Chiku Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Chiku Processing : चिकूपासून बर्फी, सिरप, सरबत

Chiku Fruit : चिकू फळापासून विविध खाद्य पदार्थ तयार करता येतात. चिकूपासून तयार केलेली बर्फी , आरटीएस, सिरप या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

Team Agrowon

व्ही. आर. चव्हाण, पी. जी. पवार

Food Items from Chiku Fruit : चिकू फळापासून विविध खाद्य पदार्थ तयार करता येतात. चिकूपासून तयार केलेली बर्फी , आरटीएस, सिरप या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. ही उत्पादन घरगुती पातळीवर तयार करता येतात.

चिकू फळावर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. या पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. चिकू पावडरचा उपयोग मिल्कशेक, आइस्क्रीम इत्यादी पदार्थ तयार करताना होतो.

उन्हाळ्यात चिकू स्क्वॅश तसेच सरबतला चांगली मागणी असते. चिकू फळाच्या मूल्यवर्धनातून बाजारात आवक वाढल्यामुळे कमी भाव मिळून होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. तसेच मूल्यवर्धनातून नवीन रोजगारनिर्मिती चालना मिळेल.

बर्फी

चिकूचा रस काढून झाल्यावर उरलेल्या चोथ्याचा वापर करून बर्फी तयार करता येते. वनस्पती तुपामध्ये एक किलो चिकू चोथा, ५० ग्रॅम मका पीठ व ५० ते १०० ग्रॅम दूध पावडर मिसळून मिश्रण तयार करावे. मिश्रण मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. मिश्रण शिजवताना त्यात २ किलो साखर घालून घ्यावे.

मिश्रण शिजत असताना सतत ढवळत राहावे. साधारण ८० ते ८२ अंश ब्रिक्सपर्यंत येईपर्यंत शिजवावे. मिश्रण गरम असताना वनस्पती तूप लावलेल्या ताटात ओतावे. त्यानंतर २ ते ३ तास थंड होण्यास ठेवून द्यावे. मिश्रण थंड झाल्यावर एकसारख्या आकाराचे काप करावेत. त्यानंतर पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात साठवून ठेवावे.

आरटीएस पेय

प्रमाणकानुसार फळांपासून सरबत बनविण्याकरिता कमीत कमी १० टक्के लगदा किंवा रस, १० ते १५ अंश ब्रिक्स एकूण विद्राव्य घटक आणि ०.३ ते ०.४ आम्लता असणे आवश्यक आहे. चिकूपासून सरबत बनविण्याकरिता परिपक्व झालेली फळे निवडावीत. फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. फळांची साल व बिया वेगळ्या करून मिक्सरच्या साह्याने फळांचा लगदा करून घ्यावा.

लगद्यामध्ये दोन तासांसाठी ०.२ ते ०.३ टक्का पेक्टिनेज टाकून त्यानंतर हा लगदा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. तयार रस हा सरबत, स्क्वॅश आणि सिरप बनविण्याकरिता वापरता येतो. एक किलो पेय तयार करण्यासाठी १०० ग्रॅम चिकू रस अधिक १५० ते १६० ग्रॅम साखर, २.५ ते ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि पाणी मिसळून घ्यावे.

मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव करावे. त्यानंतर मलमलच्या कापडातून मिश्रण गाळून घ्यावे. शेगडीवर मंद आचेवर साधारण ८५ ते ९० अंश सेल्सिअस तापमानास २० मिनिटे मिश्रण उकळून घ्यावे. मिश्रण गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून थंड ठिकाणी साठवणूक करावी. तयार सरबत जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात सोडिअम बेन्झोएट हे परिरक्षक वापरावे.

सिरप

चिकू सिरप बनविण्यासाठी एक किलो चिकू रसामध्ये दोन किलो साखर व सहा ग्रॅम सायट्रिक आम्ल घालावे. मंद आचेवर हे मिश्रण ठेवून सतत ढवळत राहावे. साधारण ६५ अंश ब्रिक्स चाचणी येईपर्यंत मिश्रणाला उष्णता देणे सुरु ठेवावे. मिश्रणात सोडिअम बेन्झोएट प्रति किलो ६१० मिलि प्रमाणे घालावे. तयार सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये योग्य तापमानावर साठवावे. सिरपचा वापर करताना त्यात चार ते पाच पट पाणी टाकून घ्यावे.

- व्ही. आर. चव्हाण, ९४०४३२२६२३

- पी. जी. पवार, ९७६४७९४९६९

(एमजीएम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीत पशुधनाची काळजी

Bail Pola Festival : जपा बैलांचे आरोग्य...

Soybean Crop Protection: जोरदार पावसानंतर सोयाबीन पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन

Pomegranate Farming : डाळिंब शेतीत राज्यासाठी आदर्श ठरले पन्हाळे बंधू

Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT