ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : कोल्हापूर/सांगली ः कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत असल्याने खरीप पिकांसह लहान उसाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुमारे पंधरा हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. यापैकी साठ टक्के क्षेत्र उसाखालचे आहे. तर उर्वरित क्षेत्र भात व अन्य खरीप पिकांचे आहे. नद्यांचे पाणी सर्वदूर पसरल्याने शिवारे पाण्याखाली गेली आहेत. दूध संघांना होणारा लाखो लिटरचा दुधाचा पुरवठाही ठप्प झाल्याने दूध संघाच्या संकलनातही घट झाली आहे.
मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राज्य आणि जिल्हा मार्ग बंद झाले आहेत याचा थेट परिणाम जिल्ह्यातील दूध व्यवसायावर झाला आहे. गोकुळ आणि वारणासारख्या लाखो लिटर दूध संकलन करणाऱ्या संस्थांचे दूध संकलन ग्रामीण भागात होत असते, परंतु पूर परिस्थितीने दूध वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अकरा, तर ३७ जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. ९१ बंधारे पाण्याखाली आहेत. करवीर, शिरोळ तालुक्यांत स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अलमट्टी धरणातून गुरुवारपासून २ लाख ७५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारबरोबर चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. धरणातून गरजेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठीही चर्चा झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाचे १७ लाख लिटर गाय आणि म्हशीचे संकलन होत असते, परंतु मागच्या काही दिवसांत होत असलेल्या पावसाने काही ग्रामीण भागातील वाहतूक खोळंबली असल्याने दूध संकलनात घट झाली आहे. काल सकाळी आणि संध्याकाळी २७ हजार लिटर दूध संकलन कमी झाले होते, तर शुक्रवारी सकाळच्या अहवालानुसार १४ हजार लिटर गाय आणि म्हशीचं दूध संकलन कमी झाले आहे. दोन दिवसांत मिळून जवळपास ४१ हजार लिटर दूध संघात कमी आल्याची माहिती अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
आडसाली उसात मोठ्या प्रमाणात पाला असतो, परंतु सध्या होत असलेल्या पावसामुळे नदीकाठच्या पुराच्या पाण्याखाली हिरवी वैरण बुडाली आहे. तर माळरानावरील उपलब्ध असणारी वैरण भिजल्याने कुबट वास सुटला आहे. यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने दुभत्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. दरम्यान, पंचगंगा नदीचे पाणी धोकापातळीच्या वरून दोन फूट वाहत असल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (ता. २६) दुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नदीच्या पाण्याची पातळी ४५ फूट ५ इंच इतकी होती. राधानगरी धरणातून पाणी येत असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्यात गतीने वाढ होत आहे. वारणा व कृष्णा नद्याच्या पाण्यातही वेगात वाढ सुरू आहे. वारणा व कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने या दोन्ही नद्यांचे पाणी दोन दिवसांच्या तुलनेत गतीने वाढत आहे.
‘अलमट्टी’तून तीन लाख क्युसेकने विसर्ग
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत सर्व पातळ्यांवरून आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (ता. २५) दुपारनंतर तीन लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. गुरुवारी (ता. २५) अलमट्टी धरणात ८८.८९ टीएमसी इतका पाणीसाठा होता. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला असल्याने अलमट्टी धरणात शुक्रवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंत ८३.४९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. अर्थात ५.४ टीएमसीने धरणातील पाणीसाठा कमी झाला असल्याचे माहिती पाटबंधारे विभागाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.