World Fisheries Day  Agrowon
ॲग्रो विशेष

World Fisheries Day : शाश्‍वत मत्स्य साठ्यांच्या संवर्धनासाठी...

Fisheries : मच्छीमार, मत्स्यपालक आणि संबंधित मत्स्य व्यवसायिकांमधील एकता प्रदर्शित करण्यासाठी दरवर्षी ‘२१ नोव्हेंबर’ हा दिवस ‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Team Agrowon

अमिता लकडे, सुरेश भारती

Sustainable Fisheries Conservation : नवी दिल्ली येथे १९९७ मध्ये ‘वर्ल्ड फोरम ऑफ फिश हार्वेस्टर्स ॲण्ड फिश वर्कर्स’ची बैठक झाली. या बैठकीदरम्यान १८ देशांच्या प्रतिनिधींसह ‘वर्ल्ड फिशरीज फोरम’ची (जागतिक मत्स्यपालन मंच) स्थापना करण्यात आली. या बैठकीत शाश्‍वत मासेमारी पद्धती आणि धोरणांचे समर्थन करणाऱ्या प्रतिनिधींनी घोषणापत्रावर स्वाक्षरी केल्या. या मंचाचा स्थापना दिवस स्मरणात राहावा यासाठी ‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस’ दरवर्षी ‘२१ नोव्हेंबर’ रोजी साजरा केला जातो.

जागतिक मत्स्य व्यवसाय दिवसाच्या माध्यमातून शाश्‍वत मत्स्यसाठ्यांचे महत्त्व अधोरेखित करणे व लुप्त होणाऱ्या मत्स्य साठ्यांच्या धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले जातात. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट्य लहान मच्छीमार समुदायांसाठी मानवी हक्कांचे बळकटीकरण, मासेमारी समुदायांसाठी कामाची परिस्थिती सुधारणे तसेच बेकायदेशीर आणि अनियंत्रित मासेमारीवर आळा घालणे असे आहे. आपल्यापैकी अनेकांच्या मनात मासे, मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग याबाबत कुतूहल असते. आज ‘जागतिक मत्स्य व्यवसाय दिवसा’च्या निमित्ताने मत्स्य व्यवसायाविषयी माहिती घेऊ.

ओळख मत्स्य प्रजातींची...

महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीलगत असलेल्या पाच जिल्ह्यांना एकूण सुमारे ७२० किलोमीटर एवढी मोठी सागर सीमा लाभला आहे. मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक येतो. त्यापैकी ८२ टक्के वाटा सागरी मासेमारीतून, तर १८ टक्के वाटा भूजलाशीन मासेमारी (गोड्या पाण्यातील) मार्फत येतो.

सागरी मत्स्य प्रजाती या पूर्णपणे समुद्रातील खारट पाण्यात, तर भूजलाशयीन मत्स्य प्रजाती या पूर्णपणे गोड्या पाण्यात वास्तव्य (जगणाऱ्या) करणाऱ्या मत्स्य प्रजाती आहेत. काही मत्स्य प्रजाती खाडीतील पाण्यात देखील वास्तव्य करतात. या मत्स्य प्रजाती क्षारयुक्त पाण्यात, तसेच गोड्या पाण्यात देखील वास्तव्य करू शकतात. अशा प्रजातींना मचुळ पाण्यात वास्तव्य करणाऱ्या किंवा इश्‍चुराईन मत्स्य प्रजाती असे संबोधले जाते.

कटला, रोहू, मृगळ, सिप्रीनस, गवत्या चंदेरा, पाबदा या गोड्या पाण्यातील मत्स्य प्रजाती मासे खाणाऱ्यांमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत. यासह कोळंबी आणि खेकड्यांना देखील मोठ्या प्रमाणात पसंती असते. समुद्रातील पापलेट, सुरमई, बांगडा, घोळ इत्यादी मत्स्य प्रजाती बरोबरच झिंगा, शेवंड व खेकड्या सारखे कवचधारी प्राणी, तर म्हाकुळ, कालवं, तिसऱ्यांसारखे मृदुकाय प्राणी मत्स्य खवय्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. खाडीमध्ये सापडणारे जिताडा, मिल्क फिश, बोईर, काळींद्रा, कोळंबी, कुर्ली इत्यादींना देखील बाजारपेठेत चांगली मागणी असते.

गोड्या पाण्यातील आणि समुद्रातील माशांमधील फरक

समुद्रातील खारे पाणी व गोडे पाणी या दोन भिन्न पर्यावरण परिस्थिती आहेत. माशांच्या शरीर रचनेतील फरकांमुळे गोड्या पाण्यातील मासे खाऱ्या पाण्यात जिवंत शकत नाहीत किंवा खाऱ्या पाण्यातील मासे गोड्या पाण्यात जिवंत राहू शकत नाहीत. मात्र काही मत्स्य प्रजातींची शरीररचना ही गोडे किंवा खारे पाणी या पैकी कोणत्याही परिस्थितीत वास्तव्य करू शकेल अशी असते. अशा प्रकारच्या मत्स्य प्रजातींना ‘निमखाऱ्या पाण्यातील मासे’ असे संबोधले जाते.

मासेमारी व्यवसायाचे बदलते स्वरूप

मासेमारी हा मुख्यत्वे करून कोळी, भोई बांधवांचा पारंपरिक व्यवसाय असला तरी आजच्या काळात मच्छीमार बांधवांनी सहकार धोरणाचा अवलंब करून चांगली प्रगती केली आहे. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात अनेक मच्छीमार सहकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यातील मासेमारी व्यवस्थापन केले जाते. सहकारी संस्थांच्या बरोबरच आता अनेक वैयक्तिक मत्स्यपालक या व्यवसायाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत.

पारंपरिक मासेमारीच्या बरोबरीनेच आता भूजलाशयीन क्षेत्रात मत्स्यतळी, पिंजरा, बायोफ्लॉक, पाणी पुनर्वापर प्रणाली सारख्या आधुनिक मत्स्यशेती पद्धतीने मासळी व झिंग्यासारख्या प्रजातींचे संवर्धन करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे.

मासेमारीच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धती मच्छीमारांकडून वापरल्या जातात. समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना रापन जाळी, डोल नेट, ओढ जाळे इत्यादींचा वापर केला जातो. तर आधुनिक पद्धतीने मासेमारी करताना ट्रॉलर, पर्सिनर इत्यादींचा वापर करून मोठ्या प्रमाणात होतो. गोड्या पाण्याच्या नदी, नाले, तलाव, जलाशय इत्यादींमध्ये गिल नेट, फेक जाळे लहान होड्या, रबर ट्यूब, थर्माकोल राफ्ट इत्यादींच्या मदतीने मासेमारी केली जाते.

मासे पकडल्यानंतर ते अनेक व्यावसायिक टप्प्यांमधून शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचतात. ही अत्यंत जलद गतीने होणारी प्रक्रिया असून या दरम्यान माशांची गुणवत्ता आणि ताजेपणा राखणे अत्यंत आवश्यक असते. यामध्ये वाहतूक, साठवणूक, प्रक्रिया इत्यादींचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. बाजारात दिसणारी ताजी मासळी अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरीता पडद्यामागे अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पार करून आलेली असते.

मत्स्योत्पादनाच्या बीजनिर्मिती पासून ते अंतिम ग्राहकांपर्यंत मासळी पोचेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात मोठे मनुष्यबळ गुंतलेले असते. या माध्यमातून मत्स्य व्यवसायामार्फत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जाते.

मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम :

मत्स्य उद्योगात वाढ करून मत्स्य उत्पादन वाढीबरोबरच अधिकाधिक रोजगारांची निर्मिती करणे

मच्छीमारांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे

जास्तीत जास्त मासळीचे उत्पादन घेणे

उपलब्ध जलक्षेत्र मत्स्य व्यवसायाखाली आणून उत्पादनात वाढ करणे

पारंपरिक मच्छीमारांना सक्षम बनवण्यासाठी अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे

मोफत विमा संरक्षण पुरविणे

तलाव मासेमारी ठेक्याने देणे

मत्स्यबीजाची निर्मिती करणे

बंदिस्त पिंजरा पद्धत व इतर प्रगत मत्स्य संगोपनाद्वारे तलावातील मत्स्य उत्पादनात वाढ करणे

सागरी क्षेत्रातील मासेमारी नौकांवर वायरलेस फिश फाइंडर व जीपीएस यंत्रणा बसवणे

अवैध मच्छीमारीवर कार्यवाही करणे

सागरी क्षेत्रातील मच्छीमारांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जेट्टी व मच्छीमार बंदरे बांधून देणे.

बर्फ कारखाने, शीतगृह व मासळी प्रक्रिया उद्योग सुरू करणे.

दुर्बल घटकातील मच्छीमारांच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने नवीन कार्यक्रमांचे आखणी करणे

समाजातील दुर्बल घटकांतील व्यक्तींना, बेरोजगार तरुण व महिलांना मत्स्य व्यवसायात सामावून घेऊन उपजीविकेसाठी व्यवसाय उपलब्ध करून देणे

अमिता लकडे, ९७६५३ ३६८८८

(अमिता लकडे या मोर्शी येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी असून, सुरेश भारती हे मत्स्य व्यवसाय विभाग, अमरावती येथे प्रादेशिक उपआयुक्त आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT