Rural Business Story: कृषी व संलग्न उद्योगांमध्ये महिलांचे योगदान वाढते आहे. महिलांच्या प्रयत्नांना शासकीय योजनांचे पाठबळही तितकेच साह्यभूत ठरत आहे. यातूनच अवघे सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विजयमाला गणेशराव देशमुख यांनी यशस्वी उद्योजिका म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे. सोबतच गटातील महिलांनाही उद्यमशीलतेचे धडे देऊन पाठबळ देत आहेत.
वाशीम जिल्ह्यातील करडा (ता. रिसोड) हे विजयमाला गणेशराव देशमुख यांचे मूळ गाव. मात्र, उद्योगासाठी त्या रिसोडला येऊन स्थिरस्थावर झाल्या. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून यशस्वी उद्यमशीलतेचा आदर्श उभा केला आहे. २०१८ मध्ये केवळ १० हजार रुपयांच्या भांडवलामध्ये त्यांनी ‘गुरुप्रसाद गृहउद्योग’ सुरू केला. आज या गृहोद्योगाची वार्षिक उलाढाल १० लाखांपर्यंत पोचली आहे. ग्रामीण महिलांसाठी त्यांचे उदाहरण प्रेरणादायी आहे.
विजयमाला देशमुख उमेद अभियानांतर्गत ‘महात्मा गांधी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या’ सदस्य झाल्या. या माध्यमातून त्यांना उद्योगवाढीसाठी आवश्यक कौशल्ये आणि माहिती मिळून लागली. त्यानंतर वाशीम कृषी विज्ञान केंद्रांतर्गत आर्या (Attracting and Retaining Youth in Agriculture - ARYA) प्रकल्पांतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. येथूनच त्यांची उद्योजिकतेकडे वाटचाल सुरू झाली.
या प्रशिक्षणादरम्यान त्यांना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ या योजनेअंतर्गत अर्ज केला आणि व्यवसाय विस्तारासाठी ५ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या आधारे त्यांनी उद्योगाचा विस्तार करत कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रांतर्गत ‘क्षमता बांधणी व अन्न प्रक्रिया उद्योग’ या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
उत्पादन प्रक्रिया व विपणन
विजयमाला यांनी उद्योगाच्या प्रारंभी सोयाबीनवर आधारित सोया चकली, सोया शेव या सारख्या विविध पदार्थांचे उत्पादन सुरू केले. उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवण्यासाठी त्यांनी केव्हीके व उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाखाली महालक्ष्मी सरस, ॲग्रोटेक, उमेदच्या प्रशिक्षणात राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये सातत्याने सहभाग घेतला. तेथे उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी पॅकिंग व ब्रँडिंगसाठी अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
उल्लेखनीय यशामुळे उमेद अभियानामार्फत एका मराठी वाहिनीवरील ‘घे भरारी’ या कार्यक्रमासाठी त्यांची निवड झाली. या कार्यक्रमातून त्यांना ४ लाख रुपये निधी प्राप्त झाला. त्याची गुंतवणूक उत्पादनांचे दर्जात्मक पॅकिंग आणि ब्रँडिंग करण्यासाठी केली. उद्योगाचा विस्तार झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
रोजगार निर्मिती
सुरुवातीला सोयाबीनवर आधारित पदार्थांचे उत्पादन सुरू केले. सध्या शेंगदाणा लाडू, चिक्की, तीळ लाडू, मेथी लाडू तसेच चिवडा, बालूशाही, भाजीची शेव, उन्हाळ्यातील घरगुती पदार्थ तयार करतात. गटातील सात व इतर १० महिला अशा एकूण १७ महिलांना त्यांनी रोजगार निर्माण करून दिला आहे. तयार उत्पादनांची प्रदर्शने, खेडोपाडी दुकानात तसेच ग्राहकांना विक्री केली जाते. सध्या उद्योगाची दर महिन्याला ७० ते ८० हजारांची उलाढाल होत आहे. मजुरी, कच्चामाल खर्च वजा जाता १५ हजारांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. व्यवसायाच्या या घौडदौडीत पती गणेशराव देशमुख यांचे मोठे पाठबळ मिळत असल्याचे विजयमाला देशमुख सांगतात.
विजयमाला देशमुख ८८८८० ०९७५४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.