Cgg. Sambhajainagar News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत गेल्या महिनाभरात ५ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ व जालना जिल्ह्यातील ३ प्रकल्पांचा यात समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात आतापर्यंत १५ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून २२ हजार ७४० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. एकूण १६ हजार मेगावॉट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल. यासाठी स्वतंत्र कृषी वीजनिर्मिती कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
आतापर्यंत योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून ११ हजार ७२५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. जालना जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या ७ प्रकल्पांतून ११ हजार १५ शेतकऱ्यांना दिवसा विजेचा लाभ होत आहे.
महावितरण उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फीडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली.
जिल्हानिहाय प्रकल्प क्षमता व कार्यान्वितता
छत्रपती संभाजीनगर
वैजापूर तालुक्यातील लोणी येथील १० मेगावॉटचा प्रकल्प १० एप्रिल रोजी कार्यान्वित झाला. त्यातून लोणी, वाकला, चिकटगाव, नायगव्हाण, खरज, तलवाडा व बाभूळतेल गावातील १६६५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे.
फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथे ५ मेगावॉटचा प्रकल्प २९ एप्रिल कार्यान्वित झाला आहे. त्यातून गेवराई गुंगी, रिधोरा देवी, कोलते टाकळी, धानोरा व निमखेडा गावातील ८५४ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे.
जालना जिल्हा
१९ एप्रिलला भोकरदन तालुक्यातील नळणी येथील ५ मेगावॉटचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून नळणी बुद्रुक, नळणी खुर्द, शिंदेवाडी, नळणीवाडी, बरंजळा साबळे, गव्हाण, तोंडोळी, बानेगाव, थिगळखेडा, चांदई, खापरखेडा, ताडेगाव व ताडेगाववाडी गावातील २१३९ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे.
२९ एप्रिलला अंबड तालुक्यातील चंदनापुरी येथे ४ मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून चंदनापुरी, भांबेरी, दह्याळा, चुरमापुरी व रेणापुरी गावांतील २२८० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे ५ मेगावॉटचा प्रकल्प ६ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला. रोहिलागड, माहेर भायगाव, देशगव्हाण, चिकनगाव व खेडगाव येथील ९१३ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.