Solar Energry Project: राज्यात १३५९ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प पूर्ण

Maharashtra Solar Krishi Vahini Yojana: राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १३५९ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प पूर्ण झाले असून, २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.
Solar Energy
Solar EnergyAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारून त्याच्या आधारे सर्व कृषी फीडर चालविण्यात येणार आहेत. आतापर्यंत राज्यात १३५९ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प पूर्ण झाले असून, त्यामुळे २ लाख १४ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात १५,२८४ मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे काम चालू आहे. एकूण १६ हजार मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वांत मोठा विकेंद्रित सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा आणि रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीजपुरवठा होतो. केवळ दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी या योजनेमुळे पूर्ण होणार आहे. सप्टेंबर २०२६ पर्यंत योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईल. केंद्र सरकारने या योजनेची प्रशंसा केली असून, अन्य राज्यांना तिचे अनुकरण करण्याची सूचना केली.

Solar Energy
Solar Energy Policy: वस्त्रोद्योगासाठी लवकरच नवीन सौर ऊर्जा धोरण

या योजनेसाठी महावितरणला इंडियन स्मार्ट ग्रीड फोरमचा राष्ट्रीय पुरस्कार, स्कोच ॲवॉर्ड असे राष्ट्रीय स्तरावरील सुमारे २० पुरस्कार मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या आतापर्यंतच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) मुंबईत ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीस अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी उपस्थित होते.

अनुदानात मोठी कपात होईल

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये महावितरणला सरासरी तीन रुपये प्रति युनिट इतक्या किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कृषिपंपांना मोफत वीज देण्यासाठी राज्य सरकारकडून द्याव्या लागणाऱ्या अनुदानात मोठी कपात होईल. तसेच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा हटवणे शक्य होणार आहे. एकूणच कृषी आणि उद्योग क्षेत्रांसाठी ही गेमचेंजर योजना आहे.

Solar Energy
Solar Agriculture Scheme : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची प्रलंबित कामे पूर्ण करा

७० हजार रोजगार उपलब्ध होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला. त्यानंतर अल्पावधीत सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी ४० हजार एकर जमीन उपलब्ध करणे, सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठीच्या निविदा काढून खासगी विकासकांना कार्यादेश देणे, नव्याने निर्माण होणारी वीज कृषिपंपांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचविण्यासाठी वीजजाळे बळकट करणे अशी कामे गतीने सुरू आहेत. या योजनेत सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणार आहे व ग्रामीण क्षेत्रात ७० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

१२ हजारांवर ग्राहकांनी घेतला लाभ

केंद्र सरकारने वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील १२ हजार ५१९ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या छतावर ४५.२७ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती केली जात आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळात महिनाभरात ६ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ व जालना जिल्ह्यातील दोन प्रकल्पांचा यात समावेश आहे. या योजनेत परिमंडळात आतापर्यंत १० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १५ हजार कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com