Palghar News : विक्रमगड तालुका हा निसर्गरम्य आणि हवामानाच्या दृष्टीने उत्तम; तसेच सुपीक जमीन असलेला तालुका आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळ्यात भात लागवड, तर उन्हाळ्यात कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेत असतात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात सूर्यफूल या खाद्यतेल देणाऱ्या पिकाची लागवड शेतकरी उन्हाळी हंगामात घेऊ लागले आहेत.
या वर्षी तालुक्यात उन्हाळी हंगामात ३०० पेक्षा अधिक हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आलेली आहे. तर अंदाजित आकडेवारीनुसार ४० ते ४५ हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड केली आहे. गेल्या वर्षीही अंदाजित ३० हेक्टरवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली होती. यंदा लागवडीचा आकडा वाढता आहे.
सूर्यफुल हे खाद्यतेल देणारे पीक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे आहे. या पिकाच्या लागवडीचा खर्च व मजुरांची गरजही कमी प्रमाणात लागते. त्यामुळे या पिकांपासून थोडी मेहनत घेतल्यास मोठे उत्पन्न मिळते. या पार्श्वभूमीवर विक्रमगड तालुक्यातील माण, ओंदे व इतर गावांतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेती खाचरांवर आपल्या कुटुंबाच्या मदतीने सूर्यफुलाची लागवड केली आहे.
तालुक्यात सूर्यफुलाच्या लागवडीला हवामान व जमीन योग्य असल्याने या पिकाचे मोठे उत्पन्न येण्याचा अंदाज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी माहिती देताना सांगितले. या लागवडीसाठी बियाणे, खत, मजुरी, ट्रॅक्टर असा मिळून मर्यादित खर्च येतो. पिकाच्या लागवडीनंतर फक्त आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते. तर खतही एकदाच घालावे लागते. पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. एक ते दोन मजूर सर्व पिकांची लागवड; तसेच देखभाल करू शकतात.
तालुक्यात हवामान व जमीन सूर्यफुल पिकास अनुकूल असल्याने शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. त्याला भरघोस पीक आले आहे. दीड एकर जागेत लागवड केलेल्या पिकापासून १५ डबे खाद्यतेल (प्रति १५ किलो) म्हणजेच २२५ किलो खाद्यतेल मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. १४० ते १६० किलो दराप्रमाणे हे ते विक्री होते. हे पीक तीन ते साडेतीन महिन्यांत लागवडीनंतर तयार होते.
तेल बनण्याची प्रक्रिया
सूर्यफुलांची तोडणी करून त्यातील बिया काढून त्या तेल काढणाऱ्या घाण्याद्वारे गाळले जाते. तेल गाळून झालेल्या चोथ्याचा (पेडींचा) उपयोग शेतीच्या खतासाठीही करता येतो. अगर जनावरांना खाद्य म्हणून वापरता येते. या तेल गाळण्याच्या घाणी पालघर तालुक्यात मनोर येथे आहे. सूर्यफुलाच्या तेलाला बाजारात मोठी मागणीही आहे, असे मत माण येथील शेतकरी जगदीश पाडवी व्यक्त केले.
अल्प खर्चात चांगले उत्पन्न
माण येथील शेतकरी धनराज पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी एक एकरमध्ये सूर्यफुलाची लागवड केली आहे. अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळेल, असे सांगितल्याप्रमाणे धनराज पाटील, नीलेश गांगोडा, विनायक गांगोडा, गुरुनाथ गायकवाड, कैलास जाधव, जगदीश पाडवी व इतर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. माण गावातच जवळ-जवळ चार ते पाच हेक्टरच्या आसपास लागवड करण्यात आली आहे.
बदलत्या वातावरणामुळे सर्वच पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यात सूर्यफुलाची बियाणे बाजारात उपलब्ध होत नसल्याने चढ्या भावाने बियाणे खरेदी करावे लागते. अनेक शेतकरी सूर्यफूल लागवडीपासून वंचित राहतात. कोकण कृषी विद्यापीठाने अनुदानात सूर्यफूल पिकाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- प्रतिक पाटील, शेतकरी, विक्रमगड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.