Pune Sugarcane FRP News : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उलटून जवळपास दोन ते अडीच महिने होत आले आहेत. साखर कारखान्यांनी गाळप केल्यानंतर उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) शेतकऱ्यांना देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी ही रक्कम अजूनही दिलेली नसून, जवळपास १८९ कोटी ८५ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम थकित असल्याचे समोर आले आहे.
राज्यात गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला होता, या हंगामात जिल्ह्यातील जवळपास १७ साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांनी सुमारे १ कोटी २६ लाख ६८ हजार ७८३ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १ कोटी २६ लाख ४९ हजार ८७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा सरासरी ९.९९ टक्के एवढा मिळाला आहे.
या सर्व साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे चार हजार ३१९ कोटी ४७ लाख ९५ रुपये एवढी रक्कम होती. त्यापैकी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ४ हजार १२९ कोटी ६२ लाख २ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे.
मात्र अजूनही उर्वरित रक्कम अनेक कारखान्यांकडे बाकी आहे. त्यामुळे ही रक्कम लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांकडून होऊ लागली आहे.
ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊस पुरवठादारांना उसाचे गाळप केल्यापासून चौदा दिवसांच्या आत त्याची रास्त व किफायतशीर किंमत अदा करणे बंधनकारक आहे. परंतु अद्याप या कारखान्याने ही किंमत अदा केलेली नाही.
नुकतेच साखर आयुक्त म्हणून आलेले डॉ. चंद्रकांत कुलगुंडवार यांनी हंगामातील एफआरपी थकविल्याप्रकरणी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार साखर कारखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही, अशा कारखान्यांनी तत्काळ ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी केले आहे.
रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भानुदास शिंदे म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखानदारांपैकी ११ साखर कारखान्यांनी साखर हंगाम संपून ३ महिने झाले तरी अद्यापही एफआरपी पूर्ण दिलेली नाही.
अशा साखर कारखान्यांनी त्वरित व्याजासहित एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी यासाठी रयत क्रांती पक्षाच्या वतीने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत कुलगुंडवार यांना लेखी निवेदन मंगळवारी (ता.१९) दिले आहे.
एफआरपी’प्रमाणे जिल्हानिहाय उसाची थकित रक्कम
कर्मयोगी शंकरराव पाटील... ४८ कोटी ३८ लाख १८ हजार
दौंड शुगर... ३२ कोटी ५२ लाख ८५ हजार
विघ्नहर...२४ कोटी ५९ लाख ८७ हजार रुपये
बारामती अॅग्रो... १७ कोटी ५६ लाख ६८ हजार
घोडगंगा... १७ कोटी ४० लाख ९५ हजार
नीरा भीमा... १४ कोटी
श्री छत्रपती... १० कोटी ६ लाख ४१ हजार
पराग अॅग्रो... १० कोटी २ लाख
श्री साईप्रिया शुगर्स (भीमा)... ५ कोटी ९४ लाख २० हजार
राजगड... ५ कोटी ५४ लाख ८६ हजार रुपये
श्रीनाथ म्हस्कोबा... ३ कोटी ७९ लाख ९३ हजार
साखर कारखानदार शेतकऱ्यांना भूलथापा देऊन दोन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी संमती पत्र लिहून घेतात. याचाच गैरफायदा साखर कारखानदार घेतात. परंतु दोन टप्प्यांतील एफआरपीचे संमती पत्र हे बेकायदेशीर असून, एफआरपी एका टप्प्यात देणे आवश्यक असते. मात्र येत्या ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना थकित एफआरपी व्याजासहित न मिळाल्यास १ जुलै २०२३ पासून रयत क्रांती पक्षाच्या वतीने पहिल्यांदा इंदापूरमधील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यापासून आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात येईल.भानुदास शिंदे, प्रदेश अध्यक्ष, रयत क्रांती पक्ष
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.