Flower Market : गणेशोत्सवात फुलांचे ‘मार्केट’ तेजीत

Flower Rate : सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे गणेशोत्सव काळात विविध फुलांना मागणी प्रचंड पण आवक अत्यंत कमी अशी स्थिती राहिली.
Floriculture
FloricultureAgrowon
Published on
Updated on

Flower Market Update : राज्यात सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. या काळात विविध फळे- भाज्या व फुलांना मोठे मार्केट असते. कोल्हापूर जिल्ह्यापुरते बोलायचे तर राज्याच्या अन्य भागांप्रमाणे येथील फूल बाजारपेठांमध्येही तेजीचे वारे वाहत आहेत. मागील काही दिवसांपासून पूर व अतिवृष्‍टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले.

साहजिकच आवक कमी राहून गणेशोत्सवापूर्वी मंदीत असलेले फुलांचे दर गणेशोत्सवात दुपटीने वाढले. या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव फूल उत्पादकांसाठी दरांचे विघ्न दूर करणारा ठरला आहे. झेंडू, बटण व डच गुलाब, शेवंती, गलांडा, निशिगंधा, जरबेरा आदी फुलांना मागणी वाढली.

शेवंती बंगळूरहून तर अन्य फुलेही विविध ठिकाणाहून मागवण्यात फूल विक्रेते व्यस्त होते. गणेशोत्सवाच्या सुरुवातीस किरकोळ बाजारात निशिगंधाला ८०० ते १००० रुपये प्रति किलो हा सर्वाधिक भाव मिळाला. आता हे दर २०० ते ३०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. कोल्हापुरातील शिंगोशी, जोतिबा रोड, महाद्वार रोड आदी भागांमधील फूल विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी आहे.

स्थानिक व राशिवडे येथील निशिगंधाचे उत्पादन पावसामुळे घटले आहे. त्यामुळे सांगोला, पंढरपूर, बंगळूर आदी ठिकाणांहून खास गणेशोत्सवासाठी बाजारात निशिगंध मागविण्यात आला आहे. कोकणात गणेशोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा होतो. साहजिकच तेथील घरगुती सजावटीसाठी गणेशोत्सवाआधीपासून असलेली फुलांची मागणी आजही कायम आहे. ती पुरवताना व्‍यापाऱ्यांची दमछाक होत आहे.

Floriculture
Floriculture : ‘एलईडी’ च्या झोतात उजळली ‘शेवंती’ ची शेती

प्रातिनिधिक दर

कोल्हापूर शहरातील शिंगोशी मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वी राहिलेले दर

  • झेंडू- ८० ते १२० रु प्रति किलो

  • शेवंती (पांढरी, पिवळी, जांभळी) - ३०० ते ३५० रु. प्रति किलो

  • गुलाब - १० ते १५ रु. प्रति नग

  • बटण गुलाब - ३०० ते ४०० रु. प्रति किलो

  • जरबेरा : ८० ते १०० रु. (१० नग पेंडी)

  • कोंबडा फूल पेंडी - ५० रु.

  • गोल्डन डेली - १२० रु. प्रति पेंडी

झेंडूने केली शंभरी पार

चिपरी (ता. शिरोळ) येथील रमेश पांडव म्हणाले, की अनेक वर्षापासून फुलशेतीत आहे. माळरानाच्या शेतात अन्य पिकांबरोबर तीस गुंठ्यात झेंडूचे उत्पादन घेतो. यंदा वीस गुंठ्यांत लाल, तर दहा गुंठे क्षेत्रात पिवळा झेंडू घेतला आहे. पॉली मल्चिंगचा वापर केल्याने किडींचे प्रमाण कमी आहे. विक्री मुंबई व मिरज मार्केटला होते. मागील दीड महिन्यापासून तोडा सुरु आहे. आतापर्यंत तीन टन विक्री झाली आहे.

काढणीस सुरुवात झाली त्या वेळी किलोला ४० रुपयांपर्यंत दर होता. गणेशोत्सवाच्या चार दिवस आधीपासून दोन्ही मार्केटमध्ये दरांत पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली. गणेशोत्‍सवादिवशी दराने शंभरी पार केल्याने उत्साह वाढला आहे. चार दिवसांपासून सातत्याने दर १०० ते ११० व क्वचित प्रसंगी १२० रुपयांपर्यंत आहेत. मागणी कायम आहे. त्यामुळे अनंत चतुर्थीपर्यंत दर कायम राहतील अशी आशा आहे.

सध्या पाऊस नसल्याने चांगला वाफसा आहे. यामुळे एक दिवसाआड झेंडू काढणे शक्य होत आहे. सध्या एक दिवसाआड दीडशे ते दोनशे किलो काढणी करीत आहोत. यंदा आमच्या भागात पावसामुळे अनेक भागातील व पूर पट्ट्यातील झेंडूचे अतोनात नुकसान झाले. माळरानावर झेंडू घेतलेल्या काही शेतकऱ्यांचे प्लॉट्‍स मात्र तुलनेने चांगले आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचे चित्र फूल उत्पादकांसाठी दिलासादायक आहे.

रमेश पांडव ९५०३३३३०१३

गुलाब उत्पादक उत्साहात

कांडगाव, ता. करवीर येथील सचिन पाटील दहा वर्षांपासून फुलशेतीत आहेत. ते म्हणाले की काही वर्षे खुल्या पद्धतीने तर आता हरितगृहात गुलाब उत्पादन घेत आहे. वर्षाला त्यातून ३- ४ लाखांपर्यंत उत्‍पन्न मिळते. सध्‍या दररोज २५ बंडल ( प्रति २० फुलांचे बंडल) या प्रमाणात काढणी करीत आहे. गणेशोत्सवापूर्वी प्रति गुलाबाला ३ ते ४ रुपये दर होता.

सध्या तो आठ ते दहा रुपये आहे. जिल्ह्‍यात गुलाबाचे क्षेत्र फारसे नाही. त्यातच सततच्या पावसामुळे उपलब्धता कमी आहे. सध्या हरितगृहातील गुलाबांचीच प्रामुख्याने आवक आहे. गणेशोत्‍सवाला चांगला दर अपेक्षित धरुन त्याच काळात काढणी होण्याच्या दृष्टीने आमचे व्यवस्थापन असते. दर चांगला मिळत असल्याने उत्साह आहे.

सचिन पाटील ९३७३५३८३९३

Floriculture
Floriculture : फूलशेतीत सामूहिक शेतीचा पॅटर्न राबविण्याची गरज

मुंबईतून शेवंतीला पसंती

कोथळी, ता.शिरोळ येथील अण्णासाहेब मोगलाडे म्हणाले की दोन वर्षापासून शेवंती फुलांचे उत्पादन घेतो. यंदा पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. आमच्या भागात बोटावर मोजण्‍या इतक्‍या शेतकऱ्यांकडे शेवंती आहे. उत्पादन सुरू होऊन पंधरा दिवस झाले. त्या वेळी किलोला ५० ते ६० रुपये दर होता. गणेशोत्‍सवाच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढत गेली. आज दर दुप्पट झाले असून किलोस १२० ते १४० रुपये असा दर मिळत आहे.

सध्या दर तीन दिवसांनी काढणी होते. त्या वेळी १५ ते २० पेट्या आवक होते. प्रति पेटीत १२ किलो फुले असतात. सध्या स्थानिकपेक्षा मुंबई बाजारपेठेत शेवंतीला चांगला मागणी असल्याने तिकडेच पाठवण्याला प्राधान्य आहे. जितकी म्हणून फुले काढता येतील तितकी फुले काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पितृ पंधरवड्यापर्यंत जास्‍तीत जास्त फुले काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अण्णासाहेब मोगलाडे ९९२२१५५८२७

पुष्पहारांच्या किमतीतही वाढ

उत्सवाला प्रारंभ झाल्यापासून पुष्पहारांच्या विक्रीत तब्बल आठ ते दहा पटीने वाढ झाली आहे. सार्वजनिक मंडळाकडून दररोज सकाळी व रात्री भक्तांना आरतीचा मान देण्यात येतो. त्या वेळी मानकरी मंडळींकडून आकर्षक व मोठे पुष्पहार गणरायाला अर्पण केले जातात.

शहरांमधून सहा ते आठ फुटांपर्यंतच्या उत्सव मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. मूर्तीच्या उंचीनुसार हारांची ‘ऑर्डर’ देण्यात येते. पाच फुटांपर्यंतच्या हाराला तब्बल पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. पुष्पहारांची मागणी वाढल्याने फुलांचे दरही तेजीत आहेत.

चिंतामणी कोरे, पुष्पहार विक्रेते, जयसिंगपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com