Fish Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Ornamental Fish: शोभिवंत मत्स्य प्रजनन संवर्धन केंद्राची उभारणी

Fish Farming: शोभिवंत मत्स्य बीजसंवर्धन व प्रजनन केंद्राचे बांधकाम करत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रासाठी आवश्यक असलेल्या अनुकूल जागेची निवड. चांगल्या गुणवत्तेच्या पाण्याचा मुबलक साठा, योग्य दळणवळण आणि विजेची सोय इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात.

Team Agrowon

अमिता जैन

Aquaculture: बाहेरून आयात करण्यात आलेल्या माशांच्या बरोबर अनेक सूक्ष्मजीव देखील आयात होतात. केंद्रावरील इतर माशांना या सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आयात करण्यात आलेल्या माशांना सर्वप्रथम केंद्रावरील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. त्यांच्यावरील सूक्ष्म जिवांचे निर्मूलन केले जाते. त्यानंतरच या माशांचे केंद्रावरील इतर मासांबरोबर संचयन केले जाते. मासे क्वारंटाईन करण्याकरिता सेंटरमध्ये वेगवेगळ्या क्षमतेच्या काचेच्या टाक्या, एफआरपी किंवा प्लॅस्टिकच्या टाक्यांचा उपयोग केला जातो.

प्रजनक साठा संगोपन टाकी

प्रजनक साठा निरोगी असल्यास तयार होणारे मत्स्यबीज हे चांगल्या प्रतीचे असते. या टाक्यांमध्ये मत्स्यबीजनिर्मितीसाठी वापरले जाणाऱ्या प्रजनक नर व मादी साठवतात. येथे त्यांना योग्य खाद्य पुरवठा करून त्यांच्या आरोग्याची विशेष निगा राखली जाते.

प्रजनन कक्ष

या कक्षात विविध प्रजातींच्या माशांचे प्रजनन करण्यासाठी काचेच्या टाक्यांचा वापर केला जातो. टाक्यांमध्ये प्रजनन योग्य नर आणि मादी माशांना ठेवले जाते, त्यांना योग्य प्रकारचा आहार व आवश्यक जलीय गुणवत्ता पुरवली जाते. माशांना प्रजननासाठी लागणाऱ्या विविध वनस्पती या टाक्यांमध्ये ठेवल्या जातात. प्रजननानंतर तयार होणारे पिल्ले तयार व अंडे यांना या वनस्पतीचा आधार मिळतो.

मत्स्यबीज संगोपन तळे

प्रजनन कक्षामध्ये तयार झालेले लहान आकाराचे मुख्य जिरे पुढे मत्स्य संगोपन तळ्यांमध्ये साठविले जातात. या तळ्यांमध्ये त्यांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार खाद्य व्यवस्थापन आणि जलीय आरोग्य व्यवस्थापन करून वाढविले जाते. या तळ्यांमध्ये मत्स्यजिऱ्यांना मत्स्य बोटुकली आकारापर्यंत वाढविले जाते.

नैसर्गिक मत्स्यखाद्य निर्मिती युनिट

नव्याने जन्मास आलेल्या मत्स्य जिऱ्यांच्या तोंडाचा आकार हा अतिशय लहान असतो, त्यामुळे त्याला कृत्रिम खाद्यावर जगवणे करणे शक्य होत नाही.

अशा लहान मत्स्यजिऱ्यांच्या पोषणाकरिता प्लवंग

किंवा जिवंत मत्स्य खाद्य खाद्याची आवश्यकता असते.

जलीय वनस्पती संगोपन युनिट

मत्स्यालय सुशोभित करण्यासाठी त्यात माशांबरोबर अनेक प्रकारच्या वनस्पती देखील ठेवल्या जातात.

मत्स्यालयाच्या आरोग्याची निगा राखण्यास मदत करतात. वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी काच, सिमेंट अथवा एफआरपी टाक्यांचा वापर केला जातो.

रोगनिदान केंद्र

अनेक वेळा केंद्राबाहेरून आयात करण्यात आलेला मत्स्यसाठा अथवा मत्स्य बीज यांच्यावर विविध प्रकारचे संसर्ग असण्याची दाट शक्यता असते. अशावेळी मत्स्यबीजाला टाइम सेंटरमध्ये क्वारंटाईन करून त्यानंतरच त्यांना केंद्रामध्ये घेतले जाते.

अनेक वेळा दूषित पाण्याच्या गुणवत्तेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे माशांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी माशांच्या रोगावर उपचार करण्यासाठी रोग निदान व औषधोपचार केंद्राची आवश्यकता असते.

रोगनिदान व औषधोपचार केंद्र हे उत्पादन केंद्रापासून लांबच्या अंतरावर ठेवले जाते. यामुळे मत्स्यबीज केंद्रात तयार होणाऱ्या लहान मासळीला रोगाचा प्रादुर्भाव टाळला जातो.

संकुलन कक्ष

ज्या वेळी मासे लांबच्या अंतरावर पाठवायचे असतात त्यापूर्वी त्यांना संकुलित केले जाते. संकुलन म्हणजे मासे पाठविण्यापूर्वी काही तासांपूर्वी खाद्य देणे बंद केले जाते. त्यामुळे त्यांचा चयापचय दर मंद होतो, मासे कमी प्रमाणात विष्ठा विसर्जित करतात.

माशांच्या विष्ठेत उपस्थील अमोनियामुळे वाहतुकीदरम्यान पॅकेजिंग केलेल्या प्लॅस्टिक पिशवीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मरतुकीचे प्रमाण वाढण्याची दाट संभावना असते. ही मरतूक टाळण्यासाठी माशांची वाहतूक करण्यापूर्वी संकुलित केले जाते. संकुलन कक्षात माशांना निर्जंतुक करणे, त्याचा अन्न पुरवठा थांबवून त्यांच्या शरीरातून पूर्णपणे विष्ठा विसर्जित केली जाते.

पॅकेजिंग युनिट

विक्रीयोग्य मत्स्यबीजाला संकुलित केल्यानंतर पॅकेजिंग कक्षात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पाण्यात मुबलक प्रमाणात प्राणवायू मिसळून त्यात योग्य संख्येत मत्स्यबीज साठवून या प्लॅस्टिक पिशव्या सीलबंद केल्या जातात. या सीलबंद पिशव्या कार्टन बॉक्स किंवा थर्मोकोल बॉक्सेसमध्ये पॅक केल्या जातात.

मत्स्य विक्री केंद्र

शोभिवंत मत्स्य संवर्धन केंद्रात उत्पादित विविध प्रजातींचे शोभिवंत मासे, मत्स्य खाद्य, जलीय वनस्पतीची किरकोळ विक्री करण्यासाठी संवर्धन केंद्राच्या ठिकाणी मत्स्यविक्री केंद्र असावे. संपूर्ण केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करणे, माशाची गुणवत्ता व आवक जावकाचा लेखाजोखा ठेवणे इत्यादी कामकाजासाठी शोभिवंत मत्स्यबीज संगोपन, संवर्धन केंद्रावर कार्यालय असावे.

केंद्राचे व्यवस्थापन

शोभिवंत मत्स्यप्रजनन, संगोपन आणि संवर्धन केंद्र उभारणी करताना प्रत्येक कक्षात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध व्हावा म्हणून छताला पारदर्शक पत्र्यांचा वापर करावा. खिडकीच्या झडपा मोठ्या आकाराच्या आणि जाळी लावलेल्या असाव्यात.

केंद्राच्या सर्व घटकांमधून टाकाऊ पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रात सेंट्रल ड्रेनेज सिस्टीम वापर करावा. प्रत्येक खोलीत मुबलक वायुवीजन होण्यासाठी सर्व युनिट्समध्ये एक्झॉस्ट पंखे बसवावेत.

केंद्रातील फरशी गुळगुळीत नसावी, कारण या फरशीवर पाणी सांडले असता पाय घसरण्याची संभावना जास्त असते. ड्रेनेज सिस्टीम गंजरोधक जाळ्यांनी आच्छादित केलेली असावी.

पाणीपुरवठा

केंद्रास पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यासाठी केंद्रात ओव्हरहेड टाके वापरले जाते. हे टाके सिमेंट किंवा एचडीपीई प्रकारच्या प्लॅस्टिकचे असते. हे टाके केंद्रात छतावर किंवा उंच ठिकाणी ठेवलेले असते, ज्यामुळे गुरुत्वबलामुळे केंद्राच्या सर्व युनिटपर्यंत सुलभरित्या पाणीपुरवठा करणे शक्य होते.

केंद्रातील प्रत्येक युनिटपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी प्लॅस्टिक, पी.व्ही.सी. किंवा एचडीपीई पाइपलाइन वापरणे योग्य ठरते.

पाण्याचे नळ हे देखील प्लॅस्टिक अथवा गंजरोधक धातूपासून बनलेले असावेत, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे सोईस्कर होते.

केंद्रात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने विद्युत उपकरणे, लाइट स्विच व विद्युत पुरवठ्याच्या वायरी या उच्च गुणवत्तेच्या वापराव्यात. त्यांना पाण्याच्या पाइपलाइनपासून दूर ठेवावे.

टाक्यांची रचना

केंद्रामध्ये मासे हाताळणी, साठवणूक, प्रजनन खाद्य निर्मिती, पाणवनस्पतींचे संवर्धनासाठी सिमेंट, काच, प्लॅस्टिक व एफआरपीपासून तयार करण्यात आलेल्या टाक्यांचा वापर केला जातो.

सिमेंट टाक्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात प्रजनक साठ्याच्या संगोपनासाठी केला जातो. काचेच्या टाक्या आयताकृती विविध लांबी व रुंदीच्या असतात. टाक्यांमध्ये मत्स्य बीज, अंडी, पाणवनस्पती हाताळणी करण्याकरिता वापरल्या जातात. काचेच्या टाक्या आकाराने लहान असल्यामुळे स्वच्छ करण्यास सोप्या असतात. या टाक्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार यांचा वापर करणे सोईस्कर होते. मात्र टाक्यांच्या वापराचा मुख्य तोटा म्हणजे या अत्यंत नाजूक असून निष्काळजीपणे केलेल्या हाताळणीमुळे फुटण्याची दाट संभावना असते. काचेच्या टाकीमध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याची क्षमता खालील सूत्रानुसार मोजता येते.

लांबी × रुंदी × उंची =(येणारे उत्तर)

येणारे उत्तर / १०००

प्लॅस्टिक टाक्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. या टाक्या आकाराने मोठ्या असून यांच्यात कमीत कमी तीनशेपेक्षा जास्त लिटर पाणी साठवता येते. या टाक्यात जिरे ते बोटुकली संवर्धनासाठी किंवा पाणवनस्पतीच्या संवर्धनाकरिता अतिशय उत्कृष्ट ठरतात. टाक्या घडी करणे करणे शक्य असल्यामुळे आवश्यकता आहे तेथे त्या मांडणी करून वापर झाल्यानंतर पुन्हा घडी करून ठेवणे शक्य होते त्यामुळे जागेचा अपव्यय टाळला जातो.

एफआरपी टाक्या आवश्यकतेनुसार बांधणी करून मिळतात. या टाक्या हलक्या वजनाच्या असल्यामुळे यांना हाताळणे अतिशय सोईस्कर असते. आवश्यकतेनुसार आपण त्यांची जागा बदलू शकतो. नर-मादी, अंडी, मत्स्यजिरे व शोभिवंत पाणवनस्पती यांचे संगोपन व संवर्धनासाठी या टाक्या वापरू शकतो. अनेक ठिकाणी टाक्यांवर होणारा खर्च टाळण्यासाठी जमिनीत लहान आकाराचे तलाव खोदले जातात, यातून पाणी झिरपू नये म्हणून या तलावांना प्लॅस्टिकचे अस्तरीकरण केले जाते.

विविध यंत्रांचा वापर

केंद्रात मोठ्या प्रमाणात बीज निर्मिती, संवर्धन व संगोपनासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. विहिरीतील पाणी ओव्हर हेड टाक्यात साठवून ठेवले जाते. टाक्यातून ते पाणी फिल्टर करून केंद्रात विविध ठिकाणी पोहोचवले जाते. यासाठी पंप, सॅंड फिल्टर, कार्डरिज फिल्टर वापरले जातात.

पाण्यातील अशुद्धी व विरघळलेले माती, चिखलाचे कण इत्यादी घटकांचे निर्मूलन करण्यासाठी फिल्टर्सचा उपयोग होतो.

मत्स्य संवर्धनासाठी पाण्यात किमान ४ ते ६ पीपीएमपर्यंत प्राणवायू उपलब्ध असणे आवश्यक असते. प्राणवायुच्या मुबलक पुरवठ्यासाठी एरिएटर आणि एअर ब्लोअरचा वापर केला जातो.

एअर ब्लोअर मुख्य व वाहक पाईप्स हे प्लॅस्टिकचे असतात. या वाहक पाइप्सना डीफ्यूझर स्टोन लावलेले असतात. या स्टोन्समुळे प्राणवायू अतिशय सूक्ष्म बुडबुड्यांच्या स्वरूपात पाण्यात मिसळला जातो. मत्स्यप्रजातींच्या आवश्यकतेप्रमाणे विविध प्रजातीच्या प्रजनानासाठी पाण्याचे आवश्यक असलेले तापमान टिकवून ठेवण्यासाठी हिटर्सचा वापर केला जातो.

अमिता जैन ९९११७५१५९३

(सहा. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT