Dr. Hiralal Chaudhary Agrowon
ॲग्रो विशेष

National Fish-Farmer Day : प्रेरित प्रजननाचे जनक

Team Agrowon

अमिता जैन

Dr. Hiralal Chaudhary Journey : अन्नधान्याच्या साह्याने सर्व जगभराचे पोषण करणे शक्य नाही, या गोष्टीची प्रचिती अनेक वैज्ञानिकांना होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा सबंध देश उपासमारीच्या समस्येशी दोन हात करत होता, त्याच वेळी भारतात मत्स्यपालन व्यवसायाला चालना मिळाली, मत्स्यबीज निर्मितीचा विस्तार झाला. मत्स्यबीज निर्मितीच्या संकल्पनेला विस्तार देण्याचे क्रांतिकारी कार्य महान मत्स्य वैज्ञानिक डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी केले.

भारताचा पूर्व उत्तरी हिस्सा विशिष्ट संस्कृती व समुदायामुळे प्रसिद्ध आहे. याच भागातील एक राज्य आसाम; खरं तर हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. आसाममधील एक ठिकाण शिलाटी येथे २१ नोव्हेंबर १९२१ मध्ये डॉ. हिरालाल चौधरी यांचा जन्म झाला. शिलाटी हे ठिकाण सध्या बांगला देशात श्रीहट्टा नावाने ओळखले जाते.

अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थी असलेले हिरालाल चौधरी यांनी १९४१ मध्ये आपले बीएसस्सी शिक्षण पूर्ण केले. १९४३ मध्ये कोलकाता विद्यापीठाच्या अंतर्गत त्यांनी प्राणिशास्त्र या विषयात एमएसस्सी पूर्ण केली. त्यानंतर सिलट येथील माणिकचंद महाविद्यालयात जैवविज्ञानिक विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. १९४७ मध्ये भारत-पाक फाळणीच्या दरम्यान त्यांना नोकरी गमवावी लागली. १९४८ मध्ये ते सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्ट्यिट्यूट, बरकपूर येथे कनिष्ठ संशोधन सहायक या पदावर रुजू झाले.

एकेदिवशी बरकपूर येथे राहत असताना गंगेच्या किनारी आढळणाऱ्या मासळीचे फुगलेले पोट दिसून आले. ते पोट दाबताच त्यातून पारदर्शी अंडे बाहेर आले. निरीक्षणाकरिता त्यांनी ही अंडी एका भांड्यात जमा केली आणि निरीक्षणादरम्यान डॉ. चौधरी यांना कार्प माशांच्या प्रेरित प्रजननाची संकल्पना सुचली. तलावातील बंदिस्त प्रणाली कार्प प्रजातीच्या प्रजननासाठी प्रतिकूल असल्याने अशा वातावरणाचा परिणाम माशांच्या पीयूषिका ग्रंथी व जननग्रंथीवर होत असे.

या दोन्ही ग्रंथीच्या अपुऱ्या स्रावांमुळे माशांचे बंदिस्त प्रणालीत प्रजनन होत नसे. त्या काळात कार्प प्रजातीच्या संवर्धनाकरिता संपूर्णपणे नैसर्गिक बीजावर अवलंबून राहावे लागत असे. मत्स्यबीज उत्पादनाची समस्या सोडविण्याकरिता प्रेरित प्रजननाच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला. या शोधामुळे भारतात आज रोजी मोठ्या प्रमाणात भूजलाशयीन मत्स्योत्पादन घेतले जाते. भूजलाशयीन मत्स्यप्रजातीमध्ये कार्प मासळीला जागतिक बाजारपेठेत खूप महत्त्व आहे.

सर्वप्रथम हा प्रयोग ‘स्मॉल मड गोबी प्रजातीच्या माशांवर करण्यात डॉ. चौधरी यांना यश मिळाले. त्याच वेळी १९५० मध्ये त्यांची वरिष्ठ संशोधन सहायक या पदावर ‘सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या पाँड कल्चर सेक्शनमध्ये पदोन्नतीने नियुक्ती झाली. जेथे ते डॉ. अलीकुन्ही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. डॉ. अलीकुन्ही यांनी डॉ. चौधरी यांना त्यांच्या प्रयोगाचे कार्य करण्याकरिता नेहमी प्रेरणा दिली.

त्याचबरोबर अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीतील मत्स्य प्रेरित प्रजनन या विषयात पारंगत असलेल्या जगभरात प्रख्यात डॉ. स्विंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना अमेरिकेत पाठवले. १९५५ मध्ये ‘पीयूषिका ग्रंथीच्या अर्का’चा (pitutory gland extract) मत्स्य प्रजननावर होणारा परिणाम या विषयाचा शोधनिबंध लिहिला व या निबंधाच्या साह्याने अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीमधून मत्स्यपालन व्यवस्थापन या विषयातून ‘मास्टर ऑफ सायन्स’ ही पदवी मिळवली.

त्यानंतर ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर १९५५-५६ मध्ये त्यांनी देशातील काही मूळनिवासी प्रजातींच्या माशांचे प्रेरित प्रजनन यशस्वीरीत्या पूर्ण केले. पुढे डॉ. अलीकुन्ही यांनी ‘सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथे प्रेरित प्रजननाद्वारे मत्स्यबीज निर्मिती या विषयावर ओडिशा या ठिकाणी एक मोठा प्रकल्प राबवला. १० जुलै १९५७ रोजी या दोन शास्त्रज्ञांना प्रेरित मत्स्यप्रजननाच्या प्रयोगात यश मिळाले. त्यानंतर भारतातील मत्स्य शेतीचा चेहरा मोहरा बदलला. डॉ. हिरालाल चौधरी यांना मिळालेले हे यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवात ठरली.

प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या प्रेरित प्रजननातून तयार झालेल्या मत्स्य जिऱ्यांना यशस्वीरीत्या अर्ध बोटुकली व त्यानंतर बोटूकली आकारापर्यंत विकसित करण्यात आले. १९५८ मध्ये डॉ. हिरालाल चौधरी यांनी जगात सर्वप्रथम लेबिओ, सिऱ्हीनस व कटलासारख्या मत्स्य प्रजातींचे यशस्वीरीत्या प्रजनन करून मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज निर्मिती करण्याची संकल्पना जगापुढे मांडली.

एवढेच नव्हे तर हे तंत्र मत्स्यकास्तकारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक मत्स्य व्यवसाय विभागांच्या अधिकाऱ्यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मदतीने अत्यंत अल्प कालावधीत हे तंत्रज्ञान सर्वसामान्य मत्स्यकास्तकारांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. डॉ. चौधरी यांच्या यशस्वी प्रयोगामुळे भारतातील भूजलाशयीन मत्स्य उत्पादनात मोठी प्रगती झाली आहे.

पुढे १९५९ मध्ये डॉ. चौधरी यांची पदोन्नती मत्स्य व्यवसाय विस्तार अधिकारी या पदावर झाली. त्यांना कोलकाता युनिव्हर्सिटीने १९६१ मध्ये आचार्य पदवी प्रदान केली. या पदवी अभ्यासक्रमात त्यांनी ‘पीयूषिका ग्रंथी अर्का’चा मासळीच्या प्रजननावर होणारा परिणाम हा शोध निबंध लिहिला. १९७१ ते १९७५ मध्ये त्यांनी भुवनेश्‍वरमध्ये स्थित सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर येथे कार्य केले.

१९७५ मध्ये पॅसिफिक सायन्स काँग्रेसदरम्यान जपानचे प्रख्यात डॉक्टर कुरोनुमा यांनी त्यांना ‘फादर ऑफ इंड्युस्ड ब्रीडिंग’ हा किताब बहाल केला. त्याचबरोबर डॉ. चौधरी यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. १९७६ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर डॉ. चौधरी यांनी फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन (FAO), ‘साउदर्न एशियन फिशरीज डेव्हलपमेंट सेंटर’ (SEAFDEC) सारख्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थांबरोबर काम केले.

डॉ. हिरालाल चौधरी यांना मिळालेले यश भारतातील नीलक्रांतीच्या सुरुवातीस कारणीभूत ठरले. २००१ मध्ये डॉ. चौधरी यांच्या कार्यास सन्मानित करण्यासाठी भारत सरकारद्वारे १० जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय मत्स्य-शेतकरी दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. अशा महान व्यक्तीचे कार्य मत्स्य व्यवसायाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणी राहावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

(लेखिका सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT