
- डॉ. व्यंकटराव घोरपडे
From Dairy Business to Entrepreneurship:
पुस्तकाचे नाव : ए टू झेड डेअरी फार्मिंग
लेखक : डॉ. पराग घोगळे, प्रशांत कुलकर्णी
प्रकाशक : सकाळ मीडिया प्रा.लि., पुणे
पाने : १९६
किंमत : ४०० रुपये
संपर्क : ८८८८८४९०५०
सध्याच्या परिस्थितीत शेती क्षेत्राबरोबरीने पशुपालनातही आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक पशुपालक देखील वेगवेगळ्या मार्गाने दुग्ध व्यवसायवाढीसाठी ज्ञान मिळवताना अनेकांशी चर्चा करताना दिसतात. विविध वेबिनार, प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपस्थित राहून माहिती गोळा करतात. याचा वापर आपल्या दैनंदिन दुग्ध व्यवसाय करून स्वच्छ दूध निर्मितीवर भर देत आहेत. पशुपालकांची नेमकी गरज आणि भविष्यातील दुग्ध व्यवसायातील वाढ डोळ्यासमोर ठेवून डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी यांनी ‘ए टू झेड डेअरी फार्मिंग’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक तांत्रिक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितलेल्या आहेत.
दुग्ध व्यवसायाच्या समोरील मोठे आव्हान म्हणजे जातिवंत दुधाळ जनावरांची उपलब्धता, आरोग्य व्यवस्थापन आणि पशू आहार. डॉ. पराग घोगळे हे स्वतः पशू आहार तज्ज्ञ आहेत. त्यामुळे या बाबींवर त्यांनी अग्रक्रमाने भर दिल्यामुळे पशुपालकांना उपलब्ध घटकांच्यानुसार पशुआहाराचा मार्ग शोधता येणार आहे. पशू आहारावर जवळपास ६५ ते ७० टक्के खर्च होतो, त्यामध्ये निश्चित बचत करता येणार येईल आणि नफ्याचे प्रमाण देखील वाढवणे शक्य होणार आहे.
पुस्तकांमधील विविध विभागाच्या माध्यमातून जनावरांची निवड, गोठ्याची रचना, खाद्य व्यवस्थापन, दूध उत्पादनावर दूरगामी परिणाम करणारे महत्त्वाचे आजार आणि नियंत्रण, उत्पादन खर्च अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आहे. पशुपालन करताना जातिवंत पैदास महत्वाची बाब आहे. तसेच गाई, म्हशींची दूध देण्याची क्षमता चांगली ठेवण्यासाठी पहिल्यापासून योग्य व्यवस्थापन ठेवावे लागते. त्यादृष्टीने या पुस्तकामध्ये पशुपालक व्यवस्थापन करताना नेमक्या काय चुका करतात, त्याचे जनावरांवर काय परिणाम होतात, हे स्पष्टपणे सांगितले आहे.
पशुपालकांनी व्यवस्थापनातील चुका टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, काय काळजी घ्यावी, याचे सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये दिले आहे. याचबरोबरीने आहाराचे नियोजन कसे करावे, वाढीच्या टप्प्यानुसार कोणते बदल आवश्यक असतात, याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे नव्याने पशुसंगोपन करणाऱ्यांना भविष्यातील चुका टाळणे सहज शक्य होणार आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विषयानुसार विभागणी असल्याने पशुपालनातील विविध संकल्पना आणि व्यवस्थापनाचे मुद्दे लक्षात येतात. पुस्तकामध्ये विषयानुसार छायाचित्र आणि रेखाचित्रे तसेच आकडेवारीचे तक्ते दिल्याने पशुपालकांना तांत्रिक विषय समजणे सोपे जाते. त्यामुळे पशुपालक, तज्ज्ञ तसेच पशू व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना हे पुस्तक अभ्यासपूर्ण झाले आहे.
सर्वसामान्य ग्राहकांना सध्या भेडसावणारा प्रश्न म्हणजे दुधाची गुणवत्ता आणि स्वच्छ दूध उत्पादन. यावर देखील भर देऊन अशा उत्पादनासाठी पशुपालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे. स्वच्छ दूध उत्पादन करताना जनावरांचे व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता, योग्य प्रकारे औषधोपचार करणे आवश्यक असते. गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाबाबतच्या संकल्पना या पुस्तकातून जाणून घेता येतात.
दुग्ध व्यवसाय हा स्वतंत्र उद्योग म्हणून पुढे येत आहे.त्यादृष्टीने केवळ दूध उत्पादनावर अवलंबून न राहता नवनवीन प्रक्रिया पदार्थांची निर्मिती आवश्यक झाली आहे. याबाबत भविष्यात पशुपालकांना नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध होतील याबाबतची चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे. गेल्या काही वर्षात देश, परदेशात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठ विस्तारत आहे. या बाजारपेठेचा फायदा मिळवायचा असेल तर निश्चितपणे जातिवंत दुधाळ गाई, म्हशींचे संगोपन, स्वच्छ दूध निर्मिती तसेच प्रक्रिया उद्योगाची उभारणी महत्त्वाची ठरणार आहे.
ग्रामीण भागामध्ये पशुपालनाच्या जोडीने विविध व्यवसायांची उभारणी होत असल्याने अर्थकारणाला देखील चालना मिळणार आहे. त्यामुळे या व्यवसायाला योग्य दिशा देण्यासाठी समग्र आणि प्रत्यक्ष पशुपालकांच्या गरजांची पुर्तता करणाऱ्या पुस्तकाची गरज होती. ती या माध्यमातून पूर्ण होत आहे. डॉ. घोगळे आणि कुलकर्णी यांनी देश, परदेशातील तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि पशुपालनातील स्वानुभवावरून हे पुस्तक लिहिले असल्यामुळे निश्चितपणे पशुपालक, पशुतज्ज्ञ आणि विद्यार्थांना देखील दिशादर्शक ठरणारे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.