Sunflower Cultivation : सुधारित, संकरित सूर्यफूल वाणाची करा लागवड

Sunflower Variety : सुर्यफूल हे महाराष्ट्रातील कमी कालावधीत येणारे गळितधान्य पीक आहे. सूर्यप्रकाशात संवेदनशील नसल्यामुळे तिन्ही हंगामात घेता येण्याजोगे पीक आहे.
Sunflower Variety
Sunflower CultivationAgrowon
Published on
Updated on

डाॅ. किशोर कि. झाडे, डाॅ. पी. एन. चिरडे, पी. ए. बोथीकर

सुर्यफूल हे महाराष्ट्रातील कमी कालावधीत येणारे गळितधान्य पीक आहे. सूर्यप्रकाशात संवेदनशील नसल्यामुळे तिन्ही हंगामात घेता येण्याजोगे पीक आहे. विशेषतः पेरणी लांबल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत घेण्यायोग्य व पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करणारे पीक म्हणून त्याचे महत्त्व मोठे आहे. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित / संकरित वाणांचा तसेच प्रगत लागवड तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे.

हवामान : सूर्यफुलाचे पीक ७०० ते १००० मि.मी. पर्जन्यमानात चांगले उत्पादन देऊ शकते.

जमीन : पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. सूर्यफुलानंतर सूर्यफुलाचे पीक घेण्याचे शक्यतो टाळावे.

पूर्वमशागत व भरखते : जमिनीची तीन वर्षांतून एकदा खोल नांगरणी करावी. वखराच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी ५ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

बियाण्याचे हेक्टरी प्रमाण :

सरत्याने ८ ते १० किलो

टोकण पद्धतीने ५ ते ६ किलो,

सूर्यफुलाकरिता दुसऱ्या पिढीतील संकरित वाणाचे बियाणे वापरू नये, कारण त्यामुळे उत्पादनात खूप घट येते.

बीज प्रक्रिया : शेतातच पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ : उन्हाळी हंगामात जानेवारी शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी अखेरपर्यंत पेरणी करावी. पठाल फिरवून बी झाकावे. त्यामुळे एकाच वेळी उगवण होण्यास मदत होईल.

पेरणीची पद्धत ः सरत्याने किंवा टोकून पेरणी करताना ओळीतील अंतर ४५ (सरळ वाणांकरिता सें.मी. किंवा ६० सें.मी. (संकरित वाणांकरिता) व झाडातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. माॅडर्न या वाणासाठी हे अंतर ४५ बाय ३२.५ सें.मी. ठेवावे. पेरणीकरिता सरी वरंबा पद्धत चांगली आहे.

विरळणी : उगवणीनंतर १०-१५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोपटे ठेवावे. विरळणीस जास्त उशीर करू नये. विरळणी योग्य वेळी केल्यामुळे हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्येहून उत्पादन चांगले मिळते.

Sunflower Variety
Ornamental Sunflower, white Marigold : शोभिवंत सूर्यफूल, पांढऱ्या झेंडूची नवी जात

आंतरमशागत : सूर्यफुलास २ ते ३ वेळा डवरणी (कोळपणी) व आवश्यकतेनुसार निंदण करून पीक ४५ दिवसांचे होईतोपर्यंत तणविरहित ठेवावे.

ओलित व्यवस्थापन : उन्हाळी हंगामात सूर्यफूल पिकाला उगवणीच्या वेळी, कळी, फुलोरा, दाणे भरणे व परिपक्व होण्याच्या अवस्थांमध्ये ओलित करावे. पीक फुलोऱ्यावर असताना तुषार सिंचन करू नये.

किडी व त्यांचे व्यवस्थापन

तुडतुडे : तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व फिक्कट हिरव्या रंगाचे असतात. ते पानाच्या मागील बाजूवर शिरांच्या फटीत आढळतात. प्रौढ व पिले पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने वाकडी तिकडी होतात आणि वाळतात.

एकात्मिक व्यवस्थापनासाठी

नत्राची मात्रा शिफारशी प्रमाणेच द्यावी.

पेरणीपूर्वी इमिडाक्लोप्रीड (४८ टक्के एफ.एस.) ५ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम (३० टक्के एफएस) २ मि.लि. प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी दोन तुडतुडे / पान ही गाठल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एस.एल.) १०० मिलि प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी (२ मि.लि. /१० लिटर पाणी) (लेबल क्लेम).

फुलकिडे : आकाराने लहान पिवळसर पांढऱ्या रंगाचे प्रौढ आणि पिले पानाच्या पृष्ठभागावर आढळतात. पाने खरवडल्यामुळे निगालेल्या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानाच्या वरील भागावर चट्टे दिसतात. तीव्र प्रादुर्भावामध्ये पाने वाळतात व झाडांची वाढ खुंटते.

Sunflower Variety
Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी वाढली; क्षेत्र ४००० हेक्टरवर

व्यवस्थापन

पेरणीपूर्वी थायामेथोक्झाम (३० टक्के एफ एस) ३ मि.लि. प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.

फुलकिडे सूर्यफुलावर नेक्रोसिस रोगाचा प्रसार करतात.

फवारणी

पेरणीनंतर १५ व ३० दिवसांनी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एस.एल.) १०० मि.लि. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात (२ मि.लि. / १० लिटर पाणी) (लेबल क्लेम)

तंबाखूची पाने खाणारी अळी : मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर फिक्कट पिवळी अंडी एक एक करून घालते. अळ्या फुले येण्याआधी सूर्यफुलाची कोवळी पाने खातात. फुले धरल्यावर अळ्या फुलातील बिजांडकोश खातात. त्या दुधाळ बी खाऊनही नुकसान करतात. त्यामुळे स्तबकावर पोकळ्या आढळून येतात. उत्पादनात लक्षणीय घट होते.

केसाळ अळी : माती पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानातील हिरवा भाग कुरतडून खातात. म्हणून पाने जाळीदार दिसतात. मोठ्या अळ्या शेतभर पसरतात. त्या पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. अंडीपुंज व जाळीदार पाने अळ्यासहित काढून नष्ट करावीत.

या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी : सायपरमेथ्रीन (१० टक्के ई.सी.) ६५० ते ७६० मि.लि. प्रति हेक्टरी ५०० ते ७०० लिटर पाणी (१३ मि.लि. / १० लिटर पाणी)

किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

पिकांचा योग्य फेरपालट करावा. सूर्यफुलावर सूर्यफूल घेणे टाळावे.

किडीचा प्रादुर्भावाचे क्षे असलेल्या ठिकाणी वरील प्रमाणे योग्य ती बीजप्रक्रिया करावी.

नत्राची मात्रा शिफारशीप्रमाणेच द्यावी.

शेत तसेच बांध स्वच्छ ठेवावे.

अंडीपुंज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील अळ्यासकट गोळा करून नाश करावा.

प्रकाश सापळ्याचा रात्री ७ ते ११ च्या दरम्यान वापर करून पकडलेल्या पतंगांचा नाश करावा.

तंबाखूच्या पाने खाणाऱ्या अळींच्या व्यवस्थापानासाठी कामगंध सापळ्यांचा ५ ते ६ प्रति हेक्टरी वापरावेत.

कीटकनाशकांचा वापर कमीत-कमी करून नैसर्गिक शत्रूंचा उपयोग करून घ्यावा.

किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावर शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य मात्रेत वापर करावा.

मधमाश्यांच्या परागीकरणामुळे सूर्यफुलाचे उत्पादन वाढीला मदत होते. शक्यतो या काळात कीडनाशकाचा वापर टाळावा. अगदी आवश्यकता असल्यास त्यांच्या वावरावर परिणाम होईल, अशा वेळा टाळाव्यात.

परागीकरण

सूर्यफुलातील बी भरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी मधमाश्यांच्या पेट्या हेक्टरी पाच या प्रमाणात ठेवल्यास सर्वांत उत्तम. ते शक्य नसल्यास पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान एक दिवसाआड फुलावरून हात फिरवावा. हाताने परागीकरणही शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फक्त फुलांवर फवारणी करावी.

- डाॅ. किशोर कि. झाडे, (वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रमुख) ८२६३९१०६००

- डाॅ. पि.एन. चिरडे, (विषय विशेषज्ञ, कृषीविद्या), ८४११८४०७८२

- पी.ए. बोथीकर, (विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण), ९७६७४००४५६

कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली अंतर्गत डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com