Grape  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Advisory : द्राक्ष घड जिरण्याच्या विकृतीवरील उपाय

Team Agrowon

डॉ. स. द. रामटेके, आप्पासो गवळी, अमृता लंगोटे

Grape Crop : घड जिरणे ही एक वनस्पती शास्रीय विकृती आहे. घड जिरण्याची समस्या ही काडीमध्ये अन्नसाठा कमी होणे आणि पोस्ट इमर्जन्सनंतर ढगाळ हवामान राहिल्यास उद्‍भवण्याची शक्यता असते.

या वर्षी साधारणपणे सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस झाला आहे. मागील वर्षीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या तसा कमी पाऊस झाला आहे. जेव्हा पाऊस जास्त असतो, त्या वेळी पानांच्या संरक्षणासाठी फवारण्या घेण्यास अडचणी येतात. तसेच सततच्या पावसाळी हवामानामुळे नवीन फुटी येणे चालूच राहते. या सर्व गोष्टींमुळे घडनिर्मिती होण्यास बाधा येते. त्यामुळे घड जिरण्याची समस्या येते. त्याबाबत माहिती घेऊ.

घड जिरणे म्हणजे काय?
- द्राक्ष बागेत हायड्रोजन सायनामाइडचा वापर केल्यानंतर ७ ते १२ दिवसांत फुटी दिसू लागतात. या फुटी निघाल्यावर साधारण एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसण्यास सुरुवात होते. पाच ते सात पाने या अवस्थेमध्ये काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघते. यालाच ‘घड जिरणे’ असे म्हणतात.

घड जिरण्याची विकृती कधी येते?
एप्रिल छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाच्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ऑक्टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. ही विकृती ५ ते ७ पाने या अवस्थेमध्ये घडाचा रंग पोपटी असल्यापासून दिसून येते.

घड जिरण्याची कारणे ः
- घड जिरणे ही द्राक्ष बागेत येणारी एक वनस्पती शास्रीय विकृती आहे. घड जिरण्याची समस्या ही एकतर काडीमध्ये अन्नसाठा कमी होणे आणि पोस्ट इमर्जन्सनंतर ढगाळ हवामान राहिल्यास उद्भवण्याची शक्यता असते.


- घड निघतेवेळी ढगाळ हवामान राहिले तर घडाचे बाळीमध्ये रूपांतर होते व घड जिरतात. द्राक्ष बागेची खरड छाटणी उशिरा झाल्यामुळे अन्ननिर्मिती व अन्नसाठा होण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतो. तसेच खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान राहिल्यास सूक्ष्मघड निर्मिती प्रक्रिया सुरू असते. अशावेळी पेशी विभाजनाची प्रक्रिया होत नाही. याचा परिणाम घड निर्मितीवर होतो.

- ढगाळ वातावरणाच्या स्थितीमध्ये बागेस नत्राची मात्रा दिल्यास पुनरुत्पादक वाढ न होता, वेलींची फक्त शाकीय वाढ होते. त्यामुळे घडाचे बाळीत रूपांतर होऊन घड जिरतात. त्यासाठी ढगाळ वातावरणाच्या स्थितीमध्ये नत्र देणे टाळावे. नये.
- खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ होत राहते. त्यामुळे वेलींमध्ये पुरेशा प्रमाणात अन्नसाठा होत नाही.

द्राक्ष बागेमध्ये छाटणीच्या वेळी वेलीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पांढरी मुळी कार्यक्षम नसल्यामुळे वेलीमध्ये अन्नसाठा कमी होतो. आणि परिणामी घड जिरण्याची समस्या निर्माण होते. पाण्याची कमी उपलब्धता, जमीन भुसभुशीत नसणे किंवा मातीचा दगड होणे इत्यादी कारणांमुळे पांढरी मुळी कार्यक्षम राहत नाही. पांढरी मुळी कार्यक्षम राहण्याकरिता दर तीन वर्षांनी बोध फोडावा लागतो.

लक्षणे ः
फळछाटणी होऊन प्रीब्लूम अवस्थेतील बागेत घड जिरण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. साधारणपणे ५ व्या पानांवर घड निर्मिती होते. परंतु जर बाळी फुटून गॅपमध्ये घडनिर्मिती होत असेल तेव्हा घड जिरतात.

उपाययोजना ः
- खरड छाटणी उशिरा करू नये. योग्यवेळेत छाटणी पूर्ण करावी. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये काडीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल आणि घड जिरण्याची समस्या उद्‍भवणार नाही. योग्य वेळी खरड छाटणी केल्यामुळे घडाचे पोषण चांगले होऊन जास्तीत जास्त घडनिर्मिती होते. खरड छाटणी मार्च महिन्यात घेतल्यास घड जिरण्याची समस्या उद्‍भवत नाही.


- फळछाटणी घेण्यापूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करावी. त्यामुळे कोणत्या डोळ्यावर घड आहे किंवा नाही याचे निदान होते.
- काडी तपासणी अहवालानंतर घड व घडांची संख्या लक्षात घेऊन छाटणी करावी.

- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि रोग-किडींचे योग्य व्यवस्थापन करावे.
- वेलीतील अन्नसाठा संतुलित राहण्यासाठी वेळोवेळी पिंचिंग व टॅपिंग करावी.


- घड निर्मितीसाठी सायटोकायनीन जास्त लागते. त्यासाठी खरड छाटणीनंतर सायटोकायनीन या संजीवकांचा जास्त वापर करावा. त्यासाठी युरॅसिल या रसायनाचा किमान दोन वेळा वापर करावा. घड निर्मितीच्या वेळी ढगाळ वातावरण असेल तरी या संजीवकांच्या वापरामुळे घड जिरण्याची समस्या कमी करणे शक्य होते.


- ऑक्टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावे. त्यामुळे पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. घड जिरण्याची समस्या प्रत्येक वेळी उद्‍भवत असेल, तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ते नियोजन करावे.

तीन पाने अवस्था ः
ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर साधारणपने डोळे फुटल्यानंतर ३ ते ५ पाने ही अवस्था येते. या अवस्थेमध्ये घड निघण्यास सुरुवात होते. ही अवस्था खूप संवेदनशील असते. त्यामुळे या अवस्थेपासूनच घड जिरण्याच्या समस्येस सुरुवात होते. यापूर्वी या अवस्थेमध्ये द्राक्ष बागायतदार ६ BA व CCC यांचा वापर करत होते. परंतु सध्या CCC च्या वापरावर निर्बंध आहे. त्यामुळे CCC चा वापर करणे टाळावे. सोबतच ६ BA किंवा CPPU यांचा वापर बंद ठेवावा.

कारण यांचा वापर केल्यामुळे शाकीय वाढ जास्त होते, तसेच मजबूत घडनिर्मिती होत नाही. साधारण पाच पाने आल्यानंतर GA३ वापराचे वेळापत्रक तयार होते. त्यानुसार पुढील वाटचाल ठेवावी. द्राक्ष बागेमध्ये जीएचा वापर पाकळ्यांच्या वाढीसाठी तसेच मण्यांचा आकार वाढविण्यासाठी केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT