Deshi Seeds : गावरान, पारंपरिक देशी वाणांच्या बियाण्यांचे संवर्धन

आदिवासी शेतकरी विकासासाठी काम करणाऱ्या ‘बायफ’ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने अकोले तालुक्यातील खिरविरे आणि परिसरातील चाळीस गावांतील शेतकऱ्यांची कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था कार्यरत आहे.
Deshi Seeds
Deshi SeedsAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर ः पारंपरिक देशी, गावरान बियाण्यांचे संवर्धन करून त्याचा प्रचार आणि प्रसार वाढीसाठी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चाळीस गावांत पाच वर्षांपासून काम सुरू आहे. आदिवासी शेतकरी विकासासाठी काम करणाऱ्या ‘बायफ’ (Biaf) या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने अकोले तालुक्यातील खिरविरे आणि परिसरातील चाळीस गावांतील शेतकऱ्यांची कळसूबाई परिसर (Kalsubai) बियाणे संवर्धन सामाजिक संस्था कार्यरत आहे. यात सुमारे ३००० आदिवासी महिला शेतकऱ्यांचा सहभाग असून, संस्थेकडून ५३ पिकांच्या ११६ वाणांचे संवर्धन केले जात आहे. संस्थेची बियाणे संवर्धनासोबतच बियाणे विक्रीतून दर वर्षाला ५० लाखांपर्यंत उलाढाल होत असते.

Deshi Seeds
आजऱ्यात महिला करणार देशी बियाण्यांचे संवर्धन

...अशी झाली सुरुवात
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात देशी वाणांचा वापरातून भाजीपाला, कडधान्य, भाताची पिके घेतली जातात. अशाच बियाण्यांचे संवर्धन, प्रचार, प्रसार व विक्री होते. त्याचा विस्तार वाढीसाठी आदिवासी शेतकरी विकासासाठी काम करणाऱ्या ‘बायफ’च्या मदतीने अकोले तालुक्यातील आदिवासी भागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०१७ मध्ये कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली. यात ११ सदस्य असून १,६६० शेतकरी सभासद आहेत. बहुतांश महिला शेतकऱ्यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे.

Deshi Seeds
Seed : उत्सव पारंपरिक बियाण्यांचा

पारंपरिक आणि स्थानिक बियाणे संवर्धित करून वृद्धिंगत करणे तसेच या वाणांचा प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही बियाणे पोहोचविणे हा उद्देश ठेवून संस्था काम करीत आहे. गावरान आणि पारंपरिक देशी वाणांच्या बियाण्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन संस्थेची स्थापना करण्यात आली. मानवी आरोग्याच्या दृष्टीने देशी वाणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पारंपरिक वाणांची जपवणूक करीत असताना दर्जेदार बीजनिर्मिती करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही बियाणे पुरवता यावीत यासाठी संस्था नियोजनबद्ध काम करीत असून, ती अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल ४० गावांमध्ये कार्य करीत आहे.

Deshi Seeds
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचे

संस्थेच्या संचालकपदी गावरान वाणांचे संवर्धन करणारे आदिवासी शेतकरी निवडण्यात आलेले आहे. खिरविरे आणि परिसरातील गावांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. खीरविरे हे जुन्या बाजारपेठेचे गाव आहे. या गावाला आजूबाजूच्या आदिवासी गावांचा संपर्क आहे. म्हणून संस्थेचे केंद्रस्थान व कार्यालय याच गावामध्ये आहे. बियाणे संवर्धनाचे पारंपरिक ज्ञान जतन करून परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्याचा प्रसार करण्यावर भर देण्यात येत आहे. पारंपरिक वाणांचे जतन करताना परिसरातील जास्तीत जास्त वाण एकत्रित करून त्यांची प्रात्यक्षिके विविध गावांमध्ये घेण्यात येतात.

या प्रात्यक्षिकांमध्ये ज्या वाणांचा परिणाम चांगला दिसून येतो त्यांची निवड जाणकार मंडळी व बियाणे संवर्धन करणाऱ्या अभ्यासू शेतकऱ्यांकडून करण्यात येते. अशा वाणांचा स्थानिक पातळीवर बियाणे बनविण्यासाठी उपयोग केला जातो. मागणीनुसार बियाणे निर्मिती वाढविण्यात येते. अशा पद्धतीने पारंपरिक व दर्जेदार देशी वाणांचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. पीक वाण संवर्धन कार्यक्रमामध्ये राहीबाई सोमा पोपेरे, हिराबाई हैबत भांगरे, ममताबाई देवराम भांगरे, हिराबाई लहू गभाले, शांताबाई खंडू धांडे, जनाबाई लक्ष्मण भांगरे, आनंदा नाना गोलवड, लक्ष्मण खंडू डगळे, उत्तम मारुती डगळे, सोनाबाई विठ्ठल भांगरे, फसाबाई मच्छिंद्र लोटे, नंदकुमार मंडवळे, निवृत्ती गंगाराम भांगरे, विठ्ठल रखमा भांगरे, एकनाथ कृष्णा भांगरे, भोरू बुधा पेढेकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.


संस्थेची वैशिष्‍‍ट्ये
- अकोले तालुक्यातील खिरविरे व परिसरातील ४० गावांत ५३ पिकांच्या ११६ वाणांचे संवर्धन.
- पारंपरिक बियाणे संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या स्थानिक ज्ञानाचे संकलन करून जुन्या जाणत्या व अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती संकलन.
- स्थानिक पातळीवर बियाणे संवर्धन करण्यासाठी गावोगावी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. शेतकरी, महिलांची क्षमताबांधणी करून बियाणे संवर्धन कार्यात त्यांचा सहभाग वाढवणे.

- बियाणे निवड, स्थानिक पातळीवर प्रात्यक्षिकांचे आयोजन, प्रशिक्षण सहली, मार्गदर्शन शिबिरे, चर्चासत्र, तज्ज्ञांच्या भेटी, केलेल्या कामांचे दस्तऐवज ठेवणे. संस्थेच्या मदतीने कोंभाळणें, एकदरे, देवगाव या गावांमध्ये गावरान बियाण्यांच्या बँकांची स्थापना.
- यंदाच्या हंगामात अकोले तालुक्यातील बारा ठिकाणी भात, नागली, वरई, वाल, पावटा इत्यादी विविध पिकांचे प्रात्यक्षिके. त्याच्या उत्पन्नाचा तपशील गोळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने नोंद.
- परसबागेसाठी लागणाऱ्या या बियांना प्रचंड मागणी. मागील हंगामात सुमारे वीस हजार परसबाग बियाणे संच विक्री.
- बियाणे विक्रीतून गतवर्षी ४८ लक्ष रुपयांची उलाढाल झाली.

संवर्धन केली जाणारी बियाणे
- भात ः काळभात, रायभोग, कोळपी, खडक्या, आंबेमोहोर, मनोर, जिरवेल, तामकुडई, कोळपी,
- भाजीपाला ः वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी, गवार, कारली, दोडका, दुधी भोपळा, लाल भोपळा, चक्की भोपळा, घोसाळी, काकडी, खरबूज, वाल, पावटा, मुळा, गाजर, भात, वरई, वाल, पावटा
- कडू व गोड वाल, हिरवा लाल घेवडा, वाटाणा, घेवडा, वरई, नागली



समितीला राष्ट्रीय पुरस्कार
कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेला केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय संचलित प्रोटेक्शन ऑफ प्लँट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स ॲथॉरिटीमार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन, शाश्‍वत वापरासाठीचा दिला जाणारा ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हियर कम्युनिटीज’ पुरस्काराने गौरवले. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार देऊन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण खंडू डगळे यांच्या समवेत बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे, अन्नमाता ममताबाई देवराम भांगरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संस्थेच्या सदस्या आणि बियाणे संवर्धक राहीबाई पोपेरे यांना भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे जागतिक महिलादिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारीशक्ती-२०१८ पुरस्कार’ तसेच भारत सरकारतर्फे २०२० मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कळसूबाई संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे (देवगाव, ता. अकोले, जि. नगर) ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हियर शेतकरी पुरस्कार.’ सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व दीड लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बायफ संस्थेचे विषयतज्ज्ञ डॉ. विठ्ठल कौठाळे, जैवविविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले या सर्वांचे या संस्थेस नियमित मार्गदर्शन लाभले आहे.


स्थानिक वाणांचे संवर्धन आणि प्रसार होणे गरजेचे आहे. हवामान बदलाचे शेतीवर होणारे परिणाम खूप घातक आहेत. शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी स्थानिक वाणांचे संवर्धन अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी गावोगावी गावरान बियाणे बँका तयार करण्यासाठी बायफ प्रयत्नशील आहे.
- संजय पाटील विषयतज्ज्ञ, बायफ


अकोले तालुका गावरान बियाणे उत्पादित करणारा तालुका म्हणून राज्यात आणि देशात नावारूपाला येत आहे. बायफ संस्थेच्या मदतीने आदिवासी महिलांचा यात मोठा सहभाग आहे. शास्त्रीय पद्धतीने बियाणे निर्मितीवर भर दिला जात आहे. यापुढे दर्जेदार गावरान बियाणे निर्मितीवर भर देऊन मागणीनुसार पुरवठा केला जाईल.
- जितीन साठे, विभागीय अधिकारी बायफ, नाशिक


आमच्या भागात कळसूबाई परिसरात नागली वर्गीय पिकांच्या लागवडी कमी होत चालल्या होत्या. पारंपरिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर होते. एएसके फाउंडेशन मुंबई व बायफ संस्थेच्या मदतीने चालू वर्षी ३० वाणांचे ज्यामधे नागली, वरई, सावा, बटू या पिकांच्या वाणांचे प्रात्यक्षिक माझे जहागीरदार वाडी येथील शेतावर घेण्यात आले, यातून उत्कृष्ट वाणांच्या बीज निर्मितीस मदत झाली आहे.
- बाळू घोडे, शेतकरी, जहागीरदारवाडी, ता. अकोले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com