Mulberry Farming Management :
शेतकरी नियोजन : रेशीम शेती
शेतकरी : श्रीधर शृंगारे
गाव : टाकळगव्हाण, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
तुती लागवड : २ एकर.
बॅच क्षमता : १५० अंडीपुंज.
टाकळगव्हाण (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील उच्च शिक्षित श्रीधर बळवंतराव शृंगारे यांनी दीर्घ अनुभवातून तुती रेशीम कोष उत्पादन व्यवसायात जम बसवला आहे. काटेकोर व्यवस्थापनातून मागील १४ वर्षांपासून ते दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. यातून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळत आहे. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी तुतीचा उत्तम प्रतीचा पाला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानुसार रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. तुषार संचाद्वारे पाणी दिल्यामुळे तुतीची पाने स्वच्छ होण्यास मदत मिळते, असे श्रीधर शृंगारे सांगतात.
टाकळगव्हाण येथील भास्कर, गंगाधर, श्रीधर, पंडित, प्रभाकर शृंगारे या पाच भावांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची ४५ एकर भारी प्रकारची जमीन आहे. शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय व रेशीम उद्योगाची जोड त्यांनी दिली आहे. रेशीम शेतीची संपूर्ण जबाबदारी श्रीधर यांच्यावर आहे.
तुती बाग व्यवस्थापन
सुरुवातीला २०१० मध्ये १ एकरावर तुतीच्या व्ही १ वाणाची कलमाद्वारे लागवड केली. ही लागवड ४ बाय १.५ फूट अंतरावर आहे. त्यानंतर २०१७-१८ मध्ये तुती रोपांद्वारे आणखी एक एकरवर ५ फूट बाय २ फूट अंतरावर पट्टा पद्धतीने लागवड केली आहे. तुतीच्या २ झाडांमध्ये २ फूट, तर दोन ओळींमध्ये ५ फूट अंतर ठेवले आहे. लागवडीपूर्वी रोपांच्या मुळांवर बुरशीनाशक व कीटकनाशकांची प्रक्रिया केली.
पहिली बॅच घेतल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पहिली छाटणी केली. प्रत्येक छाटणीनंतर रासायनिक खतांच्या मात्रा, आंतरमशागतीची कामे करण्यावर भर दिला जातो. एकरी ७५ किलो प्रमाणे मिश्र खत देण्यात येते.
पावसाळ्यात व उन्हाळ्यात ५० दिवसांनी, तर हिवाळ्यात ६० ते ७० दिवसांनी दुसरी बॅच घेण्यासाठी पाने उपलब्ध होतील या पद्धतीने नियोजन केले जाते. दर्जेदार पानांसाठी छाटणीनंतर २१ ते २२ दिवसांनी पहिली, त्यानंतर १० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची दुसरी फवारणी केली जाते. या शिवाय १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांचा फवारणीद्वारे वापर केला जातो.
वर्षातून एकवेळ एप्रिल किंवा मे महिन्यात शेणखताची मात्रा दिली जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत मिळते. तसेच तुती पाल्याचा दर्जा देखील सुधारत असल्याचे श्रीधर शृंगारे सांगतात.
विक्री नियोजन
उत्पादित कोषाची विक्री बंगलोर जवळील रामनगरम येथील मार्केटमध्ये केली जाते. याशिवाय जालना तसेच बीड येथील मार्केटमध्ये कोष विक्री केली जाते. बायव्होल्टाईन जातीच्या १५० अंडीपुंजाच्या वर्षभरात ६ ते ७ बॅच घेतल्या जातात. त्यापासून सरासरी १२५ ते १४२ किलो रेशीम कोष उत्पादन मिळते.
सध्याचे व्यवस्थापन...
मागील महिन्यात २४ डिसेंबरला जैतापूर (जि. नांदेड) येथून नवीन बॅचसाठी १५० चॉकी आणली आहे. या बॅचचे २५ डिसेंबरपासून संगोपन सुरू आहे.
चालू आठवड्यात मंगळवारी बॅचचा चौथा मोल्ट पास झाला. रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध करण्यावर भर देत आहे.
मागील काही दिवसांपासून थंडीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यानुसार व्यवस्थापनावर बदल करत आहे. शेडच्या बाजूने पडदे लावले आहेत. शेडमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी शेगड्या लावल्या जात आहेत.
आगामी नियोजन
पुढील आठवड्यात बुधवारपासून तुतीचे बागेची छाटणी केली जाईल. त्यानंतर एनपीके खताच्या मात्रा दिल्या जातील. रासायनिक खते दिल्यानंतर तुषार संचाने पाणी दिले जाईल. जेणेकरून पुढील बॅचसाठी दर्जेदार पाला उपलब्ध होईल.
सध्याच्या चालू बॅचमधील कोष काढणी साधारपणे २१ जानेवारीच्या दरम्यान काढणीस येतील. मजूर लावून कोष काढणी केली जाईल.
कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर संगोपनगृहाची साफसफाई, निर्जंतुकीकरण या बाबींवर कटाक्षाने भर दिला जाईल. रेशीम कीटकांवर कोणत्याही कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेतली जाईल. शिफारशीत घटकांद्वारे संगोपनगृह आणि ट्रे चे निर्जंतुकीकरण केले जाईल.
साधारणपणे १० ते १५ फेब्रुवारीच्या दरम्यान पुढील बॅच घेण्याचे नियोजित आहे. ही बॅचदेखील १५० अंडीपुंजाची असणार आहे, असे श्रीधर शृंगारे सांगतात.
ऋतुनिहाय व्यवस्थापन
रेशीम कोष उत्पादनासाठी शेतामध्ये २० बाय ५० फूट आकाराचे, २०० अंडीपुंज क्षमतेचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले आहे. प्रत्येक बॅचवेळी व्यवस्थापनात सुधारणा करत दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेण्याच्या त्यांच्या प्रयत्न असतो.
थंड वारे, उन्हाळ्यात उष्ण वारे या पासून कीटकांचे संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहाभोवती प्लॅस्टिक लावले आहेत. सध्या तापमानात चांगलीच घसरण झाल्याने संगोपनगृहातील तापमान योग्य राखण्यासाठी शेगडी लावत आहे. त्यामुळे रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी आवश्यक तापमान राखणे शक्य होते.
उन्हाळ्यात शेडभोवती हिरवे नेट लावले जाते. शेडचा छत टीन पत्र्याचे असून त्यावर रंग मारला जातो. तसेच छताच्या चारही बाजूंनी १६ एमएम लॅटरल लावून पाणी सोडले जाते. या माध्यमातून दिवसभर पाणी पडत राहते. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान योग्य राखले जाते.
- श्रीधर शृंगारे, ९९२११३५७९५
(शब्दांकन : माणिक रासवे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.