Cooperative Sector  Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperation : सहकाराची सूत्रे

Formulas of cooperation : कृष्णाने गोवर्धन उचलला या गोष्टीत गोवर्धन पर्वत हे आव्हानाचं प्रतीक आहे. गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी गोपगड्यांनी शारीरिक बल दिले, तर कृष्णाने त्या सर्वांना मनोबल दिले.

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Dr. Anand Nadkarni : कृष्णाने गोवर्धन उचलला या गोष्टीत गोवर्धन पर्वत हे आव्हानाचं प्रतीक आहे. गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी गोपगड्यांनी शारीरिक बल दिले, तर कृष्णाने त्या सर्वांना मनोबल दिले. काठ्या लावून मदत करणारे गोपीसुद्धा एका अर्थाने श्रीकृष्णाला मनोबल देत होते. गोवर्धन उचलला जाऊ शकतो असं म्हणणारे श्रीकृष्ण हे सर्व गोपाळांना प्रेरक होते. मनोबल आणि शरीरबल एकत्र येणं, एकत्रितपणे वापरणं हाच सहकार आहे. सहकाराचं नेतृत्व प्रेरक लागतं आणि कालांतराने त्या संघातले सहकारी नेतृत्वाला प्रेरणा द्यायला लागतात.

मित्रांनो, सतत बदल घडत राहणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. जिद्दीच्या ट्रॅकवर राहून त्या बदलांकडे सजग आणि सकारात्मकतेने बघता येते. वैयक्तिक बदलापासून सुरू करून लांब पल्ल्याच्या बदलाकडे जायचं असेल तर सहकाराची कास धरायला लागते. ही सहकाराची सूत्रे कोणती आणि त्याचा आपण आपल्या आयुष्यात कसा उपयोग करून घ्यायचा, हे आपण आजच्या लेखात समजून घेणार आहोत.

सहकाराचा उगम कसा झाला? अगदी पुराणकाळापासून आधुनिक काळापर्यंत सहकाराची सूत्रे दिसतात. कृष्णाने गोकुळात सगळ्यांच्या सहकाराने गोवर्धन पर्वत उचलला तर आताच्या काळात ‘अमूल’सारख्या दुग्ध व्यवसायानेही सहकाराच्या माध्यमातून यशस्वीरीत्या हा गोवर्धन पेलला. शेवटी सहकार म्हणजे काय? तर एखाद्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संघशक्तीचा वापर करणं म्हणजे सहकार. हा सहकाराचा विचार नक्की कसा निर्माण होतो? या परस्पर सहकार्यामागील भावना व विचार कोणते? याचा आपण खोलात जाऊन विचार करू.

सहकाराचा विचार माणसाच्या आयुष्यामध्ये गरज म्हणून आला. आदिम काळात अस्तित्व टिकविण्याच्या धडपडीत असताना एकत्र राहण्यातले, अन्न मिळविण्यातले, अडचणींचा सामना गटाने एकत्र मिळून करण्यातले फायदे माणसाच्या लक्षात आले. हळूहळू त्याला कळत गेले, की केवळ अस्तित्व टिकविण्यासाठी नव्हे तर ते अधिक टिकाऊ बनवण्याकरिता देखील एकत्र राहणं फायद्याचे आहे. त्यापुढल्या टप्प्यात माणसाला लक्षात आले, की आपण हीच संघशक्ती प्रगतीकरिता वापरू शकतो! अशा प्रकारे संघशक्ती विकसित होत गेली आणि प्रगतीसाठी त्याचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रांत व्हायला सुरुवात झाली.

कृष्णाने गोवर्धन उचलला या गोष्टीत गोवर्धन पर्वत हे आव्हानाचं प्रतीक आहे. गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी गोपगड्यांनी शारीरिक बल दिले तर कृष्णाने त्या सर्वांना मनोबल दिले. काठ्या लावून मदत करणारे गोपीसुद्धा एका अर्थाने श्रीकृष्णाला मनोबल देत होते.

गोवर्धन उचलला जाऊ शकतो असं म्हणणारे श्रीकृष्ण हे सर्व गोपाळांना प्रेरक होते. मनोबल आणि शरीरबल एकत्र येणं, एकत्रितपणे वापरणं हाच सहकार आहे. सहकाराचं नेतृत्व प्रेरक लागतं आणि कालांतराने त्या संघातले सहकारी नेतृत्वाला प्रेरणा द्यायला लागतात. कालांतराने सहकारामध्ये नेतृत्व आणि अनुयायी असा श्रेष्ठ कनिष्ठ भाव विरघळून समानता येते. कोणी आक्रमक आणि इतर भिडस्त किंवा तटस्थ असं असून चालत नाही. संघातील प्रत्येक जण आग्रही / निर्धारी भूमिकेवर असतो तेव्हा सहकार फलद्रूप होतो.

समान उद्दिष्ट असलेला संघ जेव्हा सहकार अंगीकारतो तेव्हा त्यांचे विचार आणि भावना कशा असतात?
- परस्परांबद्दलचा आदर आणि परस्परांच्या क्षमतांना मान देऊ.
- परस्परांच्या कमतरता ओळखून त्या भरून काढण्याचा प्रयत्न करू.
- तुझ्या क्षमतांबद्दल मला आदर आहे, माझ्या क्षमतांबद्दल तुला आदर आहे.
- आपलं ध्येय एक आहे तेव्हा क्षमतांचं एकत्रीकरण करूया.
- एकमेकांच्या कमतरतांची भरपाई एकमेकांच्या क्षमतांनी करूया.
- हे सर्व करत असताना त्रास झाला तरी एकमेकांच्या साह्याने ते कमी करत जाऊ; जेणे करून क्षमतांचा एकत्रित परिणाम फळाला येईल.

सहकारामधल्या नेतृत्वाची जबाबदारी ही फार महत्त्वाची आणि ती येते ध्येयाप्रती असलेल्या समरसतेतून. सहकाराच्या हेतूने एकत्र आलेले सर्व जण एका ध्येयाचे अनुयायी असतात. ध्येयाच्या मार्गावर जाताना वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या विषयांमध्ये कोणी एक अनुयायी व्यक्ती इतरांचं नेतृत्व करू लागते. हे नेतृत्व व्यक्तीच्या जबाबदारी पेलण्याच्या क्षमतेवर, ज्ञानावर, कौशल्यावर आधारित असते.

वेगवेगळ्या विषयांतील / संदर्भातील नेतृत्व व अनुयायीत्व वेगवेगळं असेल. आज नेतृत्व करणारा उद्या वेगळ्या टप्प्यावर असताना अनुयायी होऊ शकेल आणि आधी अनुयायी असणारी व्यक्ती कदाचित या टप्प्यावर नेतृत्व करून शकेल. सहकारामध्ये नेतृत्व आणि अनुयायी या दोन्ही भूमिका लवचिक असतात. ही लवचिकता म्हणजेच सहकाराचा पाया होय.

शेतकऱ्यांची प्रगती या ध्येयासाठी शेतकरी एकत्र आले तर त्या सर्वांच्या ध्येयात समरसता निर्माण होईल. एकाच ध्येयासाठी काम करताना त्या ध्येयावर, तिथे पोहोचण्याच्या मार्गांबद्दल निष्ठा निर्माण होईल. संघकार्य पार पडण्याची जबाबदारी निभावून नेण्यासाठी ज्ञान-कौशल्य असणाऱ्या सभासदाला अधिकार मिळेल आणि त्या अधिकाराचा एक भाग म्हणून नेतृत्व!

सहकारामध्ये अधिकार आणि सत्ता हे साध्य नाही. सहकारामध्ये सत्ता गाजविण्यापेक्षा प्रेमाची सत्ता आणणं आणि ध्येयाकडे जाण्याचं साधन अशा दृष्टीने मिळालेला अधिकार वापरणं महत्त्वाचं आहे. संघाचे नेतृत्व जर अधिकार मिळवणे या ध्येयाने वागू लागले, अधिकार गाजवू लागले; तर तो सहकार उरत नाही. तर ते फक्त स्वहितकेंद्री नेतृत्व होते, परहिताचा विचार मागे पडतो.

सहकार म्हणजे एकमेकांना समजून, स्वीकार करून सामूहिक ध्येयाकडे वाटचाल करणारा संघ. मग त्यात कोणाचं तंत्रज्ञान विषयक ज्ञान चांगलं असेल, कोणाचं संवादकौशल्य चांगलं असेल तर कोणाची आर्थिक व्यवहाराची उमज चांगली असेल. प्रत्येकाचे गुण त्या समूहाला ध्येयापर्यंत नेण्यासाठी उपयोगात आणले जातील.

सहकाराचे मॉडेल, त्यातील नेतृत्वाची रचना माणसामधल्या गुणांना वाव देणारी असते. एकमेकांमधल्या गुणांमुळे त्यांना प्रतिस्पर्धी न मानता त्यांना सहकारी मानलं जातं. दोन समान गुण असणारे सहकारी गुणांचा गुणाकार करतात, वजाबाकी करत नाही. परस्पर आदर, परस्पर विश्‍वास आणि परस्पर स्वीकार याच्यावरती सहकार आधारित आहे.

सहकारामध्ये स्वहित जपतानाच परहित समजून घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने प्रगती करून घेण्याची संधी मिळते. कोणी त्याचा जास्त उपयोग करून घेईल तर कोणी कमी; पण प्रगती सर्वांचीच होते.

या सगळ्याच्या मुळाशी असते ती स्वयंप्रतिमा. व्यक्ती जेव्हा आग्रही भूमिकेवर असते तेव्हा स्वहित व परहित यांची सांगड घालू शकते. कालांतराने स्वहित व परहित यामधील फरक निघून जातो व त्यात सहजता येते.

स्वार्थ आणि परमार्थ यांना जोडण्याची सहजता सहकारातून येते. स्वार्थ आणि परमार्थ वेगळे न राहता समअर्थ बनतो व त्यातून अर्थपूर्ण निर्मिती होते. सहकाराचा विचार हा सगळ्यांनी मिळून काम करून संपत्ती तयार करणे हा आहे. आर्थिक प्रगतीमध्ये सगळ्यांच्या समृद्धीचा विचार नसेल तर त्यामधून शोषण निर्माण होतं. सहकार हा फक्त धननिर्मितीसाठी नसून समृद्धीसाठी आहे. समृद्धीचा एक भाग म्हणून आर्थिक प्रगती होतेच; पण निर्माण होणाऱ्या धनाकडेही साध्य म्हणून न पाहता साधन म्हणून पाहिलं जातं.

तुमच्या आयुष्यात कुठल्या क्षेत्रात तुम्हाला ‘सहकार’ तत्त्व अवलंबले आहे असे दिसते? कुटुंब, शेती, सहकारी संस्था, भावकी, मित्र-परिवार यांच्या बाबतीत आपण पाहिलेली सहकाराची सर्व सूत्रे लागू पडतात का?
--------
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=RxOaMNOMmkI

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: नव्या विहीरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार ४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Agrowon Podcast: टोमॅटोच्या दरात तेजी; हिरवी मिरची टिकून, केळीला उठाव, कोथिंबीर नरमली तर तुरीचा बाजार दबावातच

Nashik Industrial Hub : उद्योजकांनी पर्यावरणपूरक,प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य द्यावे

Lumpy Skin Disease : ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहिमेसाठी समिती नियुक्त

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणासह, नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

SCROLL FOR NEXT