शेतकरी ः राजेंद्र उमाजी विचारे
गाव ः वरवडे, ता. जि. रत्नागिरी
नारळ लागवड ः एक एकर
एकूण झाडे ः १५०
Coconut Crop : स्वयंरोजगारासाठी काहीतरी करायचं या अट्टाहासामधून राजेंद्र विचारे हे घरच्या शेतीकडे वळाले. २००५ मध्ये कर्ज घेऊन वीस एकर ओसाड जमीन विकत घेतली. डोंगराळ आणि कातळात लागवड करण्याचे आव्हान होते. त्यात आंबा, काजू कलमांची लागवड केली.
तत्कालीन कृषी सहाय्यक विनायक अव्हेरे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. २०११ मध्ये एक एकरांत नारळ लागवड करण्याचे ठरविले. शेती आणि बाग कामांमध्ये त्यांना पत्नी रिना आणि मुलगा रोहन यांची मदत होते.
जागेची निवड ः
वरवडे गावातून जाणाऱ्या छोट्या नदीवर राष्ट्रीय गतिमान पाणलोट अभियानातून सिमेंट नाला बंधारा बांधण्यात आला होता. त्या बंधाऱ्याजवळ फळ लागवड करण्यात आली.
२०११ मध्ये नारळाची १५० झाडे लावली. लागवडीसाठी रत्नागिरीतील भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातून सर्व रोपे आणण्यात आली. डोंगराळ जमिनीत खात्रीशीर उत्पादन मिळू शकेल अशी बाणवली, टीडी आणि महाराजा या जातीच्या रोपांची लागवड केली. दोन रोपांमध्ये श्रीवर्धन रोठा या जातीची सुपारीची झाडे लावली.
अशी केली लागवड ः
- लागवड करण्यापूर्वी जमीन भाजून घेण्यात आली. त्यानंतर ३ बाय ३ मीटर आणि ३ फूट खोलीचे खड्डे खोदण्यात आले.
- प्रत्येक खड्ड्यात १० ते १२ किलो शेणखत, २०० ते २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट ही खतमात्रा टाकून घेतली. सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे रोपांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
- लागवडीसाठी नारळ संशोधन केंद्रातून आणलेली एक वर्ष वयाची रोपे खड्ड्यात लावून घेतली.
- लागवडीवेळी दोन रोपांमध्ये ३० फुटाचे अंतर राखले आहे. जेणेकरून वाढ झाल्यानंतर एका झाडाची झावळ्या दुसऱ्या झाडाला लागणार नाहीत. तसेच रोपांना पुरेसा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल. बागेत स्वच्छता राखणे या गोष्टी साध्य होतील.
- नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून सुपारी लागवड केली आहे.
खतांचे व्यवस्थापन ः
- नारळाच्या बागेमध्ये सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर केला जातो. बागेत सेंद्रीय खतांचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन ती निरोगी राहण्यास मदत होते.
- लेंडीखत, कोंबडीखत, शेणखत तसेच माश्यांपासून तयार केलेले खत एकत्रित करून त्याची मात्रा दिली जाते. त्यासाठी जून, जुलै महिन्यामध्ये झाडाच्या बुंध्यात आळे करून सरासरी २० किलो प्रमाणे ही खते दिली जातात. संपूर्ण बागेतील झाडांना एका वेळी सुमारे ५ ते ६ टन खत लागते. दर चार महिन्यांनी हे खत दिले जाते.
- १०० किलो शेणखतामध्ये १० किलो कोंबडखत, १५ किलो लेंडीखत आणि १० किलो माश्यांची कुटी असे मिश्रण केले जाते. त्यामुळे झाडांचे आरोग्य चांगले राखले जाते.
- वर्षातून तीन वेळा १०ः२६ः२६ हे खत प्रति रोप साधारणपणे २०० ग्रॅम प्रमाणे दिले जाते.
- दरवर्षी मे आणि सप्टेंबर महिन्यात नारळ बागेची साफसफाई केली जाते.
- पावसाळ्याच्या दिवसांत सिंचनासाठी आवश्यकता भासत नाही. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून आठवड्यातून तीन वेळा सिंचन दिले जाते. प्रत्येक नारळाच्या झाडाला १०० लिटर प्रमाणे पाणी मिळेल अशी व्यवस्था केली जाते.
- नारळ झाडांवर गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बागेमध्ये सापळे लावण्यात आलेले आहेत.
विक्री नियोजन ः
- नारळाच्या एका झाडामधून साधारण १५० ते २०० नारळ उत्पादन मिळते. वरवडेपासून काही अंतरावरील जयगड येथील जेटीवर येणाऱ्या फेरीबोटीमुळे शहाळ्यांना मोठी मागणी असते. तिथे एका दिवसाला ५० शहाळ्यांची विक्री होते. साधारण २० रुपये प्रति शहाळे या दराने विक्री होते.
- उत्पादित नारळांची प्रति नग २२ रुपये दराने रत्नागिरी, गणपतीपुळे किंवा वरवडे गावातच विक्री केली जाते.
- मार्च, एप्रिल, मे आणि जूनचे पंधरा दिवस या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पुण्यामध्ये नारळ विक्रीसाठी पाठविले जातात. तिथे एका नारळाला ३० ते ३५ रुपये इतका दर मिळतो. पुण्याला आठ दिवसाला साधारण ३०० नारळ विक्रीसाठी पाठवतात.
खत खर्चात बचत ः
खत तयार करण्याचा खर्च कमी करण्यासाठी घरामध्येच देशी कोंबड्यांचे संगोपन केले आहे. साधारण १०० देशी कोंबड्या आहेत. तसेच सहा जनावरे असून त्यात चार म्हशी आहेत. त्यांचे उपलब्ध शेण आणि कोंबडीखत वेळोवेळी काढून त्याचा नारळ बागेत खत म्हणून वापर केला जातो. त्यामुळे खतांवर होणारा अतिरिक्त खर्च काही प्रमाणात कमी करण्यास मदत झाली आहे.
---------------
- राजेंद्र विचारे, ९४२१६०७५५६
(शब्दांकन ः राजेश कळंबटे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.