Summer Rice Cultivation : ओहोळ, झऱ्यांच्या पाण्यावर सामूहिक उन्हाळी भातशेती

Article by Eknath Pawar : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायगंणी (ता. मालवण) गावाने ओहोळ (व्हाळ), नैसर्गिक झरे आदी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन केलेच. पण त्याचे पाणी पाटाच्या माध्यमातून शेतात आणले. याच पाण्यावर गाव सुमारे २५० एकरांत सामूहिक भातशेती, अर्थात त्यातील सर्व कामे एकत्रित करते आहे.
Rice Cultivation
Rice Cultivation Agrowon

एकनाथ पवार

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं

गुलाब, जाई, जुई मोगरा फुलवीत,

दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी

पाजिते रान सारं, मायेची वयनी....

गानकोकिळा कै. लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ नावाने संगीतबद्ध केलेले आणि गायलेले ‘साधी माणसं’ या चित्रपटातील हे गीत आजही लोकप्रिय आहे. एकेकाळी शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर व्हायचा. काळानुसार सिंचन पद्धतीत नवे तंत्रज्ञान उपलब्ध होत गेले. मात्र राज्यात अशी अनेक ठिकाणे किंवा गावे आजही आढळतात, की जेथे पारंपरिक जलस्रोत किंवा त्या काळातील तंत्राचा वापर करून शेती यशस्वी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील वायगंणी हे त्यापैकीच एक गाव आहे.

वायंगणीची ओळख

बहुचर्चित ‘सी वर्ल्ड’ प्रकल्पामुळे वायंगणी आणि तोडवंळी या दोन गावांची ओळख निर्माण झाली. येथील गावपळण प्रथाही प्रसिद्ध आहे. निसर्गाने गावावर भरभरून प्रेम केले आहे. पश्चिमेकडे अथांग अरबी समुद्र, दक्षिणेला खाडी, उत्तरेला आचरा आणि पूर्वेला चिंदर गाव आहे.

एरवी उन्हाळ्यात कोकणात जेव्हा उष्मा जाणवू लागतो, त्या वेळी या गावात पाऊल ठेवताच गारवा अनुभवास मिळतो. गावचे अर्थकारण भात, नाचणी, नारळ, आंबा, काजू, सुपारी आदी पिकांवर आहे.

Rice Cultivation
Rice Crop Plantation : दुबार हंगामातील लावणीची लगबग

नैसर्गिक जलस्रोतांनी बहरतो देवमळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरिपात ६० हजार हेक्टरवर भात घेतला जाते. उन्हाळ्यात या पिकाचे जेमतेमच उत्पादन असते. परंतु वायंगणी हे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे जेथे मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात भात लागवड होते. तीही संपूर्ण नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करून. गावाच्या पूर्वेकडे पूर्वापार व्हाळ (ओहोळ) आहे.

त्यातून बारमाही झरे वाहत असतात. त्याचेच पाणी पाटाच्या माध्यमातून शेतात आणले जाते. ते संपूर्ण शेतभर फिरविले जाते. गावात पूर्वीपासूनच सामूहिक शेतीची संकल्पना वापरात आहे. ज्या ठिकाणी ही शेती केली जाते त्यास देवमळा संबोधले जाते. या ठिकाणी गावातील बहुतांशी शेतकऱ्यांची जमीन आहे.

...अशी होते सामूहिक शेती

मार्गशीर्ष पौर्णिमा संपल्यानंतर ग्रामबैठक. त्यात उन्हाळी भातशेतीच्या कामांचा आढावा.

ठरलेल्या दिवशी सर्व गावकऱ्यांकडून कामांना सुरुवात. यात पाट बांधणे, वाहून आलेला गाळ उपसा करणे आदी विविध कामांचा समावेश.

मशागतीला सुरुवात होते, त्यापासून मळ्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. एकाच दिवशी एकाच वेळी तेथे तीनशेहून अधिक कुटुंबे एकत्रित काम करतात. हा खूप कुतूहलाचा विषय असतो.

शेतातच ग्रामस्थ रोपवाटिकेचा दिवस निश्‍चित करतात. पौष पौर्णिमेपुढील तीन दिवसांत रोप लागवड दिवसाची निश्‍चिती. पुनर्लागवडीचे पाच टप्पे ठरविले जातात.

पावसाळ्यामध्ये फुटलेले पाट बांधण्याचे काम श्रमदानातून होते. दीड ते दोन किलोमीटर लांबीचा पाट अवघ्या दोन- तीन दिवसांत श्रमदानातून बांधला जातो. त्यातून पाणी वाहू लागल्यानंतर पुढील कामांना सुरुवात होते. कुणा शेतकऱ्यांच्या शेतात पुराचा गाळ साठला असल्यास तो श्रमदानातून काढला जातो.

चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान भात परिपक्व होण्याचा कालावधी येतो. त्या वेळी पुन्हा सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन कापणीचा दिवस निश्‍चित करून हे काम तडीस नेतात. त्या वेळी संपूर्ण मळ्यात आगळे वेगळे दृश्य पाहायला मिळते.

ही सामूहिक शेती पाहण्यासाठी विद्यार्थी, पर्यटक व अन्य लोक दूरवरून येथे भेटी देतात.

Rice Cultivation
Rice Export : तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता

वायंगणी गावची शेती दृष्टिक्षेपात

गावाचे भौगोलिक क्षेत्र - एक हजार ८८ हेक्टर. खरीप भाताखाली २१० हेक्टर क्षेत्र.

उन्हाळी भाताखाली २५० एकर. तीनशे कुटुंबांकडून ही शेती.

भात उत्पादकता - हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल.

खरिपात पांरपरिक, तर उन्हाळ्यात संकरित, सुधारित वाणांची लागवड.

नैसर्गिक स्रोतांवर आधारित सुमारे ३० हेक्टरवर नारळ. साडेतीन हजारांवर नारळ रोपांची लागवड.

प्रति झाड सुमारे १०० नारळ उत्पादन.

सुमारे ४२ हेक्टरवर आंबा, २३ हेक्टरवर काजू लागवड.

उन्हाळी भातशेतीत पाण्यावर जवळपास खर्च नाही.

पाटपाण्याचे काटेकोर नियोजन.

पावसाळ्यात पूर्वेकडील डोंगरभागातून पालापाचोळा शेतात वाहून येत असल्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत.

गावात पारंपरिक नैसर्गिक जीवनशैलीचे विविध नमुने आजही पाहण्यास मिळतात. कुंपणे लाकडी आहेत.

शेतांच्या वाटेवर लोखंडी दरवाजांऐवजी लाकडी आखाडा आहे. पूर्वी तर नांगरणी, चिखलणी झाल्यानंतर बैलांना स्वच्छ धुण्याची जागादेखील निश्चित केलेली होती.

निर्मल ग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्काराने गावाचा सन्मान.

देवमळ्यात होणाऱ्या शेतीतून गावाच्या एकोप्याचे दर्शन घडते. त्यातूनच गावातील

वातावरण आजगायत सलोख्याचे, शांततेचे राहिले आहे.

रूपेश पाटकर, ८४०८०९०९२४ (सरपंच)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com