Agriculture Land  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : शहरात शेतजमीन राखणे पडले महागात

Farmland : आजूबाजूचे शेतकरी हळूहळू जमीन विकायला लागले तरी जवळ येणाऱ्या नागरीकरणाचा कोणताही परिणाम गणपतरावांवर झाला नाही. ते मात्र आपली नावीन्यपूर्ण शेती कशी करता येईल, यावरच लक्ष केंद्रित करीत राहिले.

Team Agrowon

Indian Agriculture : गणपतराव हे प्रयोगशील शेती करण्यासाठी साऱ्या गावात प्रसिद्ध होते. पिकांसाठी नवनवीन प्रयोग करणे, कधी केळीच्या उत्पादनाचा उच्चांक तर कधी मका पिकाचे सर्वाधिक उत्पादन, कधी नवीन भाजीपाला पिके, उत्कृष्ट नर्सरी या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गणपतरावांना एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जात असे. त्यातच शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्यामुळे शासकीय दफ्तरी पण त्यांचा मान वाढला होता. आजूबाजूचे शेतकरी हळूहळू जमीन विकायला लागले तरी जवळ येणाऱ्या नागरीकरणाचा कोणताही परिणाम गणपतरावांवर झाला नाही. ते मात्र आपली नावीन्यपूर्ण शेती कशी करता येईल, यावरच लक्ष केंद्रित करीत राहिले. 

गाव जेव्हा महापालिकेत समाविष्ट होण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा मात्र गणपतरावांच्या दोन्ही मुलांनी वडिलांना जमिनीबद्दल प्रश्‍न विचारायला सुरुवात केली. थोरला मुलगा माधव म्हणाला, ‘‘शहरात आपली जमीन आल्यावर लोकांची वर्दळ फार वाढेल. लिंब, संत्री आणि केळी ही पिके आता यापुढे घेणे आपल्याला अतिशय अवघड आहे असे वाटते.’’

त्यावर वडील गणपतराव असं म्हणाले, ‘‘आपले नावच मुळात चांगल्या शेतीमुळे निर्माण झाले आहे. शेती शहरात आली म्हणून फ्लॅट बांधून त्या खुराड्यात जगणे मला काही योग्य वाटत नाही. फ्लॅट संस्कृती आली तर आपला जीव गुदमरून जाईल. त्यामुळे जेवढे दिवस शेती करता येईल तेवढी करत राहू. वाटलं तर आता आपण तारेचे कुंपण करू, जेणेकरून आजूबाजूची वर्दळ फार वाढणार नाही.’’ त्यावर माधव म्हणाला, ‘‘ते खरे आहे. पण ही जमीन विकून ३०-४० किलोमीटर अंतरावर पाण्याची सोय बघून एखादी जमीन आपण घेऊ शकलो तर आपली शेती पुढे पण चालू राहू शकते.’’

त्यानंतर धाकटा मुलगा धनंजय वडिलांना म्हणाला, ‘‘हे बघा. मला जास्त भीती स्थानिक पुढाऱ्यांची वाटते. फक्त आपलीच मोठी शेतजमीन शहरात आली की सगळ्यांच्या डोळ्यावर येणार! आपल्या जमिनीवर क्रीडांगण, पार्किंग, ड्रेनेज स्कीम, पाणीपुरवठा योजना किंवा स्मशानभूमी यापैकी कशाचे तरी आरक्षण हे पुढारी टाकतील. पुढची पंचवीस वर्षे आपण या आरक्षणाच्या कचाट्यातून बाहेर निघू शकणार नाही.’’ दुर्दैवाने झाले तसेच. निवडणुका जवळ आल्या होत्या. स्थानिक पुढाऱ्यांची महापालिकेमधली वर्दळ वाढली होती. घाईघाईने जेवढे निर्णय घेता येतील याचा सपाटा सुरू होता. आजूबाजूच्या परिसरात दररोज गणपतराव बागायती जमीन शोधत होते. लोकसुद्धा त्यांना जमिनीचे भाव वाढवून सांगत होते. 

एक दिवस बारा गावे महापालिकेत समाविष्ट करणारी शासनाची प्राथमिक अधिसूचना निघाली. त्यामध्ये लोकांच्याकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या, अर्थातच त्यामध्ये गणपतरावांच्या गावाचा समावेश होता. हरकती मागवल्या तरी ही केवळ औपचारिकता होती आणि निवडणुकीच्या पूर्वी अंतिम अधिसूचना निघेल याची प्रत्येकाला खात्री होती. इतर गाववाल्यांप्रमाणेच गणपतरावांनी पण दहा पानांची हरकत जोडली. शेतीनिष्ठ पुरस्काराची प्रत, पिकांचे फोटो अशी शंभर पाने त्याने आपल्या हरकतीला जोडली होती. यातले कोणीही काहीही वाचणार नाही हे मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हते.

गावकऱ्यांनी एक दिवस चावडीच्या समोर बसून आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेसमोर मोठा मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.  महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांना प्रत्येक हरकत वाचली जाईल व योग्य तो अहवाल सरकारला सादर केला जाईल असे औपचारिक उत्तर दिले. सर्व गावकऱ्यांना मात्र बिल्डर लोकांच्या जमिनी आरक्षणातून वगळल्या जाणार आणि आपल्या जमिनीवर असणारे आरक्षण मात्र कायम राहणार याची मनातून गॅरंटी होती. 

उत्तम शेती करणाऱ्या आणि आयुष्यात शेतीच्या पलीकडे कशाचाही विचार न केलेल्या गणपतराव यांना अधिसूचनेच्या एका कागदामुळे मोठा धक्का बसला होता. अचानक आलेल्या या संकटामुळे गणपतराव हबकून गेला. गणपतरावचे नाव समाजात मोठे झाले होते त्याच जमिनीमुळे आता नवे प्रश्‍न उपस्थित झाले. इतर गावकरी गुंठेवारीने श्रीमंत झाले होते पण त्यांच्या तुलनेत गणपतराव मात्र वेडा ठरला होता. त्यामुळे गणपतराव मनातून खचला. 

पुढच्या चार-पाच महिन्यांत केवळ अंतिम अधिसूचना निघाली नाही तर गणपतरावच्या शेत जमिनीवर स्मशानभूमीचे आरक्षण सुद्धा पडले. या स्मशानभूमीच्या आरक्षणाने स्मशानभूमीत जाईपर्यंत, अर्थात शेवटपर्यंत गणपतरावची पाठ सोडली नाही. एवढी वर्षे शहरात शेतजमीन राखायचा प्रयत्न केला त्यामुळेच महापालिकेला आरक्षण टाकण्याची संधी मिळाली होती.आपण जर घरे बांधली असती तर स्मशानभूमीचे आरक्षण पडले नसते असे माधव आणि धनंजय यांना शेवटपर्यंत वाटत राहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT