
अमिता जैन
Aquaculture Planning: शोभिवंत मत्स्यपालनासाठी जागेची निवड करताना पाण्याची गुणवत्ता व उपलब्धता, हवामान, जैवसुरक्षा, कामगार उपलब्धता महत्वाच्या आहेत.
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी योग्य जागेची निवड करणे ही पहिली आणि सर्वांत महत्त्वाची पायरी आहे. योग्य जागेची निवड केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, माशांचे आरोग्य टिकून राहते, व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येते.
जलस्रोतांची उपलब्धता
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायासाठी पाणी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. जागेवर स्वच्छ, भरपूर प्रमाणात पाण्याचा पुरवठा असणे आवश्यक आहे.
पाण्यात रासायनिक किंवा औद्योगिक प्रदूषण नसावे, तसेच पाण्याचा सामू ६.५ ते ८ दरम्यान असावा. माशांची रंगछटा आणि आरोग्य टिकविण्यासाठी विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ५ मिग्रॅ./लिटरपेक्षा जास्त असावे.
विहीर, कूपनलिका यासारखे पाणी पुरवठ्याचे स्रोत निवड केलेल्या जागेवर उपलब्ध असावेत.
जागेचे आकारमान
जागेची निवड करताना जमिनीच्या भूमितीचा विचार करावा. सपाट असलेली जमीन निवडल्यास टाक्या बांधण्यासाठी खर्च कमी होतो तसेच पाण्याचा निचरा सुलभपणे करता येतो.
लहान तळी किंवा मातीच्या टाक्या बांधावयाच्या असतील, तर त्या जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता असावी, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल आणि पाण्याची स्थिरता राखता येईल.
हवामान
हवामानाचा शोभिवंत माशांच्या वाढीवर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो. मध्यम आणि स्थिर हवामान असलेल्या ठिकाणी मत्स्यपालन करणे फायदेशीर ठरते. कारण शोभिवंत मासे तापमानातील अचानक बदलास अत्यंत संवेदनशील असतात.
२० अंश सेल्सिअस ते ३०अंश सेल्सिअस दरम्यानचे तापमान बहुतेक प्रजातींसाठी योग्य मानले जाते, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकून राहते.
वाहतूक, बाजारपेठांची उपलब्धता
जागेची निवड करत असताना बाजारपेठ, रस्ते, संपर्क सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मत्स्यपालन प्रकल्प मुख्य बाजारपेठेपासून जवळ असावा, ज्यामुळे वाहतूक खर्च कमी होतो तसेच जिवंत मासे विक्रीसाठी घेऊन जात असताना त्यांच्यावरील ताण कमी राहतो.
जागेवर वीजपुरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे कारण ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा, पाणी पंप, फिल्ट्रेशन यंत्रणा व प्रकाशव्यवस्था चालविण्यासाठी विजेची आवश्यकता असते.
जैव सुरक्षा
प्रकल्प प्रदूषण व औद्योगिक सांडपाण्यापासून दूर असावा. शेतजमिनीवरील रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या पाण्यातील मिसळण्याचा धोका नसावा. त्याच बरोबर मत्स्यपालन प्रकल्पांपासून काही प्रमाणात दूर अंतरावर असावा. जेणेकरून रोगराईचा प्रसार रोखणे शक्य होते.
जागेवर कुंपण व नियंत्रित प्रवेशद्वार असणे सुरक्षा व जैवसुरक्षा पाळण्यासाठी मदत करते.
कामगारांची उपलब्धता
जागेच्या निवडीत स्थानिक कामगार व आवश्यक वस्तूंची उपलब्धता देखील तपासावी. माशांचे खाद्य, औषधे, पाण्याचे उपचार करणारे रसायन, उपकरणे या वस्तू सहजपणे उपलब्ध होत असतील तर प्रकल्प राबवणे सुलभ होते.
स्थानिक पातळीवर कुशल व अकुशल कामगार सहज उपलब्ध असल्यास रोजच्या कामात सातत्य ठेवता येते.
पर्यावरणीय व कायदेशीर बाबी
जागेची निवड करताना स्थानिक पर्यावरण नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात प्रकल्प नसावा.
पाण्याचा वापर, सांडपाण्याचे व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक परवानग्या तपासून घ्याव्यात.
- अमिता जैन ९९११७५१५९३
(सहा.मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.