Modern Farming : आधुनिक शेती पद्धती ठरतेय पक्ष्यांसाठी घातक

Pest Control : पक्ष्यांचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्यावरण आणि शेतीचे संतुलन राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. कीड नियंत्रण, परागीभवन आणि बियांचा दूरवर प्रसार यामध्ये पक्ष्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
Bird
BirdAgrowon

किरण देशमुख, डॉ. चिदानंद पाटील

Bird Importance in Agricultutre : ‘पहाट’ हा शब्द जरी कानावर पडला की लगेच धुके, सोनेरी प्रकाश आणि पक्ष्यांचा मोहून टाकणारा किलबिलाट या गोष्टी आठवतात. परंतु गेल्या दशकातील हे चित्र आता दुर्मीळ झालेले आहे. यामागे सर्वांत मोठे कारण म्हणजे पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या. सद्यपरिस्थितीत नष्ट होत चाललेली जैवविविधता हे सर्वांत मोठे संकट आहे. यात पक्ष्यचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन शोध लावणारा मनुष्य दुसरीकडे आपल्याच निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी होताना दिसत आहे. पक्ष्यांच्या थव्याने भरून जाणारे आकाश आज रिकामे दिसते आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे आज पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही एक धोक्याची घंटा आहे.

पक्ष्यांचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्यावरण आणि शेतीचे संतुलन राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. कीड नियंत्रण, परागीभवन आणि बियांचा दूरवर प्रसार यामध्ये पक्ष्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच पर्यावरणातील अविभाज्य घटक म्हणून पक्ष्यांना ओळखले जाते. पक्ष्यांच्या सुमारे ८५०० जातींपैकी देशात एकूण १२०० जातीचे पक्षी आढळतात. पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. फुलांतील मकरंद, फळे, छोटे प्राणी, साप व विविध प्रकारच्या किडी हे पक्ष्यांचे मुख्य अन्न आहे.

आधुनिक शेती पद्धतीत पीक उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक सुधारणांचा वापर अधिक होत आहे. अत्याधुनिक शेती तंत्रामुळे पीक उत्पादनात वाढ झाली, मात्र त्याचे अनेक नकारात्मक परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पक्ष्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट. प्रस्तुत लेखात पक्ष्यांचे शेतीतील महत्त्व आणि आधुनिक शेतीचा पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम याविषयी माहिती घेऊ.

Bird
Modern Agriculture : आधुनिक शेती प्रशिक्षणासाठी तीन संस्थांना अनुदान

शेतीतील पक्ष्यांचे महत्त्व ः

१) कीड नियंत्रण ः

निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात. भारतात कावळा, चिमणी व कबुतर हे पक्षी सर्वाधिक आढळतात.

काही शिकारी पक्षी वगळता बहुतांशी पक्ष्यांचे आवडते खाद्य हे कीटक आहेत. बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती पिकांस हानिकारक असणाऱ्या कीटक आणि इतर सूक्ष्मजीव खातात. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी, अळी, कोष अवस्था देखील खातात. त्यामुळे शेतीमध्ये कीटकांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो.

Bird
Fruit And Vegetable Farming : उच्चशिक्षित तरुणाची शास्त्रोक्‍त, आधुनिक फळे-भाजीपाला शेती

२) परागीभवन ः

पक्षी विविध पिकांसह फुलझाडांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतात.

अनेक वनस्पतीच्या फळे आणि बिया पक्षी खातात. बिया दूरपर्यंत पसरवण्यात आणि वनस्पतींचा प्रसार करण्याचे काम पक्ष्यांद्वारे होते. त्यामुळे आपसुकच वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांच्या भूमिकेला अत्यंत महत्त्वाचे मानता येईल. ही प्रक्रिया अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी, वैविध्यपूर्ण आणि मुबलक अन्न पुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी गरजेची आहे.

३) जैवविविधतेमध्ये हातभार ः

पक्ष्यांची उपस्थिती ही पर्यावरणीय जैवविविधतेमधील महत्त्वपूर्ण घटक आहे. पक्षी हे परिसंस्थेच्या आरोग्याचे सूचक म्हणून संबोधले जातात. पक्ष्यांच्या संख्येतील बदल हे पर्यावरणीय परिस्थितीतील बदलांचे संकेत दर्शवतात. पक्षी सेंद्रिय पदार्थांचे अपमार्जन आणि पुनर्वापर करून अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे योगदान देतात. ही प्रक्रिया मातीची सुपीकता आणि परिसंस्थेची उत्पादकता राखण्यास मदत करते.

आधुनिक शेतीचा पक्ष्यांवर होणारा परिणाम ः

वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा सुनिश्‍चित करण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र आधुनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्वांचा पक्ष्यांच्या संख्येवर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. शेती आणि मानवी वसाहतींमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी आणि अन्न स्रोत कमी होत चालले आहेत.

एकाच पीक पद्धतीचा अवलंब ः

आधुनिक शेतीमध्ये एकाच पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड होते. यामुळे वनस्पती प्रजातींची विविधता कमी होत जाते. परिणामी, पक्ष्यांसाठी उपलब्ध अन्नघटकांची विविध कमी होत जाते. अन्न स्रोत आणि एकूण अधिवासाच्या गुणवत्तेवर परिणामाचा पक्ष्यांची संख्या आपोआपच परिणाम झाल्याचे दिसून येते.

रासायनिक कीडनाशकांचा वाढता वापर ः

आधुनिक शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे पक्ष्यांच्या संख्येला थेट धोका निर्माण झाला आहे. कीडनियंत्रणासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते, मात्र या कीटकांना खाणाऱ्या पक्ष्यांना थेट हानी पोहोचते. तसेच रसायनाची फवारणी केलेली फळे खाल्ल्यामुळे किंवा बिया खाल्यामुळे त्यांना विषबाधा होऊन त्यांची पुनरुत्पादक क्षमता कमी होते. मृत्यूदेखील होतो. ही बाब आपल्या लक्षात येत नाही.

शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरण ः

नांगरणी, कापणी आणि जड यंत्रसामग्रीचा वापर यासह यांत्रिक शेती कार्यपद्धती पक्ष्यांच्या घरट्याला नुकसानकारक ठरू शकतात. जमिनीची मशागत किंवा अन्य शेती कामे करताना विशेषतः जमिनीवर किंवा जमिनीजवळ असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचे नुकसान होऊन त्यांची अंडी घरटी नष्ट होतात.

हवामान बदलाचे परिणाम ः

आधुनिक शेती पद्धतीमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. हे वातावरणातील होणाऱ्या बदलाचे एक प्रमुख कारण आहे. आधुनिक शेती पद्धतीमध्ये विशेषत: कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन या सारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढते. सततचे बदलते हवामान आणि तापमानामध्ये होणारा बदल यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन हंगाम, स्थलांतर पद्धतीवर आणि अन्न संसाधनांच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. ज्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होत आहे.

पक्ष्यांचे संवर्धन काळाची गरज ः

पक्षी हे संतुलित पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. एकूणच शेती आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये पक्ष्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीमध्ये कीड नियंत्रण ठेवायचे असेल तर पक्ष्यांचे अस्तित्व तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी पक्षिसंवर्धन ही काळाची गरज आहे. पक्षी आणि वृक्ष यांचे खूप जवळचे नाते आहे. पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त सुशोभीकरणासाठी झाडे न लावता स्थानिक वृक्षांच्या लागवडीस प्राधान्य दिले पाहिजे.

- पक्षिसंवर्धनासाठी कृत्रिम घरटे ठेवणे, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना निसर्गात योग्य ठिकाणी नेऊन सोडणे. प्लॅस्टिक प्रदूषण, ध्वनिप्रदूषण कमी करणे व बेसुमार वृक्षतोड थांबवून वनसंवर्धन करणे. शेतीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून त्यात कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर तसेच पक्षिथांब्यांचा वापर केल्यास पक्ष्यांचे संवर्धन करू शकतो.

- शाश्‍वत शेतीला चालना देण्यासाठी आणि जैवविविधता राखण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये पक्षी-अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आधुनिक शेती करताना पक्ष्यांचे ही संवर्धन करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यात पक्षी-अनुकूल पद्धतींचा अवलंब, हानिकारक रसायनांचा कमी वापर आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन करणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणाऱ्या शाश्‍वत कृषी पद्धतींचा अवलंब आणि प्रचार करणे गरजेचे आहे. पक्ष्यांच्या संख्येवर आधुनिक शेतीच्या या बहुविध प्रभावांना संबोधित करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. जो शाश्‍वत कृषी पद्धती, अधिवास संवर्धन आणि पर्यावरणीय कारभारावर भर देतो. कृषी आणि जैवविविधता यांचा परस्परसंबंध ओळखून आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध पक्षी प्रजातींसह अस्तित्व वाढविण्याच्या दिशेने कार्य करणे गरजेचे आहे.

- किरण देशमुख, ७७०९८११६१३

(आचार्य पदवी विद्यार्थी, कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

(डॉ. पाटील हे विस्तार शिक्षण संचालक तथा प्रमुख कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com