Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Harvesting : शास्त्रीय पद्धतीने आंबा काढणी, हाताळणी

Article by Dr. Bhagwanrao Kapse : आपण मशागतीपासून सर्व टप्प्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. तसेच आंबा काढणी आणि हाताळणीमधील आधुनिक तंत्रज्ञानही शेतकऱ्यांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

डॉ. भगवानराव कापसे

Scientific Manner of Mango Handling : वर्षभर व्यवस्थित जोपासना केल्यानंतर हंगामात येणाऱ्या आंबा फळाची काढणीही तितक्याच कौशल्याने करण्याची गरज असते. काढणीनंतर फळांची योग्य हाताळणी ही गरजेचे आहे. या दोन्ही कामांदरम्यान आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचा दुष्परिणाम फळाच्या अंतिम प्रतीवर नक्कीच होतो.

परिणामी, आपले फळ ग्राहकांच्या अपेक्षेला उतरत नाही, त्याचे समाधान करून शकत नाही. यातून होणारे नुकसान केवळ एका हंगामापुरते मर्यादित राहत नाही, तर शेतकरी म्हणून आपल्या ‘ब्रॅण्ड’लाही धक्का पोहोचतो. नंतर पश्‍चात्ताप करीत बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

आंबा निर्यात करावयाचा असल्यास या सर्व बाबी अधिकच काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे सुरुवातीपासूनच जाणून घ्यावीत. कारण आंबा झाडावरून काढून पॅकिंग हाऊसला पाठवताना थोडा जरी निष्काळजीपणा झाला तरी पुढे कितीही काळजी घेतली तरी सुद्धा फळांची प्रत, टिकाऊपणा यावर फार मोठा परिणाम होतो.

पिकल्यानंतर फळावर येणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढते. म्हणूनच काढणी व त्यानंतरच्या सर्व कामांबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे.

फळांची पक्वता

निर्यातीसाठी पूर्ण वाढ झालेली, ठरलेल्या आकाराची फळे काढावीत. अशी फळे ओळखण्याची लक्षणे साधारणपणे पुढील प्रमाणे असतात.

फळाचे देठ खाली जाऊन फळाचे बाजूचे खांदे वर आलेले असावेत. म्हणजे देठाजवळ थोडासा खड्डा पडल्यासारखी परिस्थिती असावी.

फळांची चोच बोथट झालेली असावी. फळ संपूर्ण पक्व झाल्याचा एक आकार आल्यासारखा थोडेफार फुगलेले असावे.

फळावर अगदी बारीक पांढरे ठिपके असतात. हे ठिपके ठळक झालेले आणि मोठी झालेली असावेत.

फळे साध्या पाण्यात बुडवून पाहावीत. ती संपूर्ण बुडाली पाहिजेत. जर ती बुडाली नाहीत, तर त्यांचा फार थोडा भाग वर उघडा असावा.

फळे कापून पाहिल्यास आतील गराला लालसर पिवळी झाक आलेली असावी. अगदीच दुधाळ रंग असल्यास असा आंबा काढण्यास योग्य नसल्याचे समजावे.

फळांचा देठ खाली गेलेला नसेल, खांदे वर आलेले नसतील, फळांची चोच बोथट झालेली नसेल आणि फळे पाण्यात तरंगत असतील तर अशी फळे अपक्व समजावीत. अशी फळे काढणीनंतर योग्य तऱ्हेने पिकत नाहीत.

फळे काढताना त्यांचा बाहेरील रंग थोडा बदलतो. हेही फळ पक्वतेचे लक्षण असू शकते. परंतु कधी कधी उन्हामुळेही बाहेरच्या बाजूस असलेल्या फळांचा रंग बदलू शकतो. हेही तपासून पाहावे. हीच फळे झाडाच्या आतील बाजूस सावलीत असल्यास फळ पक्वतेनंतरही त्यांच्या रंगात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे केवळ रंगावरून पक्वता जाणण्यासाठी अनुभवी व्यक्तीकडून त्याची पाहणी करून घ्यावी.

फळातील एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण (टीएसएस) पाहून सुद्धा फळाची पक्वता ठरवता येते. फळे समुद्रमार्गे परदेशात पाठवायची असल्यास काढणी करताना टीएसएस ७ ते ८ टक्के असावा. हवाई मार्गे पाठवायची असल्यास ती लवकर पोहोचतात. म्हणून त्यांचा टीएसएस आठ ते दहा टक्के असायला हवा. हे तपासण्यासाठी डिजिटल टीएसएस मीटर बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर शेतकरी करू शकतो.

फळांच्या गराचा कठीणपणा सुद्धा ‘फ्रूट प्रेशर टेस्ट’ने मोजूनही फळाची पक्वता ठरवता येते. हे दाब २२ ते २६ पाउंड प्रति चौरस इंच आला असता फळ पक्व असल्याचे समजावे.

या आधुनिक पद्धती असल्या तरी त्या आधी सांगितलेल्या पद्धती सोप्या आणि साध्या असून, कोणत्याही अनुभवी शेतकऱ्यांना फळांची पक्वता तपासण्यासाठी साहाय्यक ठरू शकतात.

झाडावर शाक लागली किंवा पाड लागला म्हणजे त्या झाडावरील सर्वच फळे काढणे योग्य आहेत असे समजू नये. अशा वेळी त्या झाडावरील काही फळे पक्व तर काही अपक्व असू शकतात.

आंबा काढणीची शास्त्रीय पद्धती

फळांची काढणी ही सकाळी सहा ते नऊ किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करावी. या वेळी वातावरण थंड असते. अशा वातावरणात काढलेली फळे पुढे पिकल्यानंतर अतिशय चांगल्या प्रतीची असतात.

फळे काढण्यासाठी स्टीलची कात्री किंवा लहान सिकेटर वापरणे सोयीचे ठरते.

फळे हातानेच काढावे.किंवा झाडे मोठी असल्यास निदान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या खास झेल्याचा वापर करावा. खुडी आणि अन्य कोणत्याही झेल्यांचा वापर शक्यतोवर टाळावा.

फळे काढताना चार ते सहा सेंटिमीटर देठ ठेवून काढावीत. देठ कापताना फळ डाव्या हातात धरून उजव्या हाताने कापावे. महत्त्वाचे म्हणजे कापताना देठास थोडाही झटका बसणार नाही. देठाजवळच्या भागातून बाहेर पडणाऱ्या चिकाचा फळावर डाग पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

फळे काढणाऱ्या व्यक्तीची स्वच्छताही यात फार महत्त्वाची असते. फळे काढल्यानंतर एक एक फळ अगदी अलगद क्रेटमध्ये ठेवावे. अगदी थोड्या अंतरावरूनही फळ आदळू नये.

प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये ओला कपडा निर्जंतुक करून दोन थरांत अंथरून ठेवावा. क्रेटच्या कडेला सुद्धा कपड्याच्या कडा थोड्या वर आलेल्या असाव्यात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे फळे काढणीनंतर फळांना थोडेही ऊन लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी क्रेट लगेच सावलीत न्यावेत.

फळे भरल्यानंतर क्रेट कापडाने झाकून वाहतूक करावयाच्या वाहनापर्यंत आणावे. रिकामे क्रेट सुद्धा उन्हात ठेवू नये. कारण त्याचे तापमान वाढल्यास त्याचे चटके फळाला बसू शकतात. फळे काढल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यांचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

इतकी काळजी घेतल्यास आपल्या आंबा फळांचा दर्जा बाजारपेठेत पोहोचेपर्यंत व त्यानंतर ग्राहकाच्या हाती पडेपर्यंत नक्कीच चांगला राहील, यातशंका नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT