Deshi Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Deshi Seeds : देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी

Collection of seeds : पणदूर (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने मुख्य भात व अन्य पीकवाणांचा मिळून सुमारे ७१ देशी व दुर्मीळ बियाण्यांचा संग्रह बीज बँकेच्या रूपाने केला आहे.

Team Agrowon

एकनाथ पवार

Agricart Farmers Producer Company : पणदूर (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने मुख्य भात व अन्य पीकवाणांचा मिळून सुमारे ७१ देशी व दुर्मीळ बियाण्यांचा संग्रह बीज बँकेच्या रूपाने केला आहे. बियाणे संकलन, संवर्धन, बीजोत्पादनासह बियाणे विक्री व तांदळाची विक्रीही कंपनीने सुरू केली आहे. त्यातून कंपनीच्या सदस्यांचे अर्थकारण उंचावण्यासही मदत होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य अन्नपीक आहे. सध्या जिल्ह्यात ६२ हजार हेक्टरवर हे पीक असावे असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन व त्याची क्षमता असली तरी भात हे पीक केंद्रस्थानी ठेऊन कार्य करणारी शेतकरी कंपनी जिल्ह्यात अस्तित्वात नव्हती. हीच गरज ओळखून ल्युपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू व अन्य लोकांनी पणदूर, रानबांबुळी परिसरातील शेतकऱ्यांना कंपनी स्थापना करण्याविषयी सुचविले. त्यातून रानबांबुळी येथील प्रगतशील शेतकरी संतोष गावडे, बायफ संस्थेसोबत कामाचा अनुभव असलेले याच गावचे सचिन चोरगे यांनी पुढाकार घेतला. परिसरातील शेतकऱ्यांनाही कंपनीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

ल्युपिन, बायफ यांच्यासह वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग, कृषी विभाग हे सर्व घटक शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी पुढे आले. जिल्ह्यातील पोषणमूल्य असलेल्या तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पारंपरिक, अर्थात देशी बियाण्यांचे संवर्धन करण्याचे ध्येय कंपनीने निश्‍चित केले. भातासह कडधान्ये, कंद, वन्यपिके, फळे- भाजीपाला यांच्या देशी बियाण्यांचे जतन करण्याचा संकल्प सोडण्यात आला. सन २०१८ मध्ये कामास सुरुवात झाली. पण २०१९ मध्ये ‘ॲग्रीकार्ट शेतकरी उत्पादक कंपनी’ची अधिकृत स्थापना झाली. सध्या ५१६ सभासद आहेत. कृषकाणां हितार्थाय, लोकनाम सुखाय असे ब्रीदवाक्य आहे. गावठण हा बियाणे ब्रॅण्ड आहे. संचालकांमध्ये रामबांबुळी, डिगस, हिर्लोक, अणाव, झाराप, हुमरमळा आदी गावांतील मंडळींचा समावेश आहे. संतोष गावडे (रानबांबुळी) अध्यक्ष आहेत. तर संचालकांमध्ये सचिन चोरगे, संदीप धावले, विनोद सावंत, दर्शना दिलीप पालव, शरद धुरी, न्हानू पालव, सुनील कदम, उमा महादेव पालव, कैलास धावले व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय चव्हाण यांचा समावेश आहे.

बियाणे संवर्धन झाली मोहीम

संकरित आणि सुधारित भातबियाण्यांचा वापर अलीकडील काळात वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक पारंपरिक बियाण्यांचा शोध घेणे आव्हानात्मक होते. परंतु शेतकरी कंपनीच्या सभासदांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन विविध गावांतील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याकडून बियाण्यांचे संकलन करणे अशा प्रकारची मोहीमच सुरू केली. याच कालावधीत पारंपरिक बियाण्यांचा अभ्यास करीत असलेले समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव हे देखील कंपनीशी जोडले गेले. कामाच्या निमित्ताने शेकडो शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क यायचा. त्यांनी ३० हून अधिक भातबियाण्यांचे संकलन करून कंपनीला दिले. काही कडधान्ये दिली.

बियाणे बँक, तांदूळ विक्री

संकलित बियाण्यांची लागवड, चिकित्सा, त्यातून शुद्ध बीज निवडणे, ते गरजू किंवा इच्छुक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास
कंपनीने सुरुवात केली. तीन- चार गावांत ३६ एकरांवर काही प्रयोग घेण्यात आले. बियाणे बँकेची निर्मिती करण्यात आली. कामाने जोर धरला असताना मार्च २०२० मध्ये कोरोना धडकला. सुरुवातीचे काही दिवस काम ठप्प झाले. परंतु याच संधीचा फायदा घेत
आरोग्यदायी म्हणून महत्त्व असलेल्या वाणांची विक्री करण्याचे कंपनीने ठरविले. वालय या लाल तांदळाची पेज तापासाठी उपयुक्त ठरते हे समजल्यानंतर त्यास मागणी वाढली. कंपनीने अनेक शेतकऱ्यांकडून हा तांदूळ खरेदी करून त्याची विक्री केली.

बियाणे व तांदूळ विक्री

कंपनीने २०२१ मध्ये ५०० किलो, २०२२ मध्ये ७५० किलो, तर २०२३ मध्ये एक हजार किलोपर्यंत बियाणे विक्री केली. सिंधुदुर्गासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली तसेच राज्यांच्या विविध भागांतून या बियाण्यांना मागणी आहे. याशिवाय कंपनीकडील देशी विशेषतः लाल तांदळाची पुणे, गुजरात येथील काही व्यापाऱ्यांकडून खरेदी होते. या तांदळाला किलोला ८५ रुपयांपर्यंत दर आहे. साळीवर प्रक्रिया करून तांदूळ निर्मिती करण्यासाठी कंपनीला बजाज राइस मिलने सहकार्य केले आहे. कोकणातील कडधान्यांची विक्रीही केली जात आहे.

कंपनीच्या बियाणे बॅंकेतील संग्रह (प्रातिनिधिक)

-लाल तांदळाचे सुमारे ३० प्रकार. उदा. वालय, बेळा, सोरटी, लाल पाटणी, खोचरी, सोनफळ, दोडत, विक्रम, तुर्या, खारा मुणगा, बारीक पाटणी, फोंडा, महाडी, सरवट, घाटी पंकज, मोगरा, डामगा, शिर्डी, काळा वरंगळ, कागो, सणाणा, हडसू, जाड मुणगा, छोटा बेळा, सफेद बेळा,
लावेसाळ, लाल कुडा, खामडी, खारल
-अन्य भातवाण- पांढरा वालय, यलकर, पाठेरे भात, यलकट पाटणी, सफेद घाटी पंकज, गुंजवळा
कोथिंबिरी, राजवेल, नवाण हे सफेद.
-भाताच्या सुमारे ४५, तर अन्य पिकांच्या २६ वाणांचे संकलन.
-सुंगधी भातावर प्रयोग सुरू.

कंपनीचे अन्य उपक्रम
-दुग्ध व्यवसाय व पूरक.
-कृषी सेवा केंद्र
-सामाईक सेवा केंद्र.
-चांदा ते बांदा योजनेतून अवजार बँक निर्मिती. त्यासाठी बँकेकडून सात लाख रुपये कर्ज.
-भातरोपवाटिका निर्मिती ते कापणीपर्यतची अवजारे.

संपर्क ः सचिन चोरगे (संचालक) ९८१९८७८२७१
संतोष गावडे (कंपनी अध्यक्ष) ९४२३३०१४४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT