Grape Advisory : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

Grape Management : मागील आठवड्यातील वातावरणाचा विचार करता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्याचे कळते. या पावसामुळे सध्या द्राक्षांच्या विविध अवस्थेतील बागांचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती या लेखात घेऊ.
Grape Advisory
Grape AdvisoryAgrowon
Published on
Updated on


डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय



Grape Crop Management : १) कलम केलेली बाग ः
या बागेत सतत दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे कलम केल्यानंतर निघालेल्या फुटीवरील नवीन पानांना करपा व जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. जुन्या बागेतील करपा रोगग्रस्त फुटी वेळीच काढण्याची शिफारस असते. परंतु सायन काडीवर असलेल्या दोनच डोळ्यातून निघालेल्या फुटींवर रोग आल्यानंतर त्या काढणे हिताचे नसते. म्हणून या फुटींचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे गरजेचे असेल.

उपाययोजना
अ) कलम केलेल्या फुटी वेगवेगळ्या करून घ्याव्यात ः बागेत कलम यशस्वी होण्यासाठी दोन ते तीन खुंटकाडीवर कलम केलेले असते. निवडलेल्या प्रत्येक सायन काडीवर दोन डोळे असतात. म्हणजेच एका ठिकाणी चार ते सहा फुटी निघालेल्या दिसतील. या सर्व काड्या बांबूला बांधलेल्या असल्याने यामधून निघालेल्या नवीन फुटी एकाच ठिकाणी वाढून गर्दी होते. अशा वेळी पाऊस आल्यास करपा व पाऊस संपल्यानंतर वाढलेल्या आर्द्रतेमध्ये डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव सहज होतो.
ब) आवश्यक सशक्त व सरळ जाणारी फूट बांबूला बांधून अन्य फुटी बाजूला कराव्यात. यामुळे गर्दी टाळता येईल. निघालेल्या दोन्ही डोळ्यावर आठ- नऊ पाने झालेल्या अवस्थेत तळातील दोन पाने काढून घ्यावीत.
क) शक्य झाल्यास दोनपैकी फक्त एक सशक्त फूट ठेवून, त्यामधील एक फूट तीन डोळ्यावर खुडून घ्यावी.

ड) ताम्रयुक्त बुरशीनाशक उदा. कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पुढील फवारणी करावी. यामुळे डाऊनी मिल्ड्यूवरील नियंत्रण सोपे होईल.
इ) बागेतील वाढलेली आर्द्रतेनुसार ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. मांजरी वाईनगार्ड २ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा बाजारात उपलब्ध ट्रायकोडर्मा पाच मि.लि. प्रति लिटर पाणी असे प्रमाण ठेवावे. जमिनीतूनही ट्रायकोडर्माची उपलब्धता दोन ते तीन लिटर प्रति एकर या प्रमाणे आठवड्यातून आळवणी किंवा ठिबकद्वारे केल्यास वेलीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
फ) ज्या बागेत नुकतेच कलम केलेले आहे, अशा ठिकाणी डोळे फुगलेले नसल्यास एक टक्क बोर्डो मिश्रणाची फवारणी फायद्याची ठरेल. डोळा कापसलेल्या असल्यास मात्र कॉपर ऑक्सिक्लोराईड १ ग्रॅम आणि मॅन्कोझेब १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे वेगवेगळ्या फवारण्या घ्याव्यात.


Grape Advisory
Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

२) फळछाटणीपूर्वीची बाग ः
बऱ्याचशा बागेत फळछाटणी करण्यासाठी अजूनही उशीर आहे, अशा ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी पानगळीसाठी इथेफॉनची फवारणी केली जाते. ही फवारणी करण्यासाठी उशीर असल्यास व बागेत नवीन फुटी निघालेल्या असल्यास मात्र या वेळी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. बऱ्याच बागेत १५ दिवसात फळछाटणी घ्यावयाची असून, इथेफॉनची फवारणी एक दोन दिवसात करणार आहोत, या निमित्ताने बागायतदार फुटी काढण्याचे टाळतात. इथेफॉनच्या फवारणीनंतरही जुन्या पानांची पानगळ होते. मात्र नवीन पानांची पानगळ होत नाही. इबऱ्याचदा फळछाटणीच्या वेळी रोगग्रस्त फुटींमुळे नवीन फुटी निघताना डाऊनी मिल्ड्यू किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तेव्हा आपल्या बागेतील वातावरण आणि सद्यः स्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा. फळछाटणीला उशीर असल्यास नवीन निघालेल्या कोवळ्या फुटी काढून घ्याव्यात. बागेत एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी पूर्ण कॅनोपी भिजेल अशा प्रकारे करावी. वेलीवर पूर्ण कॅनोपी असलेल्या परिस्थितीत साधारणतः ५०० लिटर द्रावण आवश्यक असेल. पुढील काळातील रोगनियंत्रण सोपे होण्यासाठी बोर्डो मिश्रणाची फवारणी बागेतील कॅनोपी, ओलांडा, खोडावर आणि बोद व शेजारील बांधावरही करून घ्यावी.
पानगळ झाल्यानंतर फळछाटणीच्या पूर्वी ट्रायकोडर्माच्या एक ते दोन फवारण्या काड्या, ओलांडा, खोड व खाली पडलेल्या पानांवर व्यवस्थित कव्हरेज होईल अशा कराव्यात. फळछाटणीनंतर लगेच आणि पोंगा अवस्थेच्या पूर्वी (डोळे फुगलेल्या अवस्थेत) एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी केल्यास पुढील काळातील रोगनियंत्रण सोपे होईल.


३) छाटणी झालेली बाग ः
नुकतीच फळछाटणी झालेल्या बागेत हायड्रोजन सायनामाईडच्या पेस्टिंग केले जाते. या बागेत पेस्टिंग केल्यानंतर लगेच पाऊस झाला असल्यास डोळे फुटतील की नाही, ही शंका बागायतदारांना भेडसावते. त्यामुळे पुन्हा पेस्टिंग करावी का, अशी विचारणा होते. पेस्टिंग झाल्यानंतर चार ते पाच तासानंतर पाऊस झाला असल्यास हायड्रोजन सायनामाईडच्या पुन्हा पेस्टिंगची गरज पडणार नाही. सामान्यतः या कालावधीत द्रावण शोषण चांगल्या प्रकारे झालेले असेल. मात्र पेस्टिंग केल्यानंतर तीन तासाच्या आत पाऊस आलेला असल्यास पुन्हा पेस्टिंग करणे गरजेचे होते. अन्यथा डोळे मागे पुढे फुटतात.
काडीची जाडी, वातावरणातील तापमान यासोबत डोळा फुटण्याची अवस्था पाहून हायड्रोजन सायनामाईडची मात्रा ठरवावी. पावसाळी वातावरण असल्यास किंवा यापूर्वी पाऊस झालेला असल्यास व बागेत रोगाचे बिजाणू असल्यास हायड्रोजन सायनामाईडच्या द्रावणात मॅन्कोझेब चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळून घ्यावे. या स्पर्शजन्य बुरशीनाशकामुळे काडीवरील रोगाचे सुप्त बिजाणू नष्ट होतील.
पोंगा अवस्थेतील बागेत आर्द्रता जास्त प्रमाणात वाढल्यास घड जिरण्याची समस्या जास्त राहील. मुळांच्या कक्षेत पाणी साचल्यामुळे या वेळी बागेत दोन ओळीमध्ये गवत किंवा तण वाढलेले असल्यास आर्द्रता जास्त वाढण्यास मदत होईल. बोदातील मुळांच्या कक्षेतील पाण्यामुळे वेलीत अंतर्गंत जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. वाढलेल्या गवतामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढून काडी व कापसलेल्या डोळ्यांपर्यंत पोचते. कापसलेल्या डोळ्यामधून ही आर्द्रता शोषल्यामुळे अडचणी येतात. घड जिरण्याची समस्या निर्माण होते. यावर पुढील प्रमाणे उपाययोजना करता येतील.

उपाययोजना
- बागेत दोन ओळीमध्ये चारी घेतल्यास बोदातील पाणी बाहेर निघेल व मुळाच्या कक्षेत हवा खेळती राहील.
- वेळीच गवत काढून घेतल्यास बागेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी राहील.
- ६ बीए हे १० पीपीएम आणि ०-०-५० हे खत अर्धा ते एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्वतंत्र फवारण्या करून घ्याव्यात.


डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com