Book Review : बदललेल्या ग्रामजीवनाचा अस्सल दस्तऐवज

Article by Satish Kulkarni : खेड्यापाड्यांची रचना आणि त्यामध्ये राहणाऱ्या विविध समाजघटकांचा सविस्तर आढावा घेणारे पहिले पुस्तक म्हणून त्रिंबक नारायण आत्रे यांचे १९१५ मध्ये प्रकाशित झालेले गाव-गाडा याविषयी सातत्याने बोलले, लिहिले जाते.
Gaavgada Book
Gaavgada BookAgrowon
Published on
Updated on

Gaavgada Book : खेड्यापाड्यांची रचना आणि त्यामध्ये राहणाऱ्या विविध समाजघटकांचा सविस्तर आढावा घेणारे पहिले पुस्तक म्हणून त्रिंबक नारायण आत्रे यांचे १९१५ मध्ये प्रकाशित झालेले गाव-गाडा याविषयी सातत्याने बोलले, लिहिले जाते. त्या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर मूळ संहिता आणि त्यावरील समकालीन समीक्षा, खास लिहून घेतलेले विविध लेख आणि भरगच्च प्रस्तावना यांसह उत्तम संपादन अशी शताब्दी आवृत्ती द. दि. पुंडे यांनी सिद्ध केली.

आत्रे यांच्यानंतर ‘आमचा गाव बदलापूर’ (ना. गो. चापेकर), ‘गावरहाटी’ (वि. म. दांडेकर, म. भा. जगताप), ‘गावगाड्याबाहेर’ ( प्रभाकर मांडे) अशी काही ग्रामजीवनाचा आढावा घेणारी पुस्तके प्रसिद्ध झाली. मूळ पुस्तकाला शंभरी पूर्ण होत असताना हेच सूत्र पकडून अनिल पाटील (सुर्डीकर) यांनी ‘आजचा सुधारक’मध्ये लेख लिहिले. त्याचेच पुस्तक स्वरूप २०१२ मध्ये आले. नुकतीच सप्टेंबर २०२३ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.

अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर अल्पशी शेती करत अनिल पाटील यांनी संपूर्ण आयुष्य याच गावगाड्यात, गावगाड्यासोबत घालवले आहे. जगण्याच्या विविध टप्प्यांवरील अनुभवांचा, गावगाड्यातील गुंतागुंतीबाबत नोंदी या पुस्तकातून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना गावगाड्याबाबत प्रचंड आस्था आहे.

वेगवेगळ्या अडचणी, समस्या, विविध समाजांमधील अंतर्गत ताणेबाणे यांच्या नोंदी घेतानाच ते त्याबाबत आपुलकीने काही उपाय सुचवू पाहतात. हेच त्यांच्या पुस्तकाचे आत्रे यांच्या मूळ गावगाडा पुस्तकापेक्षा वेगळेपण ठरते. कारण आत्रे हे इंग्रजांच्या महसूल विभागात कार्यरत होते. त्यामुळे गावगाड्यासोबत काम करत असताना एक प्रकारे त्रयस्थ वृत्तीने गावगाड्याच्या नोंदी करत जातात.

Gaavgada Book
Book Review : समतेच्या खऱ्या क्रांतीचा उद्‌गाता : महात्मा बसवेश्‍वर

त्यांच्या पुस्तकाची पार्श्‍वभूमी आहे, ती १९०५ मध्ये झालेली बंगालची फाळणी व त्यानंतर स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय काँग्रेससह सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्यामुळे ढवळलेले वातावरण, दुष्काळासारखी अस्मानी संकटे इ. सुर्डीकरांच्या पुस्तकामध्ये सामान्यतः स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये घडत गेलेले बदल, विशेषतः १९९० नंतर खेड्यांची बदलत गेलेली रया टिपलेली दिसते.

हे गाव पश्‍चिम महाराष्ट्रातील असले, तरी दुष्काळी टापूतील असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आपलेच गाव वाटू शकते. गावातील ५०० ते ७०० माणसे जगण्यासाठी बाहेर पडलेली आहेत. त्यांच्या देखभालीअभावी भग्नावस्थेमध्ये चाललेल्या घरी राहिलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांसोबतच शाळेत आलेले संगणक, त्यांच्या दुरुस्तीच्या जाहिरातीचा वेध घेतात.

Gaavgada Book
Book Review : स्त्रियांच्या वेदनांची ‘कूस’

कृषिजनव्यवस्थेतील संस्कृतीविषयी त्यांची व्याख्या खूपच सोपी, सुटसुटीत आहे. ते म्हणतात, ‘‘कोणत्या प्रसंगी व्यक्तीने कसे वागावे, बोलावे, विचार करावा याबाबतीत असलेले संकेत.’’ ही संस्कृती आकारास येते ती धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ताण्याबाण्यातून. गावाच्या जगण्याचा मुख्य आधार शेतीच असल्यामुळे त्यावर आधारलेले हे संपूर्ण जगणे, समाजरचना ते आपल्यासमोर साध्या सोप्या भाषेत मांडत जातात.

ग्रामरचनेमध्ये नव्याने सामील झालेल्या सहकारी सोसायट्या, दूधसंस्था, बॅंक, पतसंस्था यांच्याही नोंदी घेतात. त्यांच्या कामकाजाचीही दखल घेत या व्यवस्था शेतकऱ्यांच्या गरजेतून तयार झाल्या तरी त्यांच्यासाठी कारभार करत नसल्याचे सत्य मांडण्यास विसरत नाहीत. गावगाड्याच्या बंदिस्त व्यवस्थेत दलितांचे प्रचंड हाल होतात, हे जाणून डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या ‘शहराकडे चला’ या हाकेला प्रतिसाद म्हणून गेलेल्या दलितांच्या वाडीचे वर्णन करतात.

एकूणच पिढीजात बलुतेदारी व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या कुटुंबांमध्ये झालेल्या बदलाचीही नोंद घेतात. त्या तुलनेत केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या २५ एकरांच्या मालकाचीही दयनीय अवस्था मांडायला विसरत नाहीत. त्याच्या दयनीय अवस्थेमध्ये त्याचा किती अल्पसा दोष आहे, हे सांगतानाच शेतकऱ्यांना बुद्धी नाही, असे म्हणणाऱ्यांना शेती करण्यासाठी किती प्रखर बुद्धी लागते, हे तितक्याच खणखणीतपणे सुनावतात. गावातील धार्मिक कार्याचे स्वरूप कसे बदलत गेले, हेही सांगतात.

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारल्याचा भास निर्माण करणारे घटक कसे तकलादू आहेत, याचाही मागोवा घेताना झालेल्या सात आठ पंचवार्षिक योजनांचे फलित काय, असाही प्रश्‍न विचारतात. शेतीच फायदेशीर राहिली नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यांची विविध ठिकाणी अडवणूक, नाडवणूक आणि लुबाडणूक करणाऱ्या घटकांचे चित्रणही ते करतात. करार शेती मूळ ठरू शकेल, अशा बेजवाडी शेतीबद्दल माहिती देतात. आज आपल्या गळ्याशी आलेला मजुरांचा प्रश्‍न, त्यांची मानसिकता याविषयीही बोलतात.

स्वातंत्र्यानंतर मिळालेला मताचा अधिकार आणि गावात उभे राहिलेले गटतट, त्यांचे पुढारी, त्यांचे तालुक्यांच्या मोठ्या नेत्यांशी असलेले संबंध, निवडणूक कशी लढवली जाते, यांचे सूक्ष्म तपशील मांडतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या १५ प्रकरणांतून ते या बाबी केवळ नोंदवून थांबत नाहीत, तर त्यावर उपाय सुचवू पाहतात.

समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून गावाचा, शेतीचा अभ्यास करू पाहणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक ठरते. साध्या, सोप्या आणि त्याच वेळी लयपूर्ण अशा गोष्टीवेल्हाळ गद्यशैलीमुळे वाचकांना आपलेसे करून टाकतात. आपल्या घरातील कोणी व्यक्ती आपल्याशी संवाद साधत आहे, असा भास अनेक वेळा होतो. ग्रामव्यवस्थेविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचले पाहिजे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com