Milk Production : स्वच्छ दूध उत्पादनाची सूत्रे जाणून घ्या

दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूध निर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
Milk Production
Milk ProductionAgrowon

डॉ. आर. बी. अंबादे, डॉ. पी. पी. घोरपडे

लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांनाच दूध आवडते. मानवी आरोग्याच्या (Human Health) दृष्टीने दुधाचे नियमित सेवन (Milk Consumption) अत्यंत फायदेशीर असते. दुधामध्ये सर्व पोषक घटक असतात.

त्यामुळे दुधाला सर्वान्न (Milk Diet) असेही म्हणतात. दुधामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे. हाडांच्या मजबुतीसाठी दूध उपयुक्त असते. दुधामध्ये सर्व प्रकारची अन्नद्रव्ये, खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कर्बोदके मुबलक प्रमाणात असतात.

दूध हे नाशिवंत असून जनावरांच्या कासेतून दूध काढल्यापासून ते दूध संकलन (Milk collection) केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक असते. अस्वच्छ दूध आरोग्यास हानिकारक ठरते.

रोगजंतूंची झपाट्याने वाढ होऊन गुणवत्ता खालावते. दूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान दुधामध्ये संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे दुधाची प्रत ढासळण्याची शक्यता असते.

परिणामी दूध नासते. त्यासाठी पशुपालकांनी दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूधनिर्मितीकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत टिकून राहण्यास मदत होईल आणि चांगले दर मिळतील.

स्वच्छ दूध निर्मितीसाठी काही महत्त्वाच्या बाबी ः

दुधाळ/ दुभती जनावरे ः

१) दुभती जनावरे नेहमी स्वच्छ व निरोगी असावीत.

२) जनावरांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग नसावा. प्रामुख्याने कासदाह, क्षय व विषमज्वर अशा आजारांची बाधा झालेल्या जनावरांचे दूध वापरू नयेत.

३) जनावरांची नियमितपणे पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. आजारी जनावरांना वेळेवर उपचार करावे.

४) संसर्गजन्य रोगग्रस्त जनावरांची व्यवस्था स्वतंत्र ठिकाणी करावी.

५) दूध काढताना गाई-म्हशींची पाठीमागची त्वचा तसेच कासेभोवतीचा भाग स्वच्छ करावा.

दूध काढणारी व्यक्ती ः

१) दूध काढणारी व्यक्ती नेहमी स्वच्छ व निरोगी असावी. कोणतीही जखम किंवा संसर्गजन्य आजार नसावा.

२) कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.

३) नखे वाढलेली नसावीत.

४) दूध काढण्यापूर्वी हात जंतुनाशकाने धुऊन घ्यावेत.

Milk Production
Milk Rate : दूध उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन करू; दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा इशारा 

५) गोठ्यामध्ये थुंकणे, खोकणे, धूम्रपान इत्यादी वाईट सवयी टाळाव्यात.

६) नेहमी कोरड्या हाताने दूध काढावे.

७) दूध काढण्यासाठी पूर्ण हात पद्धतीचा अवलंब करावा.

८) दूध साधारण ७ ते ८ मिनिटांत काढावे. कारण, गाई-म्हशी पान्हावल्यापासून दूध देण्यासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांचा अंत:स्राव ८ मिनिटांपर्यंत होतो.

दूध काढण्याची जागा किंवा गोठ्याचा परिसर ः

- दुभत्या जनावरांचा गोठा मानवी वस्तीपासून लांब, थोड्या उंचावर व पाण्याचा निचरा होणाऱ्या मुरमाड किंवा खडकाळ ठिकाणी असावा.

- गोठ्याच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा उग्र वास येत नसावा.

- धार काढताना भांड्यामधे धूळ उडणार नाही याची दक्षता घ्यावी.

- गोठ्याची उघडी बाजू पश्चिमेस राहील अशा रीतीने गोठ्याची उभारणी असावी. यामुळे गोठ्यात हवा खेळती राहून घाण वास, डास, गोचीड, माश्या यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

- दूध काढण्याच्या अर्धा ते १ तास आधी केरकचरा व शेण काढून गोठा स्वच्छ करावा.

- वर्षातून १ ते २ वेळा गोठ्याला चुना लावावा.

- पाण्याच्या हौदाला सिमेंटचे प्लास्टर करावे.

- दूध संकलनाच्या खोलीमध्ये कांदा, कीटकनाशके, खते, रंग, रॉकेल इत्यादी वस्तू ठेवू नयेत.

- गोठ्यातील मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.

दुधाची भांडी व यंत्रे ः

- दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी लागणारी भांडी फक्त दुधासाठी वापरावीत.

- भांडी ओबडधोबड किंवा चेपलेली नसावीत.

- भांडी शक्यतो स्टेनलेस स्टीलची असल्यास जास्त काळ टिकतात.

- दूध काढण्यापूर्वी व काढणीनंतर दुधाची भांडी कोमट पाण्यामध्ये जंतुनाशक द्रावण तयार करून त्याने धुऊन घ्यावीत.

- दुधाची भांडी धुतल्यानंतर कोरड्या जागी वाळण्यास ठेवावीत. शक्य असल्यास उन्हामध्ये वाळवून ठेवावीत.

- भांड्यांचा पुन्हा वापर करताना भांडी क्लोरीनयुक्त पाणी टाकून संपूर्ण निर्जंतुक करावीत.

Milk Production
Milk Processing : 'सौभाग्य'ने दिली दूध प्रक्रियेला चालना

जनावरांचे खाद्य व पाणी ः

- जनावरांचे खाद्य व पाण्याला उग्र वास येत नसावा.

- कीडनाशक व बुरशीनाशके फवारलेला चारा जनावरांना देऊ नये.

- आंबवण देताना नेहमी ओलसर करून द्यावे.

- गोठा व भांडी धुण्यासाठी वापरलेले पाणी शुद्ध व स्वच्छ असावे. शक्यतो धुण्याच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र असावी.

इतर बाबी ः

- प्रतिजैविकांचा वापर कमीत कमी आणि तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच करावा.

- दुधातील भेसळ करणे टाळावे. कारण, ही भेसळ आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून कायदेशीर गुन्हा आहे.

- दूध काढल्यावर त्वरित दूध संकलन केंद्रात पाठवावे. जेणेकरून दुधाची प्रत टिकून राहील.

- दूध शीतगृहात ठेवून थंड केल्यास जास्त काळ टिकते. आणि विक्रीपर्यंत चांगले राहते.

डॉ. आर. बी. अंबादे, ८३५५९४२५४६/ ९१६७६८२१३४, (सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com