Nashik News : निफाड, येवला व दिंडोरी तालुक्यांतील ५३ बंधाऱ्यांसह येवला व मनमाडच्या पाणी योजनांचे साठवण तलाव भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, या आवर्तनात नियोजित असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी बंधारा भरून न दिल्याने दुगलगाव व देवळाणे येथील आक्रमक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १०) कोरड्या बंधाऱ्यात धरणे आंदोलन केले.
नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील बोकटे यात्रेसाठी आरक्षित असलेल्या भैरवनाथ मंदिराजवळील आरक्षित बंधारा पाटबंधारे विभागाने भरून न दिल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. बुधवारी (ता. १०) सकाळी दहाला बोकटे येथील कोरड्या बंधाऱ्यात बसून ग्रामस्थांनी पालखेडच्या विरोधात दीड तास घोषणा देत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
दुगलगावची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास असून देवळणे येथील लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. दोन्ही गावांना दररोज प्रत्येकी एक टँकर पिण्याच्या पाण्यासाठी सुरू आहे. बोकटे गावलाही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू असून एप्रिलमध्ये पाणीटंचाई भीषण झाली आहे. जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप आहे.
आंदोलनात रावसाहेब लासुरे, सोमनाथ हरिश्चंद्रे, भिकाजी निकम, लक्ष्मण कोटमे, सखाहरी लासुरे, वाल्मीक काळे, चांगदेव मोरे, राजू पठाण, नामदेव काळे, राजेंद्र गोसावी, गोरख काळे, सुरेश बोंबले, मच्छिंद्र गोसावी, साईनाथ बोंबले, निवृत्ती गांगुर्डे, चांगदेव मोरे, गणेश कोटमे, विक्रम म्हस्के आदींसह शेतकरी सहभागी झाले.
आदेश धाब्यावर
जिल्हाधिकाऱ्यांनी पालखेड डावा कलव्यावरील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यांतील ५३ आरक्षित बंधारे भरून देण्याचे आदेश दिले असताना कोळगंगा नदीला बंधारे भरण्यासाठी सोडलेले पाणी बोकटे गावाच्या वेशीवरच बंद झाले. पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांमुळे आरक्षित बंधारे भरून दिले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे जबाबदार असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यात्रोत्सव अडचणीत
पालखेड कालव्याच्या आवर्तनातून आरक्षित बंधारे भरून दिले जात आहे. येवला शहरासह ३८ गावे नळ पाणीपुरवठा योजना, मनमाड शहर आणि मनमाड रेल्वे आदींचे साठवण तलाव भरल्यानंतर बोकटे यात्रेसाठी पुढे पाणी सोडण्यात आले. अंदरसूल परिसरातील पाच ते सहा आरक्षित बंधारे भरल्यानंतर बोकटे येथील भैरवनाथ मंदिरालगत आरक्षित बंधारा पालखेड विभागाने भरून दिला नाही.
यामुळे १ मे रोजी होणाऱ्या यात्रेवर पाणी संकट निर्माण झाले आहे. कोळगाव नदीवरील बंधारा भरून द्यावा, यासाठी ग्रामस्थांनी २१ मार्चला तहसीलदार आबा महाजन यांनाही निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने यानंतरही बंधारा भरून दिला नाही. दोन्ही बंधारे भरून न दिल्याने दुगलगाव व देवळाणे या दोन्ही गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. बंधारा भरून दिला असता तर या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.