डॉ. नरेंद्र काशीद
Rice Cultivation Technology :
रोपवाटिका
पेरणीसाठी १ ते १.२० मी. रुंद व ८ ते १० सें.मी. उंच आणि योग्य लांबीचे गादी वाफे तयार करावेत. वाफे बनवताना १ आर क्षेत्रास २५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद व ५०० ग्रॅम पालाश मातीत मिसळावे.
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा थायरमची प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीपूर्वी अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक आणि अझोस्पिरिलिअमची बीजप्रक्रिया करावी.
रोपांच्या वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रतिआर ५०० ग्रॅम नत्र द्यावे.
रोपप्रक्रिया
२५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक दहा लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात रोपे २० मिनिटे बुडवून नंतर पुनर्लागवड करावी.
चिखलणी
चिखलणीमुळे शेतात पाणी साचून राहते.
तण नियंत्रण होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. जमिनीतील कणांतर्गत हवेचे चलनवलन मर्यादित राहते.
चारसूत्री पद्धतीने लागवड
कमी भांडवलात हेक्टरी सरासरी जास्त उत्पादन देणारी कै. डॉ. नारायण सावंत यांनी विकसित केलेली ‘चारसूत्री भात लागवड’ ही पद्धत प्रसिद्ध आहे. त्याची सूत्रे पुढील प्रमाणे...
सूत्र १
भाताच्या अवशेषांतील (तूस व पेंढा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर.
रोपवाटिका व गादीवाफ्यात प्रति चौरस मीटर एक किलो राख ४ ते ७ सेंमी खोलीपर्यंत मातीत मिसळावी.
पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्टरी दोन टन भाताचा पेंढा शेतात गाडून घ्यावा.
फायदे
जमिनीच्या सेंद्रिय पदार्थात वाढ होते. सिलीकॉनमुळे रोपे निरोगी व कणखर होतात. खोडकिड्यांसाठी प्रतिकार क्षमता वाढते.
सूत्र २
गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें.मी. उंचीवर तोडाव्यात.
तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी ६ ते ८ दिवस आधी खाचरात पसराव्यात. चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात नीट मिसळून नंतर रोप लागवड करावी.
फायदे
रोपांना सेंद्रिय नत्र (हेक्टरी १० ते १५ किलो) वेळेवर मिळते.जमिनीची जडणघडण सुधारते.
खाचरांतून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण कमी होते.
सूत्र ३
सुधारित लावणी दोरीवर २५ व १५ सें.मी. अंतरावर आलटून पालटून (२५-१५-२५-१५ सें.मी.) खुणा कराव्यात.
दोरीच्या साहाय्याने १५ सें.मी. अंतरावर (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा.
खाचरात १५ बाय १५ सें.मी. चुडांचे चौकोन व २५ सेंमी चालण्याचे रस्ते तयार होतात.
प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका जागी एक रोप लावावे.
फायदे
बियाण्याची ३० टक्के बचत. कापणीवरील मजुरी खर्च कमी होतो. ब्रिकेट्सचा कार्यक्षम वापर शक्य होतो.
सूत्र ४
पुनर्लागवडीनंतर प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात (युरिया-डीएपी) १ ब्रिकेट हाताने ७ ते १० सें.मी. खोल खोचावी.
एका आरला ६२५ ब्रिकेटस् (१.७५ किलो) पुरेसे आहेत. यातून हेक्टरी ५७ किलो नत्र व २९ किलो स्फुरद मिळते.
फायदे
पाण्यासोबत खत वाहून जात नाही. दिलेल्या खतापैकी ८० टक्के नत्र पिकाला उपलब्ध होते.
डॉ. नरेंद्र काशीद, ९४२२८५१५०५
(कृषी संशोधन केंद्र, वडगाव (मावळ), जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.