Indian Agriculture: हिरवळीचे पीक वाढवून जमिनीत गाडणे हा सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्याचा चांगला पर्याय आहे. हलक्या, मध्यम जमिनीत तसेच सामू कमी असणाऱ्या जमिनीमध्ये तागाचे पीक घ्यावे. भारी आणि अतिभारी जमिनीमध्ये तसेच जमिनीचा सामू, क्षार वाढलेल्या जमिनीमध्ये धैंचा लागवड करावी.
ऊस पिकासाठी अन्नद्रव्यांची गरज इतर पिकापेक्षा जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित व शिफारशीप्रमाणे वापर करणे आवश्यक आहे. ऊस पिकासाठी हेक्टरी २५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खताची शिफारस आहे. हिरवळीचे पीक वाढवून जमिनीत गाडणे हा सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्याचा चांगला पर्याय आहे. ही पिके जमिनीत गाडल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि उसाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये मिळतात.
पिकांची निवड
मुळावर गाठी असलेली डाळवर्गीय आणि गाठी नसलेली अशी दोन्ही प्रकारची पिके हिरवळीच्या खतासाठी वापरतात. या दोन पिकांमधील प्रमुख फरक म्हणजे मुळावर गाठी असलेल्या पिकांद्वारे नत्र आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात. मुळावर गाठी नसलेल्या पिकांपासून फक्त सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात.
ताग, धैंचा, गवार, चवळी, डाळ वर्गीय पिके ही मुळांवर गाठी असलेली पिके आहेत. मुळावर गाठी नसलेले गिरिपुष्प (ग्लॅरिसिडिया) हे देखील फायदेशीर हिरवळीचे पीक आहे.
हलक्या, मध्यम जमिनीत तसेच सामू कमी असणाऱ्या जमिनीमध्ये तागाचे पीक घ्यावे. भारी आणि अतिभारी जमिनीमध्ये तसेच जमिनीचा सामू, क्षार वाढलेल्या जमिनीमध्ये धैंचा लागवड करावी.
डाळवर्गीय पिकांव्दारे नत्र पुरवठा
डाळवर्गीय पिकाद्वारे जमिनीला मिळणारा नत्र म्हणजे जमिनीतून पिकाने घेतलेला नत्र अधिक वातावरणातून मुळावरील गाठींच्या साहाय्याने घेतलेले नत्र यांच्या बेरजेएवढा असतो. या पिकांद्वारे जमिनीत मिळणाऱ्या नत्राचे प्रमाण हे पिकाचा वाण, पिकाची वाढ, जमिनीत गाडताना पिकाचे वय या गोष्टींवर अवलंबून असते.
एकंदरीत नत्राच्या २/३ नत्र वातावरणातून घेतलेला असतो आणि उर्वरित जमिनीतून घेतलेला असतो.
खत नियोजन
हिरवळीच्या पिकांची जास्तीत जास्त वाढ कमीत कमी कालावधीमध्ये होऊन ही झाडे कोवळी व लुसलुशीत असणे फार महत्त्व आहे. हा उद्देश सफल होण्यासाठी जमीन चांगली असली पाहिजे. खूपच नापिक झालेल्या जमिनीमध्ये हिरवळीच्या पिकांची वाढ होण्यास खूप वेळ लागतो, उत्पादनही कमी मिळते. डाळवर्गीय हिरवळीच्या पिकांना नत्रयुक्त खते देण्यात येत नाहीत, कारण ही पिके आवश्यक असणारा नत्र वातावरणामधून घेतात.
हिरवळीच्या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी स्फुरद, पालाशयुक्त जोरखते देणे आवश्यक आहे. कारण ही दोन्ही प्रकारची खते मातीतील जिवाणूंना वाढण्यास मदत करतात. तसेच दुसरा फायदा म्हणजे मिळणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये स्फुरदाचे प्रमाण वाढते. यामुळे हिरवळीच्या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकांना स्फुरद जास्त उपलब्ध होते.
पीक अवशेषांचे परिणाम
हिरवळीचे खत पीक शेतामध्ये तयार करून व ते जमिनीत गाडून कुजेपर्यंत पिकाचा एक हंगाम होऊन जातो. या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या हाती पैशाच्या स्वरूपात काहीच मिळत नाही. पण या हंगामामध्ये जितके उत्पादन झाले असते तितके उत्पादन पुढील हंगामामध्ये अधिक मिळण्याची शक्यता कमी असते. परंतु या हिरवळीच्या पिकामुळे पुढील कित्येक हंगामामध्ये घेतलेल्या पिकाचे उत्पादन वाढत असल्यामुळे एका वर्षात जरी नाही तरी दोन चार हंगामात आर्थिक नुकसान भरून निघते.
हिरवळीच्या पिकापासून जास्तीत जास्त फायदा करून घ्यावयाचा असल्यास पीक पेरणीपासून ते जमिनीमध्ये गाडण्यापर्यंत ज्या निरनिराळ्या मशागती कराव्या लागतात त्याबाबतची संपूर्ण माहिती असणे अत्यावश्यक आहे. कारण यावरच पुढचे पीक चांगले येणे अवलंबून आहे.
हिरवळीच्या पिकाची पेरणी अशा वेळी केली पाहिजे, की ते पीक जमिनीत गाडल्यानंतर कुजून पुढील पिकाला त्यापासून जास्तीत जास्त फायदा होईल. पिकाची पेरणी आणि ते जमिनीत गाडणे अशावेळी होणे गरजेचे आहे, की हिरवळीच्या पिकापासून मिळणारी मूलद्रव्ये जमिनीतून निचऱ्याद्वारे किंवा अन्य कारणांनी निघून जाणार
नाहीत. तसेच हिरवळीच्या पिकांची कुजण्याचीही क्रिया होईल.
पेरणीची वेळ
महाराष्ट्रामध्ये ताग (बोरु), धैंचा आणि उडीद तसेच मूग या हिरवळीच्या खत पिकांची पेरणी करण्यास उत्तम वेळ म्हणजे जून किंवा जुलैची सुरुवात ही होय. मॉन्सून चालू होण्याच्या अगोदरच जर पीक जोमदार वाढीस लागले तर मग पुढे येणाऱ्या मॉन्सूनच्या पावसामुळे पीक जमिनीवर लोळणार नाही. त्यामुळे पिकाचे नुकसान होणार नाही.
जून किंवा जुलैमध्ये ताग किंवा धैंचा सारख्या हिरवळीच्या पिकांची सपाट जमिनीवर सलग लागण करता येते. तसेच सरी वरंबा पद्धतीमध्ये सुद्धा हिरवळीच्या पिकांची लागण करता येते.
पीक जमिनीत गाडण्याची वेळ
हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर गाडणे फायदेशीर ठरते. कारण या वेळी पीक साधारणपणे ७ ते ८ आठवड्याचे होऊन भरपूर वाढ झालेली असते. झाडे टणकही झालेली नसतात.
जमिनीत गाडल्यानंतर विविध प्रकारच्या जिवाणूंच्या कार्यामुळे पीक लवकर कुजले जाते. कुजताना त्यात असलेल्या नत्राचे अमोनिकरण आणि शेवटी नायट्रेटमध्ये रूपांतर होते. जमिनीत गाडलेले पीक व्यवस्थितपणे कुजण्यासाठी अनुकूल प्रमाणात ओलावा असणे आवश्यक आहे. तसेच हवेचेही संवहन योग्य झाले पाहिजे.
सुरुवातीला जमिनीमध्ये भरपूर ओलावा असेल तर कठीण पदार्थांचे अर्धअनालीन वितंचन (सेमी अॅनेरोबिक) होऊन ओलाव्याचे प्रमाण कमी होताच सानिल अवस्थेतच नत्राचे नायट्रेटमध्ये रूपांतर होते. यावरून असे दिसून येईल, की पीक जमिनीत गाडले असता जमिनीत ओलावा कमी असेल तर पीक लवकर कुजणार नाही. याचा परिणाम हिरवळीच्या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकाच्या उत्पादनावर निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या पिकाला हिरवळीचे खत पीक व्यवस्थित न कुजल्याने मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात मिळणार नाहीत. नंतर पुढे या पिकानंतर जास्त पावसाळ्यात हिरवळीच्या पिकातून कुजल्यानंतर मूलद्रव्ये जमिनीतून निचऱ्यावाटे निघून जातील. अशा प्रकारे मूलद्रव्यांचा नाश होईल. जर सानिल वितंचन चालू असताना भरपूर पाऊस आला तर तयार झालेला नायट्रेट निचऱ्याद्वारे निघून जाते.
कुजण्याची क्रिया
पावसाचे प्रमाण, पाऊस केव्हा मिळतो.
हिरवळीच्या पिकातील घटकद्रव्ये.
जमिनीतील जिवाणूंना लागणाऱ्या असेंद्रिय अन्नद्रव्यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. पीक जमिनीत किती खोलीवर दाबण्यात आले यावर कुजण्याच्या क्रियेचा वेग अवलंबून राहतो. हलक्या जमिनीमध्ये पीक भारी जमिनीपेक्षा थोडे जास्त खोलवर गाडावे.
हिरवळीचे खत पीक जमिनीत गाडणे आणि दुसरे पीक घेणे यामधील कालावधी फार महत्त्वाचा आहे. सेंद्रिय पदार्थ संपूर्णपणे व्यवस्थित कुजून नत्राचे रूपांतर नायट्रेटमध्ये झाल्यानंतरच दुसऱ्या पिकाची पेरणी करणे योग्य ठरते. हिरवळीचे पीक व्यवस्थित कुजण्यास साधारणतः ७ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागतो. पीक कुजण्यासाठी लागणारा कालावधी हा पिकाचा कोवळेपणा व लुसलुशीतपणा यावर अवलंबून असतो. पीक जर कोवळे व लुसलुशीत असेल तर ते लवकर कुजते कारण जिवाणूंना ते कुजवण्यास जास्त कष्ट घ्यावे लागत नाही.
डॉ. प्रीती देशमुख ९९२१५४६८३१
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.