Chiku
ChikuAgrowon

Chiku Value Addition : चिकू फळपिकाचे मूल्यवर्धन

Chiku : चिकू हे जमीन आणि हवामानाच्या बाबतीत फारसे चोखंदळ नसलेले फळपीक आहे. कमी पाण्यावर, कमी खर्चात हमखास उत्पादन या फळपिकापासून मिळते.
Published on

व्ही. आर. चव्हाण, पी. जी. पवार

Chiku Foods : चिकू हे जमीन आणि हवामानाच्या बाबतीत फारसे चोखंदळ नसलेले फळपीक आहे. कमी पाण्यावर, कमी खर्चात हमखास उत्पादन या फळपिकापासून मिळते. चिकू फळाची साल व बियांच्या व्यतिरिक्त जवळपास ९० टक्के भाग खाण्यायोग्य असतो.

चिकूच्या खाण्यायोग्य १०० ग्रॅम गरामध्ये किंवा लगद्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. चिकू फळाच्या गरामध्ये थायमीन, रायबोफ्लॅविन आणि जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात आढळतात. तपकिरी रंगाचे पूर्ण परिपक्व चिकू फळ विविध मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीसाठी वापरले जाते.

चिकू हे फळ नाशिवंत असून काढणीपश्‍चात पाच ते सात दिवसांत खराब होते. काढणी केल्याच्या तीन ते चार दिवसांनंतर फळांतील पाण्याचे प्रमाण कमी होऊन साल आकुंचित होते. त्यामुळे फळांचा दर्जा खालावतो. अशा फळांना बाजारातही कमी किंमत मिळते.

तसेच अशी फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. अशावेळी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी चिकू फळावर प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करणे फायद्याचे ठरते. चिकूपासून रस, सरबत, स्क्वॅश, सिरप, भुकटी, बर्फी, कॅण्डी असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. असे प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त काळ टिकतात.

Chiku
Chiku Cultivation Success Story : सहा एकर चिकू बागेतून भरभरून गोडवा

वाळविलेल्या फोडी आणि पावडर

यासाठी चांगल्या पिकलेल्या फळांची निवड करावी. प्रथम फळे स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करावीत. त्यानंतर फळांची साल स्टेनलेस स्टीलच्या चाकूने काढून घ्यावी. फळाच्या उभ्या फोडी करून घ्याव्यात. नंतर त्या फोडींना गंधकाची दोन ग्रॅम प्रति किलो फळे या प्रमाणात धुरी द्यावी. धुरी दिलेल्या फोडी ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला सुकवून घ्याव्यात.

वाळविलेल्या फोडी उत्तम दर्जाच्या पॉलिथिन बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवाव्या. या फोडी दळण यंत्रात टाकून त्यापासून पावडर तयार करता येते. तयार पावडर कोरड्या वातावरणात चाळणीतून चाळून पॉलिथिन बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये साठवावी.

Chiku
Chiku Processing : साठीतील साठे यांचे प्रक्रिया मूल्यवर्धन

जॅम

चिकूपासून जॅम बनविण्यासाठी मध्यम परिपक्व ते पूर्ण पिकलेल्या टप्प्यामधील फळे घ्यावीत. ही फळे पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावरील साल व बिया काढून घ्याव्यात. फळांचा गर काढून त्याचा लगदा तयार करावा. प्रमाणकानुसार जॅममध्ये एकूण विद्राव्य घटक कमीत कमी ६८ टक्के असणे आवश्यक आहे.

त्यानुसार एक किलो चिकूच्या लगद्यासाठी अंदाजे एक किलो साखर व दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून शिजवून घ्यावे.मिश्रण शिजवत असताना त्यास सतत ढवळत राहावे. जेणेकरून मिश्रण एकसंध शिजले जाईल. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात सोडिअम बेन्झोएट ०.४ ते ०.६ ग्रॅम हे परिरक्षक प्रति किलो जॅम या प्रमाणात थोड्या पाण्यात विरघळवून मिश्रणात टाकावे. जॅम तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी खालील चाचण्या घ्याव्यात.

तयार मिश्रणाचा एक थेंब थंड पाण्यात टाकावा. जर तो थेंब तसाच राहिला तर जॅम तयार झाला असे समजावे. थेंब पाण्यात पसरला जात असेल तर अजून काही वेळ किंवा सकारात्मक चाचणी येईपर्यंत मिश्रण शिजवावे.

मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटर या उपकरणाने मोजावे. जर हे प्रमाण ६८.५ अंश ब्रिक्स इतके असेल तर जॅम तयार झाला असे समजावे. तयार जॅम गरम असतानाच निर्जंतुक बाटली भरून थंड होण्यास ठेवून द्यावे. थंड झाल्यावर बाटल्यांना झाकण लावून थंड व कोरड्या ठिकाणी साठवाव्यात.

- व्ही. आर. चव्हाण, ९४०४३२२६२३, - पी.जी. पवार, ९७६४७९४९६९

(एमजीएम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com