Chiku processing : चिकूपासून जॅम, चटणी, पावडर
डॉ. विष्णू गरंडे
Food Processing Industry : चिकू हे नाशवंत व हंगामी फळ असल्याने त्यांची बाजारपेठेत एकाच वेळी आवक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे चांगले दर मिळत नाहीत. अशावेळी चिकू फळांवर प्रक्रिया केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल.
चिकूपासून रस (Chiku Juice), कॅण्डी (Chiku Candy), चटणी (Chiku Chutney), जॅम, वाळलेल्या फोडी, पावडर (Chiku Powder) इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात दरही चांगले मिळतात.
पेये तयार करणे ः
१) चिकूपासून पेये तयार करण्यासाठी प्रथम चिकू फळांचा रस काढावा. त्यासाठी चांगली पिकलेली निरोगी फळे निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळांची साल काढून चाकूच्या मदतीने फळांचे तुकडे करावेत. बिया काढून टाकाव्यात.
चिकूचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून लगदा तयार करावा. लगदा मलमलच्या कापडात बांधून हाताने दाबून रस काढावा. तयार चिकू रसापासून सरबत व सिरप तयार करता येतो.
२) सरबत तयार करण्यासाठी चिकू रस १० टक्के, साखर १२ टक्के व सायट्रिक आम्ल ०.३० टक्के, तर स्क्वॅशसाठी रस २५ टक्के, साखर ४५ ते ५५ टक्के व आम्ल १.५ टक्का आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून घ्यावे.
३) सिरप तयार करण्यासाठी एक किलो रसामध्ये साखर दीड किलो व सायट्रिक आम्ल १५ ते २० ग्रॅम वापरावे.
४) जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी सोडिअम बेंन्झोएटचा वापर करता येतो. त्यासाठी सरबतमध्ये १२० पीपीएम आणि स्क्वॅश व सिरपमध्ये ६०० ते ६१० पीपीएम सोडीयम बेंन्झोएटचा वापर करावा. स्क्वॅश व सिरप तयार करताना अनुक्रमे १/३ आणि १/४ पट थंड पाणी वापरावे.
जॅम ः
पिकलेल्या चिकूपासून उत्तम प्रतीचा जॅम तयार करता येतो. यासाठी १ किलो गरामध्ये साखर ७५० ते ८०० ग्रॅम व सायट्रिक आम्ल १०-१२ ग्रॅम प्रमाणे घालून चांगले मिसळून घ्यावे. हे मिश्रण मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवावे.
मिश्रण शिजत असताना सतत ढवळत राहावे जेणेकरून ते करपणार नाही. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करावा. तयार जॅम निर्जंतुक काचेच्या बरणीमध्ये भरावा. बाटली थंड झाल्यानंतर हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
गोड चटणी ः
साहित्य ः चिकू गर १ किलो, साखर १ किलो, मीठ ५० ग्रॅम, लाल मिरची पावडर २० ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा ६० ग्रॅम, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेले आले, वेलची पावडर, दालचिनी पावडर प्रत्येकी १५ ग्रॅम व व्हिनेगार १०० मिलि.
कृती ः प्रथम पातेल्यामध्ये गर घेऊन त्यात साखर व मीठ मिसळून घ्यावे. मिश्रण मंद आचेवर ठेवून द्यावे. नंतर मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीत सर्व मसाले बांधून ती पुरचुंडी मिश्रणात सोडून द्यावी.
गरम करत असताना पुरचुंडी मध्येमध्ये पळीने दाबावी म्हणजे मसाल्याचा अर्क मिश्रणात उतरण्यास मदत होईल. तयार चटणीमध्ये व्हिनेगार घालावे.
कॅण्डी ः
१) चिकू कॅण्डी तयार करण्यासाठी पिकण्यास सुरुवात झालेली चिकू फळे निवडावीत. पूर्णपणे पिकलेली फळे कॅण्डी तयार करण्यासाठी वापरल्यास कॅण्डी चांगली होत नाही.
२) प्रथम योग्य पक्वतेच्या फळांची निवड करून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. स्टीलच्या चाकूने फळांवरील साल काढून फळांचे सहा भाग करावेत. बिया काढून टाकाव्यात.
या फोडी पहिल्या दिवशी ५० टक्के तीव्रतेच्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी पाकातून फोडी काढून त्यात साखर टाकून पाक ६० टक्के
३) तीव्रतेचा करून त्यात फोडी पुन्हा २४ तास ठेवाव्यात. तिसऱ्या दिवशी पाकातून फोडी काढून त्यात साखर टाकून पाकाची तीव्रता ६८ टक्के करावी. पुन्हा पाकामध्ये फोडी टाकून २४ तास ठेवाव्यात.
पुढील तीन दिवस पाकाची तीव्रता ६७ ते ६८ टक्के राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर फोडी पाकातून काढून पाक निथळून पाण्याने चांगल्या धुऊन घ्याव्यात. आणि पंख्याखाली सावलीत पातळ पसरून २ ते ३ दिवस वाळण्यास ठेवून द्याव्यात. तयार कॅण्डी हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवल्यास ३-४ महिने चांगली राहते.
सुकलेल्या फोडी, पावडर ः
१) चांगली पिकलेली फळे निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. चाकूने त्यांची साल काढून फोडी कराव्यात. बिया वेगळ्या काढून टाकाव्यात. गंधक २ ग्रॅम प्रति किलो फोडी याप्रमाणे दोन तास धुरी द्यावी.
फोडी उन्हात किंवा ५० ते ५२ अंश सेल्सिअस तापमानास कडक कुरकुरीत होईपर्यंत वाळवाव्यात. वाळलेल्या फोडी वजन करून पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भराव्यात. वाळलेल्या फोडी साठवून ठेवण्यासाठी फ्रिज ड्रायर देखील वापरता येतो.
२) वाळविलेल्या फोडी ग्राइंडरमध्ये फिरवून त्याची पावडर तयार करावी. ही पावडर १ मिमी स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतून चाळून घ्यावी.
वजन करून पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून हवाबंद करावी. थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावी. तयार चिकू पावडर मिल्कशेक, आइस्क्रीम व बेकरी उत्पादन तयार करण्यासाठी वापरता येते.
डॉ. विष्णू गरंडे, ९८५००२८९८६, (सहयोगी प्राध्यापक, फळबागशास्त्र विभाग, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, जि. पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.