Coconut Management Update : रत्नागिरीतील अजय तेंडुलकर यांचे नारळ नियोजन

Coconut production : अजय तेंडुलकर हे मुंबईत केटरिंग व्यवसाय करत होते. कालांतराने रत्नागिरी जिल्ह्यातील डोर्ले या त्यांच्या गावी आले.
Coconut Management
Coconut ManagementAgrowon

शेतकरी : अजय रवींद्रनाथ तेंडुलकर

गाव : डोर्ले, जि. रत्नागिरी

नारळ लागवड : साडेसहा एकर

एकूण झाडे : ८००

अजय तेंडुलकर हे मुंबईत केटरिंग व्यवसाय करत होते. कालांतराने रत्नागिरी जिल्ह्यातील डोर्ले या त्यांच्या गावी आले.

गावाकडील शेतजमिनीत २००५ मध्ये २०० हापूस कलमांची लागवड केली. मात्र, डोर्ले गाव हे खाडी किनारा असल्यामुळे तेथील वातावरण नारळाला पोषक असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

भाट्ये नारळ संशोधन केंद्रातून त्यांनी नारळ लागवडीविषयी माहिती घेतली. त्यानुसार प्रताप, बाणवली, टीडी या जातींची रोपे त्यांनी लागवडीसाठी आणली. पहिल्या टप्प्यात २५० रोपांची लागवड केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नारळ लागवडीत वाढ करीत नेली.

आज त्यांच्याकडे साडेसहा एकरांत नारळाची ८०० झाडे आहेत. बागेत सहा वर्षांपासून १७ वर्षे वयापर्यंतची विविध झाडे आहेत. सध्या ४०० नारळांपासून उत्पादन मिळते आहे. तर उर्वरित ४०० झाडे सहा वर्षांची असून, पुढील वर्षापासून त्यांच्यापासून नारळ उत्पादन सुरू होईल.

नारळ लागवडीसाठी कृषी योजनेचाही लाभ घेतला आहे. नारळ लागवडी व्यतिरिक्त आंबा, काजू लागवड अशी एकत्र मिळून ३८ एकर क्षेत्र आहे.

Coconut Management
Coconut Cultivation : चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळ लागवडीकडे दुर्लक्ष

व्यवस्थापनातील बाबी

- लागवडीसाठी दोन फूट रुंद आणि दोन फूट उंचीचे खड्डे काढून घेतले. त्यात दोन किलो शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या.

- लागवडीसाठी भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातून प्रताप, टीडी, बाणवली या जातींची दोन वर्षांची रोपे आणली. लागवड करताना दोन झाडांमध्ये २५ फूट इतके अंतर राखले आहे.

- लागवडीनंतर पाऊस सुरू झाला, की सेंद्रिय खतांच्या मात्रा दिल्या जातात. ही मात्रा रोपांच्या वयानुसार ठरविली जाते. साधारणपणे दोन किलो शेणखत प्रति रोप याप्रमाणे दिले जाते.

- पावसाळा संपल्यानंतर बागेची साफसफाई केली जाते. बागेतील सुकलेल्या झावळ्या, गवत काढून बाग स्वच्छ केली जाते. बागेत स्वच्छता नसेल तर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच उंदरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. उंदीर झाडांचे मोठे नुकसान करतात. बागेत स्वच्छ राखल्यास उंदरांचा उपद्रव कमी होण्यास मदत होते.

- बागेत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. दिवसातून दोन वेळा साधारण पाऊणतास सिंचन केले जाते. वातावरणानुसार सिंचन कालावधी कमी-जास्त केला जातो.

खत व्यवस्थापन

रिंग पद्धतीने खतमात्रा देण्यासाठी झाडांच्या बुंध्यात चर काढले जातात. वर्षातून दोन वेळा अशा पद्धतीने खत दिले जाते. नोव्हेंबर महिन्यात सेंद्रीय शेणखत, लेंडीखत प्रति रोप ३ ते ४ चार किलो प्रमाणे दिले जाते. त्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. यासह निंबोळी पेडींचा वापरदेखील केला जातो. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होण्यास मदत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

कातळावर लागवड केलेल्या नारळ झाडांच्या बुंध्यालगत माशांची कुट्टी वर्षातून दोन वेळा टाकली जाते. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होण्यास मदत झाली. तसेच खतांच्या योग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. योग्य व्यवस्थापन पद्धतींमुळे लागवडीनंतर सात वर्षांनी नारळाच्या रोपाला येणारी पोय आपल्या बागेत चार वर्षांनी आल्याचे श्री. तेंडुलकर सांगतात.

Coconut Management
Crop Advice : आंबा, काजू, सुपारी, नारळ पीक सल्ला

उत्पादन

- सध्या बागेतील ४०० झाडांपासून उत्पादन मिळते आहे. उर्वरित लागवडीतून पुढील वर्षी उत्पादन सुरू होईल. साधारण ४०० नारळाच्या झाडांपासून वर्षाला साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

- नारळाच्या शहाळांना शहरी भागांत चांगली मागणी असून दरही चांगले मिळतात. त्यामुळे शहाळे विक्री फायदेशीर ठरते. प्रति शहाळे साधारण २५ रुपये दर मिळतो.

- एकूण उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादित शहाळांची विक्री केली जाते. उर्वरित २० टक्के नारळांची प्रति नारळ १५ ते २५ रुपयांनी विक्री होते.

पडीक जमीन आणली लागवडीखाली

डोर्ले येथे खाडी किनारी दलदलीची खाजण असलेली पडीक जमीन होती. त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. त्यामध्ये मातीचे उभारे (बंधारा) तयार करून बांधावर चारशे नारळ झाडांची लागवड केली.

योग्य व्यवस्थापन, खतांच्या नियमित मात्रा आणि स्वच्छता यामुळे रोपे जगविण्यात यश आले. सध्या या लागवडीतील झाडे ६ वर्षांची झाली असून, पुढील वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होईल, असे श्री. तेंडुलकर यांनी सांगितले.

संपर्क - अजय तेंडुलकर, ९७६७५६८६९३ (शब्दांकन : राजेश कळंबटे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com