Flower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

कृष्णा जोमेगावकर

Flower Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : फुलशेती

शेतकरी : बालासाहेब आबासाहेब देशमुख

गाव : वाडीमुक्त्यारपूर,

ता. मुदखेड, जि. नांदेड.

एकूण क्षेत्र : पाच एकर

फुलशेती : एक एकर

नांदेड शहरापासून पंचवीस कि.मी. अंतरावरील वाडीमुक्त्यारपूर येथील बालासाहेब आबासाहेब देशमुख हे मागील दहा वर्षांपासून फुलशेती करतात. त्यांच्याकडे एक एकरमध्ये मुदखेड या जातीच्या सिंगल मोगऱ्याची लागवड आहे. मोगरा फुलांना नांदेड बाजारामध्ये चांगली मागणी असल्यामुळे दराप्रमाणे दरवर्षी तीन ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

मोगरा फुलांसाठी चांगली कसदार, उत्तम निचरा होणारी जमीन लागते. त्याला जितके शेणखत अधिक देऊ तितके फुलांचे उत्पादन आणि सुगंध वाढत असल्याचे बालासाहेब सांगतात. २०२२ मध्येच लागवड केलेल्या एक एकर मोगऱ्यातून आजही ते उत्पादन घेत आहे. यात मोगरा झाडांची लागवड सहा फूट बाय सहा फूट अंतरावर आहे. एकरी १७०० झाडे बसली. दरवर्षी सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात या दोनवेळा छाटणी केली जाते. मात्र या वर्षी सप्टेंबरमधील छाटणी मजूर उपलब्ध न झाल्यामुळे करणे शक्य झाले नाही.

आता ही छाटणी डिसेंबर महिन्यामध्ये घेण्याचे नियोजन करत आहे. जानेवारीमध्ये कच्चा बहर सुरू होईल. या छाटणीमध्ये जमिनीलगत असलेले वेल ठेवून झाडाचा वरील भाग साधारणत: दोन ते अडीच फुटांपर्यंत कापला जातो. अशा पद्धतीने झाड तयार केले जाते. त्यानंतर युरिया पन्नास किलो, डीएपी शंभर किलो, पन्नास किलो एमओपी या प्रमाणे रासायनिक खताचा डोस दिला जातो. या वर्षी त्यात मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०-५-३४) हे खतही मिसळले होते. त्यानंतर एक हलके पाणी दिले जाते. त्यापुढे पाटपाणी आणि तुषार सिंचन पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन केले जाते.

एक महिन्यानंतर उत्पादन सुरू

छाटणीनंतर साधारण एक महिन्याने मोगरा फुलांचे उत्पादन सुरू होते. प्रारंभी दहा किलोपर्यंत फुले निघतात. यानंतर त्यात वाढ जाते. महिन्यातून सुमारे दहा ते पंधरा दिवस चांगले उत्पादन निघते. असा क्रम फेब्रुवारीपासून ते जूनपर्यंत दर महिन्याला चालू राहतो, असे बालासाहेब यांनी सांगितले. दरम्यान, उन्हाळ्यात उन्हाचा चटका वाढल्यानंतर फुलांच्या प्रमाणात वाढ होते. साधापण पावसापर्यंत दररोज १०० ते १५० किलो फुलांचे उत्पादन दररोज मिळते. त्यामुळे फुलांची तोडणी दररोज सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत करावी लागते.

हे थोडे कौशल्याचे काम असते. त्यामुळे फुलांना बाजारात दर काहीही असला तरी आमच्या भागात फुलांच्या तोडणीसाठी साठ रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागते. फुलांच्या चांगल्या उत्पादनासाठी शेणखत, मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सुक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन प्रामुख्याने फवारणीद्वारे केले जाते. मोगऱ्यावर येणाऱ्या कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी कीडनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणीचे वेळापत्रक बसवले आहे. प्रतिबंधात्मक फवारणीमुळे महागडी रसायने वापरण्याची गरज कमी होते. खर्चात बचत होते.

या फुलांची विक्री नांदेड शहरातील हिंगोली गेट भागातील फुलमार्केटमध्ये केली जाते. या फुलांना सरासरी २०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो. एका एकरातून मोगरा फुलांपासून दरवर्षी पाच ते सहा लाख रुपये उत्पादन मिळते. व्यवस्थापनाचा सर्व खर्च वजा जाता एकरी तीन लाख निव्वळ उत्पन्न मिळत असल्याचे बालासाहेब देशमुख सांगतात.

बालासाहेब देशमुख, ९८२२६१७५२०

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू

Sugarcane Bill : दत्त साखर कारखाना मागील गळीत हंगामातील १०० प्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणार

SCROLL FOR NEXT