Agriculture Method : शेती म्हणजे नेमके काय? अशी विचारणा केल्यास आपल्याला अनेक उत्तरे मिळतात. मात्र असली अंकोली (जि. सोलापूर) येथील ऋषितुल्य कृषी अभियंते आणि पर्यावरण अभ्यासक अरुण देशपांडे यांनी त्यांच्या लेखात दिलेली व्याख्या अत्यंत वैज्ञानिक वाटते. ते म्हणतात, “ॲग्रिकल्चर मीन्स कल्चर्ड फोटोसिंथेसिस.
” निसर्गातील कोणतीही वनस्पती, झाड, झुडूप किंवा गवत असो, ते सूर्यप्रकाशाचे संश्लेषण करते. ‘शेती’ ही मानवाने केलेली निसर्गाची प्रतिकृतीच होय. त्यातही मुद्दाम लावलेल्या वनस्पतीद्वारे प्रकाश संश्लेषणातून अन्नधान्याचे उत्पादन घेतो. थोडक्यात, शेती करणे म्हणजे प्रकाशाचीच काढणी (हार्वेस्टिंग ऑफ लाइट) होय. सौर ऊर्जेचे अन्न ऊर्जेत रूपांतराची मानवनिर्मित यंत्रणा म्हणजेच ‘शेती’ होय.
सामान्यतः आपण शेती क्षेत्रफळामध्ये (लांबी गुणिले रुंदी) अशी मोजतो. पण अरुण देशपांडे त्याहीपुढे जात सांगतात, ‘‘शेती किंवा फळबाग ही क्षेत्रफळात मोजायची नसून घनफळात मोजायची असते. म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची अशा सर्व बाजूंनी विचार करून आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घन इंच कसा उत्पादक होईल, याचा विचार करायला हवा.’’
शहरात जसा बांधकामासाठी एफ. एस. आय. (Floor space index) असतो, तसाच शेतीमध्ये ‘लीफ एरिया इंडेक्स ‘ (Leaf Area Index) मोजावा. म्हणजेच एका चौरस फुटात किती हिरवी, आरोग्यपूर्ण आणि प्रकाश संश्लेषण करणारी पाने आहेत, ते मोजले पाहिजे. या पानांनी केलेल्या प्रकाश संश्लेषणातून किती बायोमास तयार व्हायला हवे, याचे गणित मांडले पाहिजे.
थोडक्यात, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला शेती किती मजल्यांची करायची, हे ठरवले पाहिजे. अशा शेतीचे जगभरामध्ये प्रयोग केले जात आहे. महाराष्ट्रातही याचाच संदर्भ घेत शेती केली जात आहे. त्यातून माती आणि पाण्याची उत्पादकता वाढवली जात असून, एकरी उत्पादनामध्ये दोन ते पाच पटीपर्यंत अधिक उत्पादन मिळवण्याची धडपड सुरू आहे. त्याची यशकथा सांगण्याचा हा प्रपंच.
आपण शेती करताना एक पीक, आंतरपीक किंवा मिश्र पीक यांचा विचार करतो. पण नीट विचार केला तर जाणवेल, की हे तीनही प्रकार आहेत, ते एकस्तरीय शेतीचे. पण मध्य प्रदेशातील कायम दुष्काळग्रस्त अशा सागर (बुंदेलखंड) जिल्ह्यातील आकाश चौरसिया हा युवक पाचस्तरीय (पाच मजल्यांची) शेती करतो. त्यासाठी या अभ्यासू शेतकऱ्याने वनस्पती आणि पीकशास्त्राची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घातली आहे.
प्रयोगातून पाच स्तरामध्ये पिके घेण्याचे प्रारूप उभे केले आहे. त्यातून गेल्या दहा बारा वर्षांपासून सातत्याने पारंपरिक शेतीच्या तुलनेत पाच ते सहा पट अधिक उत्पादकताही मिळवतो. बरे, यातून त्या क्षेत्रावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा सर्वाधिक वापर करत केवळ मातीचीच उत्पादकता वाढते असे नाही, तर पाण्याचीही उत्पादकता वाढते.
यातून एकरी पंधरा लाखांपर्यंत उत्पन्न घेत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही शेतकरी या प्रकारे शेती करू लागले आहे. आपल्या महाराष्ट्रातही सुभाष पाळेकरांनी या तंत्राचा पुरस्कार केला. त्यांच्या अनुयायी परिवारातील अनेक जण या तंत्राचा यशस्वीपणे वापर करत आहेत.
या बहुस्तरीय शेती पद्धतीचे फायदे
यात पाण्याच्या थेंब न् थेंबाचा पुरेपूर वापर होतो. पाण्याच्या उत्पादकतेत चार पटीपेक्षा ही अधिक वाढ होते.
जमिनीच्या उत्पादकतेतही अनेक पटींनी वाढ होते.
जमीन पूर्ण झाकली गेल्याने जमिनीतल्या पाण्याचे बाष्पीभवन शून्यावर येते.
जमीन पूर्ण झाकल्याने गवत उगवत नाही, त्यामुळे गवत काढण्याचा खर्च नाही. गवताचे कायमस्वरूपी उच्चाटन होते.
सूक्ष्म वातावरणामुळे कीड व बुरशी यांचे प्रमाण कमी राहते. मित्रकीटक व पक्षी पीक संरक्षणात मोलाची भूमिका बजावतात. या खर्चात बचत होते.
पहिल्या तीन आठवड्यांतच उत्पन्नाला सुरुवातही होते. सीमेवरील वृक्षामुळे ते दीर्घकाळ सुरूच राहते.
ही शेती पद्धती विनामशागत किंवा वर्षातून एकदा मशागत करूनही राबवता येते. त्यामुळे खर्चात बचत होते.
हरितगृह वायू परिणाम साधल्याने पिकाची सुदृढता उत्तम राहते.
कमीत कमी मनुष्यबळ लागते.
उत्पादन खर्चही सर्व पिकांमध्ये विभागून गेल्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते.
निती आयोगाने मान्य केलेला उपक्रम असून, विविध शासकीय अनुदानास ही शेती पद्धती पात्र आहे.
लक्ष देण्याच्या बाबी
पालेभाजी लावण्याचा कालावधी फेब्रुवारी.
त्यापूर्वी जमिनीची मशागत करणे, वाफे करणे, वाफ्यांच्या बाजूला रस्ता ठेवणे तसेच बांबू आणि तारांचा मंडप उभा करणे या बाबी पूर्ण करायच्या असतात.
ऊन सावलीचे गणित करून पिकांची निवड करणे.
माती परीक्षण करून खतांचे नियोजन. सर्व लागवडी पूर्वीच वर्षभराचा विचार करूनच खताचे नियोजन करणे.
विविध पिकांचे पर्याय अभ्यासणे.
या प्रगतिशील शेतकऱ्याने यात लावण्यायोग्य पिकांचे सुमारे ३६ वेगवेगळे पर्याय तयार केलेले आहेत.
अशी केली जाते पाच स्तरीय शेती..
या प्रकारची शेती कितीही आकारात करता येत असली तरी कमीत कमी अडीच एकर हे प्रारूप आदर्श मानले जाते. त्यापेक्षा जास्त क्षेत्र असल्यास त्याची विभागणी अडीच एकराप्रमाणे दोन ते चार प्लॉट अशी करावी. झाडांनी वेढलेली शेती असेल तर खूपच उत्तम. पण तशी नसल्यास शेताच्या चारही सीमेवर (पूर्ण लांबी-रुंदी) तीन रांगांमध्ये मोठ्या वृक्षाप्रमाणे वाढणारी फळ किंवा चारा देणारी झाडे लावावीत.
ही लागवड सीमेपासून ४ ते ५ फूट आत असावी. दोन रांगांमध्ये चार फूट तर दोन झाडांमध्ये दहा फूट अंतर असावे. बाहेरील रांगेत सर्वांत उंच झाडे असावीत. सुरुवाती मोकळी सोडलेली जागा अधिक वाटत असली, तरी त्यामुळे पुढे मोकळ्या हवेबरोबरच उपयुक्त अशा पक्षी, मित्र कीटक यांची संख्या व जैवविविधता वाढत जाते. ही उंच वाढणारी झाडे शेतीच्या आतमध्ये सूक्ष्म शेतीयोग्य वातावरण (मायक्रोक्लायमेटिक झोन) तयार करतात व पुढेही टिकविण्याचे काम करतात.
या झाडांमुळे तापमान नियंत्रणाबरोबरच वाहते उष्ण वाऱ्यावावदळाचा, पावसाची तीव्रता रोखली जाते. त्यांचे पिकांवरील नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते. सीमेवरील ही झाडे पूर्ण वाढण्यासाठी व चांगल्या संख्येने फळे मिळण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतात. अनेक शेतकरी झाडांच्या सावलीमुळे उत्पादकतेतील घटविषयी चिंता व्यक्त करतात. मात्र या घटीचे प्रमाण दहा टक्के इतकेच राहत असल्याचे अनुभवाने सांगतात.
झाडांच्या या तीन रांगांनंतर दोन फूट रुंद व दोन फूट खोल अशी नाली चारही बाजूंनी खोदावी. म्हणजे त्यात पावसाचे व शेती सिंचनातील जादा पाणी निचऱ्याने जमा होते. आपल्या शेतातील सुपीक माती अडकून राहते. हे पाणी झाडांसाठी फायद्याचे तर ठरतेच, पण सावकाशपणे जमिनीत मुरून भूजलात वाढ होते. या सर्व झाडांचा व शेतातील सर्व काडी कचरा टाकण्यासाठीही त्याचा वापर करता येतो. त्यातून भरपूर कंपोस्ट खत मिळते.
आता मध्ये उपलब्ध जागेमध्ये बांबू आणि तारांच्या साह्याने सात फूट उंचीचा मंडप तयार करावा. माणसाला शेतात सहज वावरता येईल इतक्या उंचीवर असलेल्या या तारांच्या जाळ्यावर गवत, भाताची तूस, पाचट, नारळाच्या झावळ्या यांचे तुरळक आच्छादन करावे. हे आच्छादन ५० टक्के ऊन अडवले जाऊन, ५० टक्के ऊन जमिनीपर्यंत पोहोचेल अशाप्रकारे पसरावे. या अर्धवट झाकलेल्या जमिनीत आले व हळद अशी पिके लावली जातात.
साधारणपणे पंधरा दिवसांनी कोंब येऊन अडीच ते तीन महिन्यामध्ये जमीन पूर्ण झाकून जाते. हाच झाला आपला दुसरास्तर. पहिल्या स्तरासाठी या पिकामध्ये राहिलेल्या मोकळ्या जागेत पालेभाजीची बी पेरावे. म्हणजे पालेभाजी पाच-सहा दिवसांतच उगवून वीस पंचवीस दिवसांतच ती जमीन झाकून टाकते. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. तणांचे प्रमाण कमी राहते. खुरपणीच्या खर्चात बचत होते.
या पिकांच्या वाढीचा वेग वेगवेगळा असल्यामुळे त्यांची मुळांची जमिनीतील खोलीही वेगवेगळी असते. त्यामुळे त्यात अन्नद्रव्ये व पाणी या बाबत फारशी स्पर्धा होत नाही. तीस - पस्तीस दिवसांत पालेभाजी काढून उत्पादन हाती येते. पालेभाजी उपटून काढण्याच्या प्रक्रियेत मातीचा तीन चार इंचाचा थर मोकळा भुसभुशीत होतो.
परिणामी, जमिनीत हवा खेळती राहून आले व हळदीच्या मुळांना मुबलक प्राणवायूचा पुरवठा होतो. पालेभाजी काढून झाल्यावर तिसरा स्तर म्हणून बांबूच्या बाजूला वेलवर्गीय भाज्यांची लागवड होते. बांबू व वरील तारांच्या जाळ्यावर वाढणारे वेल पसरून दिले जातात.
याच वेळी चौथा स्तर म्हणून नर्सरीत वाढवलेली दोन महिने वयाची तीन ते चार फूट उंचीची पपईची रोपे वेलापासून दूर आणि एकमेकांमध्ये बारा ते अठरा फुटांचे अंतर ठेवून लावली जातात. या चौथ्या स्तरासाठी पपईसारखेच अन्य पर्यायही आहेत. पपईची एकरी २०० ते २५० झाडे बसतात.
पपईच्या झाडांची उंची तारांच्या जाळीच्या वर गेली की फलधारणा होऊ लागते. शेवटची आणखी एक लागवड बांबूच्या रेषेत तीन ते चार फूट उंचीवर बांबूला तार आडवी बांधून त्यावर वेल सोडली जाते. या वेलांना अत्यल्प ऊन पुरते. या तारा व वेल बांबूच्या रेषेत असल्याने शेतात फिरण्यास अडथळा येत नाही. पाच स्तरातील विविध झाडांच्या मुळांची जमिनीखालील खोली पुढील प्रमाणे...
पालेभाजी - २ इंच, आले /हळद - २ ते ६ इंच, वेल - ९ इंच, पपई - दोन ते अडीच फूट. पूर्ण शेताला अति साध्या कापडाचे (विशेषतः जुन्या साड्यांचे) सहा ते सात फूट उंचीचे कुंपण करावे. या कुंपणामुळे होणारे फायदे पुढील प्रमाणे... विविध जनावरांपासून पिकांचे संरक्षण होते. शेजारच्या शेतातून व दुरूनही शेतात येणारे शत्रू किडीला या साडीच्या कुंपणामुळे अटकाव होतो. हे कीटक सामान्यतः जमिनीपासून सात ते आठ फूट उंचीपर्यंतच उडू शकतात. वाऱ्यासोबत उडून येणाऱ्या गवताच्या बियाण्यालाही या कुंपणामुळे अटकाव होतो.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८
(लेखक पाणी अभ्यासक असून,
पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.