्यांमध्ये मराठ्यांइतकी, म्हणजे ३२ टक्के, वर्चस्वशाली कोणतीही जात नाही. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी पुढं येत आहे. मराठा क्रांती मार्चपासून सुरू झालेला या आरक्षण आंदोलनाचा प्रवास मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापर्यंत आला आहे. मराठा वर्चस्वाचा आकृतिबंध कसा बदलत गेला, यावर डॉ. विवेक घोटाळे यांनी संशोधन केले. त्याचा निष्कर्ष या पुस्तकात वाचकांना अभ्यासता येतो.
देशपातळीवर हरयानामध्ये जाट ही वर्चस्वशाली जात असली, तरीही त्याची तेथील टक्केवारी २० ते २५ टक्के इतकी आहे. गुजरातमध्ये पाटीदार (२० टक्के), कर्नाटकमध्ये लिंगायत (१६ टक्के) आंध्र प्रदेशमध्ये रेड्डी (१० ते १२ टक्के) या वर्चस्वशाली जाती आहेत. महाराष्ट्रात मराठा समाज संख्येनं जास्त असल्यानं साहजिकच राज्याच्या राजकारणावर या जातीचं वर्चस्व अगदी अलीकडच्या काळापर्यंत राहिलं. त्यामुळं मराठा समाज आणि राज्यातील काँग्रेसी राजकारण सुरुवातीपासून या राज्यात एकमेकांना पूरक होतं.

काँग्रेसमध्ये मराठा अभिजन संख्येनं अधिक होते. मोठ्या पदावर हे नेते होते. हेच काँग्रेसच्या वर्चस्वाचं मुख्य कारण ठरलं. नव्वदीच्या दशकानंतर या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला एकामागोमाग एक हादरे बसू लागले. मराठा-कुणबी हा मूलतः शेतकरी. त्यातून शेतीबरोबरच सहकार आणि शिक्षण अशा क्षेत्रात या जातीच्या नेत्यांनी भक्कम पाय रोवले. मात्र देशानं १९९० नंतर नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे देशात जोमानं वाहू लागले.

Dr. Vivek Ghotale Book
Book Review : स्त्रियांच्या वेदनांची ‘कूस’

महाराष्ट्रासारख्या शेती, उद्योग आणि शिक्षणात पुढारलेल्या राज्यात त्याचा वेग सर्वाधिक होता. त्यातून शेतीपुढं नवी आव्हानं उभी राहिली. त्याच वेळी मंडल आयोग आला. इतर मागास वर्गाला (ओबीसी) आरक्षण मिळालं. त्यानंतर हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय होऊन त्याचा झपाट्यानं विस्तार झाला. या सर्व प्रक्रियेत भाजप-शिवसेनेसह बिगर काँग्रेसी राजकीय पक्षांनी नव्यानं उदयास आलेल्या ‘ओबीसी’, दलित, आदिवासी आणि उच्च जाती अशी आघाडी उघडली. त्यातून २०१४ मध्ये मराठा अभिजनांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यश कसं मिळविलं, याचे दाखले या पुस्तकात मिळतात. शिवाय, मराठा समाजांतर्गत वाढते स्तरीकरण, बहुजनवादी राजकारणाचा ऱ्हास, मराठा मतदार मराठा अभिजन यांच्यातील बहुस्तरीय विभाजनाची सविस्तर चर्चा या पुस्तकात केली आहे.

डॉ. घोटाळे यांचे हे पुस्तक त्यांच्या पीएच.डी. प्रबंधावर आधारित आहे. अर्थात, त्याचं पुस्तकात रूपांतर करताना तांत्रिक भाग वगळण्यात आला आहे. त्यामुळं हे पुस्तक फक्त विद्यापीठांमधील संशोधकांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त न ठरता सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि पत्रकारांसाठी उपयुक्त दस्तऐवज ठरला आहे, हे निश्‍चित!
------------------
पुस्तकाचे नाव : मराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे राजकारण
लेखक : डॉ. विवेक घोटाळे
प्रकाशक : युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स, पुणे
पाने : ३४०
मूल्य : ४५० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com