Shashwat Sendriy Shetikdun Samruddhikde Book:
पुस्तकाचे नाव : शाश्वत सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे
लेखकाचे नाव : डॉ. जयराम पूरकर
प्रकाशक : सौ. विजया पूरकर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक
पृष्ठसंख्या : ४३७
मूल्य : ५४० रुपये
जगभरामध्ये रासायनिक अवशेषमुक्त अन्नांची मागणी वाढत आहे. सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. मात्र एखाद्या नव्याने या शेती पद्धतीकडे वळायचे असल्यास उत्तम मार्गदर्शकांची कमतरता भासते. अशा स्थितीमध्ये कृषी संशोधन व विस्तार कार्याचा तब्बल ४७ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉ. जयराम पूरकर यांचे ‘शाश्वत सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे’ हे पुस्तक मोलाचे ठरणार आहे.
त्यांनी आपल्या अनुभवासह सर्व शास्त्रीय माहितीच्या आधारे सेंद्रिय शेती या विषयाचा सर्वांगीण आढावा या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक सेंद्रिय शेतीच्या व्याख्येपासून सुरू होत असले तरी केवळ सैद्धान्तिक मांडणी करते असे नाही. त्या ऐवजी प्रत्यक्षात अमलात आणता येतील अशा सेंद्रिय शेतीविषयक प्रयोगांची सविस्तर माहिती देते. त्यांच्या कृती व छायाचित्रांसह दिलेली माहिती सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरू शकते.
शेतकरी स्वावलंबी व्हावा, त्याला सन्मानाने जगता यावे, शेती आणि शेतकऱ्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे या प्रामाणिक भावनेतून हे पुस्तक लिहिले असल्याचे डॉ. पूरकर अर्पण पत्रिकेतच नमूद करतात. ‘यशदा’चे उपमहासंचालक व राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.
या पुस्तकात सेंद्रिय शेतीचा परिचय, सध्याच्या शेतीकडून हळूहळू सेंद्रिय शेतीकडे जाण्याचे टप्पे, आच्छादन, पाणी व्यवस्थापन, पीक नियोजन व व्यवस्थापन, पोषण, कीड व रोग व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, मशागत, सेंद्रिय बियाणे क्षेत्राला चालना, पशुसवंर्धन, देशी गाईचे महत्त्व, सूक्ष्मजीवांचा वापर, वनस्पतिजन्य कीडनाशके, मधमाश्यांचे महत्त्व, काढणीनंतरचे व्यवस्थापन, मूल्यवर्धन, सेंद्रिय प्रमाणीकरण आणि विपणन अशा एकूण १८ प्रकरणांमधून सेंद्रिय शेती संदर्भातील व व्यवस्थापनातील बहुतांश सर्व घटकांवर महत्त्वपूर्ण प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
डॉ. पूरकर हे स्वतः कृषी संशोधक आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या अनुभवाला सेंद्रिय शेतीशी संबंधित अनेक जागतिक संदर्भांचा आधार दिलेला आहे. सेंद्रिय शेतीतील महत्त्वाची तत्त्वे, संदर्भ माहितीचे सखोल विश्लेषण त्यांनी केले आहे. त्याचा फायदा नव्याने सेंद्रिय शेतीकडे वळू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकतो. सेंद्रिय शेतीसंदर्भातील व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांसोबतच ग्राहक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरू शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.